
हार नाकारल्याने भाविकांमध्ये संतापाचे वातावरण
धाराशिव : छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) आराध्यदैवत तुळजाभवानी (Tuljabhavani Devi) म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी. मात्र आई तुळजाभवानीचे मंदिर यावेळी वेगळ्याच गोष्टींसाठी चर्चेत आले आहे. काही दिवसांपूर्वी मंदिर संस्थानातल्या ५० पेक्षा जास्त महत्त्वाच्या फाईल्स गायब झाल्या होत्या. त्यानंतर देवीचे पुरातन आणि मौल्यवान सोन्या-चांदीचे दागिने देखील चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर मागील आठवड्यात तुळजाभवानी देवीला एका भक्ताने दिलेला चॉकलेटचा हार (Chocolate Necklace) अर्पण केला होता व पुजाऱ्याने मंदिर संस्थानच्या परवानगीने तो देवीच्या गळ्यात घातला होता. या प्रकरणामुळे तुळजाभवानी देवी मंदिर संस्था वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.
हे प्रकरण ज्वलंत असतानाच आता देवीला भक्तांनी वेलची आणि लवंगाचा (Elaichi And cloves) हार अर्पण केला. मात्र हा हार नाकारल्याने भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे मंदिर प्रशासनाचा पुन्हा एकदा नवा वाद पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भोपे पुजारी मंडळाची नाराजी
भाविकांनी तुळजाभवानी देवीला चॉकलेटच्या हार आणल्यानंतर वेलची आणि लवंगाचा हार देखील अर्पण केला. मात्र मंदिर प्रशासनाने तो हार न घातल्यामुळे भाविक आणि भोपे पुजारी मंडळातून मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर, भाविकांनी मोठ्या श्रध्देने देवीला वाहण्यासाठी काहीना काही आणलेले असते. मात्र मंदिर प्रशासन चुकीच्या लोकांच्या मागणीला ग्राह्य धरुन भक्तांनी आणलेल्या गोष्टी नाकारुन त्यांच्यावर अन्याय करत आहे. काही भक्तांनी आणलेल्या साड्या देखील देवीला चढवल्या जात नाहीत, त्यामुळे लोकांच्या मागणीला ग्राह्य धरुन मंदिर प्रशासन किती दिवस अन्याय करणार? असा प्रश्न अमरराजे कदम यांनी उपस्थित केला.