दोन्ही कंपन्यांकडून डिलीव्हरी चार्जेसमध्ये ‘इतकी’ वाढ
मुंबई : सातत्याने जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत होत असलेल्या वाढीमुळे सामान्यांच्या खिशाला मोठा भार (Inflation) सहन करावा लागत आहे. त्यातच आता ऑनलाईन जेवण मागवणंही (Online food order) महाग होणार आहे. त्यामुळे नागरिकांना आणखी एक झटका बसणार आहे. झोमॅटो (Zomato) आणि स्विगी (Swiggy) या दोन्ही फूड डिलीव्हरी कंपन्यांनी (Food delivery company) आपल्या डिलीव्हरी चार्जेसमध्ये २० टक्क्यांची वाढ केली आहे. फूड डिलीव्हरीसाठी पाच रुपये घेणाऱ्या या दोन्ही कंपन्या आता प्रत्येक ऑर्डरसाठी सहा रुपये घेणार आहेत.
झोमॅटो आणि स्विगी या ऑनलाईन जेवणाच्या ऑर्डर पुरवणाऱ्या दिग्गज कंपन्या आहेत. या क्षेत्रात या दोन कंपन्यांची मक्तेदारी आहे. मात्र, त्यांच्या या वाढीव चार्जेसच्या निर्णयामुळे ऑनलाईन फूड मागवणाऱ्यांच्या खिशाला झळ बसणार आहे. वाढीव चार्जेसचा निर्णय हा बंगळुरू, दिल्ली या ठिकाणी सध्या लागू केला जाणार आहे.
प्लॅटफॉर्म फी म्हणजे नेमकं काय?
स्विगी आणि झोमॅटो या दोन्ही कंपन्यांनी गेल्या वर्षापासून प्लॅटफॉर्म फी घेणं चालू केलं आहे. ही फ्लॅटफॉर्म फी अगोदर दोन रुपये होती. नफा वाढवण्यासाठी अशा कंपन्यांसाठी प्लॅटफॉर्म फी आकारली जाते. प्रत्येक ऑर्डरवर घेतले जाणारे चार्जेस म्हणजेच प्लॅटफॉर्म फी आहे.
प्लॅटफॉर्म फी वाढवण्याचं नेमकं कारण काय?
स्विगी आणि झोमॅटोकडून नफावाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या कंपन्यांनी आपल्या प्लॅटफॉर्म फीमध्ये वाढ केली आहे. जाहिरातीच्या माध्यमातूनही या कंपन्यांना काही प्रमाणात महसूल मिळतो. रेस्टॉरंट्सकडून मिळणाऱ्या कमिशनमध्ये वाढ करण्याची संधी या कंपन्यांना दिसत नाही आहे. यामुळेच ग्राहकांकडून घेतल्या जाणाऱ्या प्लॅटफॉर्म फीमध्ये या कंपन्यांनी वाढ केली आहे.