Saturday, April 19, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यपूर्वांचल विकास प्रकल्प, लातूर, मेघालय वसतिगृह

पूर्वांचल विकास प्रकल्प, लातूर, मेघालय वसतिगृह

सेवाव्रती: शिबानी जोशी

निसर्ग सौंदर्याने नटलेला; परंतु देशाच्या एका कोपऱ्यात असल्यामुळे मुख्य प्रवाहापासून काहीसा दूर राहिलेला भाग म्हणजे ईशान्य भारताकडची सात राज्ये. ‘विविधतेत एकता’ हे आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे. निसर्ग, भौगोलिक रचना, ऋतुमान, राहणीमान, जीवनशैली, वेषभूषा, खानपान या सर्वच बाबतीत भारतभर विविधता दिसून येते. या विविधतेचं एक विशेष रूप म्हणजे पूर्वांचल. आसाम, अरुणाचल, मेघालय, मिझोराम, मणिपूर, नागालँड व त्रिपुरा या सप्तभगिनींचा एकत्रित भाग ‘पूर्वांचल’ म्हणून ओळखला जातो. पण या निसर्ग सौंदर्य संपन्नतेसोबतच गरिबी, निरक्षरता व अनारोग्यही इथे मोठ्या प्रमाणात आहे. या प्रतिकूल परिस्थितीचा फायदा घेतल्यामुळे परकीय ख्रिश्चन मिशनरी, बांदलादेशी घुसखोर, दहशतवादी कारवाया असे इथले काही मोठे प्रश्न आहेत. त्याशिवाय तिथल्या लोकांची चेहरेपट्टी वेगळी असल्यामुळे त्या लोकांना तुम्ही भारतातले नाहीत हे पटवून देण्यात येते ही देखील एक समस्या आहे. त्याशिवाय अनेक जाती-जमातींचे लोक इथे राहतात, त्यांच्यातही वैविध्य आहे.

पूर्वाचलातील हे आव्हान पाहून तेथील  शिक्षण, आरोग्य व सांस्कृतिक योजनांद्वारे रा. स्व. संघाचे स्वयंसेवक व अन्यही राष्ट्रीय विचारांच्या संघटना त्यांच्यात आपलेपणाची, राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्यासाठी, त्यांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत. या प्रांतातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणावं तसेच त्यांना शिक्षण, आरोग्य  सुविधा मिळाव्यात आणि सुशिक्षित होऊन ते पुन्हा आपल्या क्षेत्रामध्ये जाऊन त्यांनी चांगलं काम करावं यासाठी विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणून शिकवावं अशी योजना आखण्यात आली आणि त्यानुसार जनकल्याण समितीच्या माध्यमातून लातूर येथे मेघालयमधल्या मुलांसाठी तीस वर्षांपूर्वी वसतिगृह सुरू करण्यात आले. विद्यार्थी महाराष्ट्रात शिक्षणाच्या निमित्ताने राहतात त्यामुळे तिहेरी फायदे होतात. एक तर या मुलांना मुख्य प्रवाहात आणले जाते. दुसरं त्यांना शिक्षण दिले जाते. तिसरं म्हणजे स्थानिक लोकांमध्येही या सात राज्यांबद्दल आत्मीयता, जागरूकता निर्माण होते.

