जाणून घ्या महत्त्व, मुहूर्त, साहित्य, विधी
मुंबई : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi 2024) अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे. दरवर्षी पंढरपूर (Pandharpur) नगरी विठू (Vitthal) माऊलीच्या गजराने दुमदुमून निघते. यंदा आषाढी एकादशी १७ जुलै रोजी साजरी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणाहून विविध दिंडी विठुनामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत. त्यासोबत लाखो भाविकांनीही पंढरपूरला हजेरी लावली आहे. मात्र अनेकांना आषाढी एकादशीला पंढरीला जाणे शक्य नसल्याने भाविक जवळच्या विठ्ठल मंदिरात जाऊन किंवा घरच्या घरी पूजा करतात. यासाठी जाणून घ्या पूजेचे महत्त्व साहित्य, विधी आणि इतर माहिती.
काय आहे आषाढी एकादशीचे महत्त्व?
हिंदू धर्मात आषाढी एकादशीला विशेष महत्त्व असते. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी या नावाने देखील ओळखले जाते. या दिवसानंतर श्रीविष्णू निद्रावस्थेत जातात आणि चातुर्मास सुरु होतो. भागवत सांप्रदायांसाठी हा दिवस विशेष मानला जातो.
भविष्योत्तर पुराणात, कृष्णाने युधिष्ठिराला शयनी एकादशीचे महत्त्व सांगितले आहे, कारण निर्माता-देव ब्रह्मदेवाने त्याचा पुत्र नारदांना एकदा त्याचे महत्त्व सांगितले होते. राजा मंडताची कथा याच संदर्भात सांगितली आहे. धर्मनिष्ठ राजाच्या देशात तीन वर्षे दुष्काळ पडला होता, परंतु राजाला पर्जन्य देवतांना प्रसन्न करण्याचा उपाय सापडला नाही. अखेरीस, अंगिरस ऋषींनी राजाला देव-शयनी एकादशीचे व्रत पाळण्याचा सल्ला दिला. असे केल्यामुळे विष्णूच्या कृपेने राज्यात पाऊस पडला. त्यामुळे आषाढी एकादशीला अनेक भाविक विठुरायासाठी उपवास करुन पूजा-अर्चना करतात.
मुहूर्त आणि शुभ योग
हिंदू पंचांगानुसार आषाढी शुक्ल पक्षातील एकादशी तिथी १६ जुलैला रात्री ८.३३ वाजेपासून १७ जुलै रात्री ९.३३ वाजेपर्यंत असणार आहे. तसेच देवशयनी एकादशीला अनुराधा नक्षत्रासह सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग, शुभ योग आणि शुक्ल योग असणार आहे. सकाळी ७.०४ पर्यंत शुभ योग आणि त्यानंतर शुक्ल योग असणार आहे.
पूजा साहित्य
आषाढी एकादशीला विठुरायाच्या पुजेसाठी विठ्ठल रुक्मिणी मूर्ती, पाणी, पंचामृत, चंदन आणि हळद मिश्रित पाणी, हळद कुंकू, अष्टगंध, बुक्का, तुळशी पत्र, नवीन वस्त्र, ५ फळे, विडाचे पान, सुपारी, तांदूळ, गुलाबाचे फुल, केळी, अगरबती आणि कापूर हे साहित्य लागणार आहेत.
अशी करा विठ्ठलाची पूजा
- आषाढी एकादशीला संपूर्ण दिवस उपवास असतो. सकाळी उठल्यावर स्नान करुन घरातील देवाची पूजा करा. त्यानंतर विठ्ठलाच्या मूर्तीला पंचामृताने स्नान घाला. आता स्वच्छ कपड्याने मूर्ती पुसून तिला अष्टगंध आणि बुक्का लावा.
- विठुरायाला नवीन वस्त्र परिधान करा आणि हार घाला. उपवासाच्या पदार्थाचा किंवा फळांचा नैवेद्य दाखवा. विठुरायाची आरती करा. आषाढी एकादशीला तुळस तोडू नयेत. पण आदल्या दिवशी तुळस तोडून ठेवा आणि ती विठुरायाला अर्पण करावी.