अजित पवार गटाला दोन तर शरद पवार गटाला एका आठवड्याची मुदत
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (Nationalist Congress Party) फूट पडून एका वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. मात्र, अद्याप खरी राष्ट्रवादी कोणाची यावर सर्वोच्च निकाल आलेला नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) बहुमताच्या जोरावर अजित पवार गटाला (NCP Ajit Pawar Group) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मूळ नाव आणि ‘घड्याळ’ हे चिन्ह बहाल केलं. तर शरद पवार गटाला (Sharad Pawar Group) ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे चिन्ह देण्यात आलं. मात्र, शरद पवार गटाने याविरोधात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल केली. आज या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने अजित पवार गटाला काही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
सुप्रीम कोर्टाकडून अजित पवार गटाला दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच अजित पवारांच्या उत्तरावर जर शरद पवार यांना प्रतिवाद सादर करायचा असेल तर एका आठवड्यात शरद पवारांनी तो दाखल करावा, असेही कोर्टाने म्हटले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑगस्टला होणार आहे. त्यामुळे पुढील सुनावण्यांमध्ये सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.