आज शालेय शिक्षण, महाविद्यालयीन, व्यावसायिक शिक्षण, त्यानंतर व्यवसाय, नोकरी अशा जबाबदाऱ्या सांभाळत, लातुरातून मेघालयात परतलेले चिमूटभर का होईना पण ५०-६०  विद्यार्थी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश तेथे प्रसारित करीत आहेत. पहिल्यापासून लातूरकरांच्या सहकार्याने हा प्रकल्प लातुरात सुरू आहे. सुरुवातीला पहिल्या आलेल्या विद्यार्थ्यांची कोणाच्या तरी घरी राहण्याची सोय केली होती. त्यानंतर भाड्याच्या जागेत वसतिगृह सुरू केलं आणि त्यानंतर मोहोळकर आजींनी आपली स्वतःची जागा अल्प मूल्यांमध्ये प्रकल्पाला दिली. त्या ठिकाणी आता स्वतःची इमारत उभी असून सध्या तिथे आठ विद्यार्थी राहत आहेत. आतापर्यंत ६० विद्यार्थी इथून शिकून पुन्हा मेघालयात परतले आहेत आणि तिथे उत्तम कार्य करत आहेत. एकदा का इथे विद्यार्थी आला की, तो दहावीपर्यंत शिक्षण इथे घेतो. त्याला पुढील शिक्षण घ्यायचं असल्यास त्याची व्यवस्था पुण्यासारख्या ठिकाणी केली जाते. त्या विद्यार्थ्याला परत जायचं असेल तरी तो पुन्हा मेघालयमध्ये जाऊन त्या ठिकाणी नोकरी, व्यवसाय तसेच आपल्यासारख्या इतर मुलांना उत्तेजन देण्याचे काम करतो. जून १९९६ मध्ये खाँसी हिल्स इथून प्रथम १४ विद्यार्थी आले. जून १९९६ मध्ये एका भाड्याच्या जागेत छात्रावास सुरू झाले आणि जून १९९९ पासून स्वतंत्रपणे सुरू झाले. सध्या या प्रकल्पाचे पालक म्हणून योगेश तोतला काम करत आहेत, तर प्रकल्प प्रमुख म्हणून संतोष पाटील कार्यरत आहेत.  शांताराम  देशमुख, डॉ. चंद्रशेखर औरंगाबादकर, डॉ. मनोज शिरुरे, निशीकांत  अंधोरीकर, नरेंद्र पाठक, गोपाळ कुलकर्णी, राजेश  बाकलीकर, असे अनेक सदस्य आपला बहुमोल वेळ देऊन कार्याशी जोडले गेले आहेत.

मेघालयमधून आलेल्या या मुलांची भाषा, राहण्याची, खाण्याच्या पद्धती वेगळ्या असतात. त्यामुळे त्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवलं जातं. लातूरमधील सुप्रसिद्ध इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ही मुलं जातात. शाळेने सुद्धा गेले ३० वर्षं प्रकल्पाला अतिशय चांगलं सहकार्य केलं आहे. त्यांना दर रविवारी मांसाहारी आहार दिला जातो. ही मुलं अतिशय काटक असतात आणि खेळांमध्ये निपुण असतात त्यामुळे फुटबॉल, बॉक्सिंग सारख्या खेळांमध्ये ही मुलं दरवर्षी  शाळेच्या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व करून जिल्हा तसेच राज्यस्तरावर अनेक पदक पटकावतात. मुलांसाठी प्रकल्पामध्ये सर्व सणवार साजरे केले जातात. गणपती किंवा महालक्ष्मीच्या दिवशी प्रकल्पाशी जोडल्या गेलेल्या कुटुंबांच्या घरी त्यांना आवर्जून पाठवलं जातं. ही मुलं त्या सणसमारंभात सहभागी होतात याशिवाय आपले १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हे राष्ट्रीय सण साजरे केले जातात. त्यांची राहण्या-खाण्याची, शाळा, वह्या पुस्तक दप्तर तसेच जाण्या-येण्याची सोयही प्रकल्पामार्फत केली जाते. त्या मुलांना दूरध्वनीद्वारे आपल्या पालकांशी संपर्क साधण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली जाते. सर्वच मुलं इथलं विश्वसनीय वातावरण पाहून अतिशय आनंदात, सुरक्षित वातावरणात इथे मिळून मिसळून राहू लागतात. चित्रकला, गीतगायन स्पर्धांमध्ये ही मुलं सहभागी होतात. काही विद्यार्थी संघाच प्रशिक्षणही घेतात. लातूरमध्ये शिक्षण घेतलेल्या काही विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थी एमबीए झाले आहेत तसेच एक मुलगा डॉक्टरही झाला आहे. ही मुलं पुन्हा मेघालयमध्ये जाऊन चांगलं काम करत आहेत त्याशिवाय संघाचं कार्यही मेघालयमध्ये ते करतात.

प्रकल्पाचे काम संपूर्णपणे समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीने होते. २०१८ साली लातूरला ८ वसतिगृहाचे एकत्रित दिवाळी शिबीर घेण्यात आले होते. तेव्हापासून लातूरमधली जवळपास ३००० कुटुंबं प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे या  प्रकल्पाशी जोडली गेली. सणावाराला या मुलांना आपल्या घरी नेणं, आर्थिक मदत, शैक्षणिक सहकार्य ही मंडळी करत असतात. लातूरमध्ये छात्रावास चालवण्याबरोबरच मेघालयमध्ये मदतीचा हात देखील प्रकल्पाद्वारे पुढे केला जातो. मेघालयमधल्या गरुडांचल विद्यापीठाला आर्थिक मदत प्रकल्पांना दिली होती. त्यासाठी लातूरमध्ये २०१० साली चातुर्मासात २००० व्यक्तींकडून प्रति दिवस फक्त एक रुपया गोळा करण्यात आला आणि त्या माध्यमातून दोन लाख रुपये यांचा निधी उभा राहिला होता. तो निधी गरुडांचल विद्यापीठाला प्रदान करण्यात आला होता. यानिमित्ताने लातूरमधील व्यापारी, शिक्षण संस्था, सामाजिक कार्यकर्ता यांच्याशी संपर्क झाला आणि त्यामुळे ईशान्य क्षेत्र हा विषय लोकांपर्यंत परिणामकारकरीत्या पोहोचला.

लोकांचा प्रतिसाद पाहून चातुर्मासातील निधी संकलन पुढची तीन वर्षं करण्यात आले आणि त्यातून ५००० कुटुंब या प्रकल्पाशी जोडली गेली. यापैकी रस दाखवणाऱ्या ३५ जणांना मेघालयमध्ये सहलीसाठीही नेले गेलेय. तिथल्या परिस्थितीची तसेच निसर्ग सौंदर्याची देखील त्यांना त्यानिमित्ताने माहिती होते. विशेषतः या मंडळींना तिथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरी नेऊन त्यांच्या पालकांची ही भेट घडवून दिली जाते. इथल्या एकेका मुलामुळे मेघालयातील संघ कार्यकर्त्याला तेथील एक एक गांव आपलंस करता येणं शक्य झालं आहे. या योजनेत महाराष्ट्रातून शिक्षण पूर्ण करून पूर्वाचलात परतलेले ६०-७० विद्यार्थी आपापल्या भागात शिक्षक, वैद्यकीय सेवा, अभियंता, व्यापारी इ. कामात कार्यरत असून राष्ट्रीय विचारांचा प्रसार ही करीत आहेत. लातूर वसतिगृहातून बाहेर पडलेला वैष्णव कोच चिपळूण येथे बी.ए.एम्.एस्.चे शिक्षण पूर्ण करून मेघालयातील ग्रामीण भागात ‘दुमदुमा’ या त्याच्या गावी वैद्यकीय सेवा देत आहेत. इग्लिंश स्कूलचे संस्थाचालक मकरंद सावे, प्राचार्य भोगडे सर, राजेश बाकलीकर सर हे मुलांच्या अॅडमिशन व शैक्षणिक कार्यात गेली ३० वर्षं सहकार्य करत आहेत.

वसतिगृहाला अतुल ठोंबरे यांच्या संपर्कातून मोहळकर आजींनी जागा अल्पदरात दिली होती. त्यावर सध्याची इमारत उभी आहे. इमारत नुसती उभारून चालत नाही, तर त्याचं व्यवस्थापन प्रमाणिक आणि अचूक ठेवावं लागतं. वसतिगृहाचं व्यवस्थापन सांभाळण्याचं काम  मनीषा दशरथ, नलिनी पत्की, सध्या शितोला कोच  चोख  बजावत आहेत. आतापर्यंत रमेशराव अंधोरीकर, निशिकांत अंधोरीकर, सीमाताई अयाचित, शरदराव कुलकर्णी, विनोद कुचेरिया, नितीन शेटे, वर्षा शेटे यांच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी बहुमोल असं काम केलं आहे. सर्वात पहिली बॅच तर नितीन शेटे व वर्षा शेटे याच्या घरात सुरू झाली होती. दादा बिलोलीकर, विनोद कुचेरिया, सुरेशराव अंकुलवार, विलास एकतारे, जनकल्याण समितीचे संघटक शरदभाऊ खाडीलकर, पूर्वांचलचे संयोजक संजय काठे, हरिभाऊ चौधरी, लीलाताई कुलकर्णी, केदार जोशी अशा अनेकांच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळे छात्रावासाच ३० वर्षं सलग काम लातूर इथे सुरू आहे.
 joshishibani@yahoo. com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -