Sunday, April 20, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखशिक्षणाची नवी दिशा-नवी संकल्पना - कौशल्य विद्यापीठ

शिक्षणाची नवी दिशा-नवी संकल्पना – कौशल्य विद्यापीठ

प्रा. डॉ. अपूर्वा पालकर, कुलगुरू महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ

कौशल्य विद्यापीठांची संकल्पना अलीकडच्या काळातली आहे. नुकतीच काही राज्यांनी यांची स्थापना केली आहे. हरियाणा, दिल्ली, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, आसाम यांसारख्या राज्यात ही विद्यापीठं आहेत. कौशल्य प्रशिक्षण हे या पूर्वी २००८ ला स्थापन झालेल्या राष्ट्रीय कौशल विकास निगमद्वारे प्रमाणपत्र व अनेक योजनांद्वारे मनुष्यबळ विकसित करीत होते. सेक्टर स्किल कॉउंसिलसची ही स्थापना करण्यात आली. यात अनेक उद्योग क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश होता व प्रमाणपत्रावर आधारित अभ्यासक्रमांची निर्मिती करण्यात आली. पदवी व पदव्युत्तरची जोड नसल्याने हे कौशल्य प्रशिक्षित युवक व युवतींना साधे अभ्यासक्रम किंवा दूरशिक्षण प्रणालीद्वारे पदवी घेत होते. कौशल्यावर आधारित पदवी व पदव्युत्तरची संकल्पना कौशल्य विद्यापीठाद्वारे आणण्याचा उत्तम प्रयत्न केंद्र शासनाने केला आहे. नॅशनल करीक्युलम फ्रेमवर्क यात कौशल्यावर आधारित व पारंपरिक विद्यापीठद्वारे चालविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांचे क्रेडिट फ्रेमवर्क दिलेली आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातही कौशल्यावर भर देण्यात आला आहे. कौशल्य विद्यापीठात ४०% क्लासरूम व ६०% स्किलवर आधारित अभ्यासक्रम देण्याची संकल्पना आहे

राज्य शासनाने स्थापित केलेले कौशल्य विद्यापीठ हे राज्यव्यापी विद्यापीठ असणे अपेक्षित आहे. राज्य विधेयकातून यांची निर्मिती झाली आहे. हरियाणातील विश्वकर्मा कौशल्य विश्वविद्यालय याची निर्मिती २०१६ ला झाली. जवळजवळ सहा वर्षांनी मागच्या वर्षी इमारतीचे बांधकाम दुधोला पालवल येथे झाले. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाची २०२२, आसाम स्किल युनिव्हर्सिटीची स्थापना २०२०, गुजरात स्किल युनिव्हर्सिटी २०२१, दि राजस्थान युनिव्हर्सिटी २०१७, दिल्ली स्किल्स युनिव्हर्सिटी २०२० ची स्थापना झाली आहे. त्याच धर्तीवर देशात अनेक इतर राज्यांनी कौशल्य विद्यापीठाची घोषणा केली आहे.

दिल्ली स्किल्स युनिव्हर्सिटी यांनी ब्राऊन फील्ड पद्धतींनी दिल्लीत असलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय डिप्लोमा कॉलेजेसचा विद्यापीठात समावेश करून घेतला. इथे तांत्रिकी शिक्षणाबरोबरच इतर कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम देण्यात येत आहे. असल्या मूलभूत सुविधांचा उपयोग करून या विद्यापीठांनी कार्य आरंभ केला आहे. राजस्थानच्या कौशल्य विद्यापीठ यांनी महाविद्यालयांना संलग्नता दिली आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, नवी मुंबई, पुणे व नागपूर येथे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम चालू केले आहे. अभ्यासक्रम तयार करणे, लॅबोरेटरी, वर्ग खोल्या, प्राध्यापक, भौतिक सुखसुविधा, अभ्यास मंडळाची स्थापना, विद्यापरिषदेची स्थापना व कौशल्य विद्यापीठाला लागणारे उद्योग जगाशी निगडित ऑन द जॉब ट्रेनिंग इतर नियामक मंडळाची स्थापना करणे, परीक्षा विभागाची स्थापना, परीक्षा मंडळ, फी समिती, परिनियम अशा अनेक बाजू विद्यापीठाच्या स्थापनेपासून करणे आवश्यक होते. ग्रीनफिल्ड प्रोजेक्ट असलेल्या महाराष्ट्र, आसाम, हरियाणा, गुजरात इथे स्थित विद्यापीठ किमान ५ वर्षांत म्हणजे एक चार वर्षाची बॅच बाहेर पडल्यावर त्याचे प्रभाव सगळ्या पर्यंत पोहोचतील.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठात २१ अभ्यासक्रमांची निर्मिती करण्यात आली आहे. उद्योग समूहांबरोबर ५५ करार केले असून सगळ्या अभ्यासक्रमात उद्योग समूह विद्यार्थ्यांना ऑन द जॉब ट्रेनिंग देणार आहे. टाटा ट्रेंट, मॅकडोनाल्ड, मेट्रोपोलीस, केपीएमजी, पर्सिस्टन्ट सिस्टिम्स, वर्ल्ड ट्रेड सेन्टर सारख्या कंपन्यांचाच संस्थांचा समावेश आहे. कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमात डिझाईन थिंकिंगवर भर देण्यात आला आहे. विद्यापीठांनी या वर्षी युरोपच्या नामवंत डिझाईन संस्था रुबिकबरोबर करार करून जागतिक दर्जाचा बीडीईएस इंडस्ट्रियल डिझाईन, इनटरॅशनल डिझाईन अशा कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाची निर्मिती केली आहे. विद्यापीठांनी आंतरराष्ट्रीय प्लेसमेंट्ससाठी एनएसडीसी इंटरनॅशनल बरोबर करार केला असून जपानी, जर्मन या भाषेचे कौशल्य प्रशिक्षण येथे देण्यात येत आहे. प्रशिक्षित विद्यार्थ्यांना त्या देशांमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याचे कार्य या केंद्राद्वारे करण्यात येणार आहे.

सध्या इथे १०० प्रशिक्षणार्थी भाषेचे कौशल्य प्राप्त करता आहेत. मेकॅट्रॉनिक्स, सिव्हिल ॲण्ड कॉन्संट्रेशन मॅनेजमेण्ट, कॉम्पुटर टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजी सारखे पदवी अभ्यासक्रम चालू केले आहेत. यात प्रायोगिक तत्त्वावर पहिल्या वर्षी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून या वर्षी पूर्ण संख्येत विद्यार्थी प्रवेश घेतील. विद्यापीठांनी सेंट्रल युनिव्हर्सिटी एन्ट्रान्स टेस्टद्वारा विद्यार्थी घेणार असून इतर राज्यव्यापी, शासकीय देशव्यापी प्रवेश परीक्षेचे स्कोर असलेले विद्यार्थी पण प्रवेश घेऊ शकतील. विद्यापीठांनी I-स्पार्क फाऊंडेशनची स्थापना केली आहे व यात नवोपक्रमांना प्रोत्साहन देणे, मेन्टॉरिंग करणे, सीड फंड देणे इत्यादी काम चालू आहे. हे विद्याविहारला स्थित असून काही नवसंशोधन संशोधक करणारे इथे कार्यरत आहेत. विद्यापीठांनी २० महाविद्यालयांत प्री इनक्युबेशन केंद्रांची स्थापना केली असून १०० नवसंशोधकांनी आपले प्रस्ताव विद्यापीठात सादर केले आहेत.

ठाण्यात संत गाडगेबाबा स्वच्छता अकादमीची निर्मिती विद्यापीठांनी केली असून बीबीए फॅसिलिटी मॅनॅेजमेण्ट व इतर सर्टिफिकेट कोर्सेस भारत विकास ग्रुप या कंपनीबरोबर करार करून देण्यात येत आहेत. ३ महिन्यांत ३०० लाभार्थींनी याचा उपयोग केला असून त्यांना रोजगार प्राप्त झाला आहे. विद्यापीठाचे बिग डेटा, आर्टिफिसिअल इंटेलेन्स, सायबर सिक्युरिटीवर आधारित एमटेक कोर्सेसला चांगला प्रतिसाद आहे. कौशल्य विद्यापीठ हे पारंपरिक विद्यापीठांना पूरक असून कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमात क्रेडिट अॅवॉर्ड करू शकतात. आरपीएलच्या माध्यमानातून विद्यापीठचे उद्योग क्षेत्रात काम चालू केलेले आहे. विद्यापीठ हे १००% नवीन शैक्षणिक धोरणावर आधारित असून विद्यापीठाने प्रोफेसर-ऑफ -प्रॅक्टिस नेमले आहेत. नुकताच विद्यापीठाचा आकृतीबंद शासनाने मान्य केला असून प्राध्यापकांची नेमणुकेचे काम चालू होईल.

जशी म्हण आहे ‘रोमची निर्मिती एका दिवसात झाली नव्हती’ तसेच विद्यापीठाचे निर्माण करण्यात काही वर्षं लागतात. कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्याचा भारताचं नव्हे तर जगभरतील पहिला प्रयोग आहे. भारताने कौशल्य क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे व कौशल्य विद्यापीठ हे जगभर भारतीय मनुष्यबळ देण्यात सहभागी होतील. काळाच्या गरजेनुसार शिक्षणात बदल होणे अपेक्षित आहे. कौशल्य विद्यापीठ हे अप्लाइड युनिव्हर्सिटी या धरतीवर बदल घडवतील. आज वर्ल्ड स्किल डेच्या निमित्याने या नावीन्यपूर्ण विद्यापीठाची संकल्पना यशस्वी होईल व भारत हे खऱ्या अर्थाने जगभर कौशल्य मनुष्यबळ देईल यात शंका नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -