Sunday, April 20, 2025
Homeब्रेकिंग न्यूजChhagan Bhujbal : छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्यात नेमकी काय चर्चा...

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्यात नेमकी काय चर्चा झाली?

भुजबळांनी दिली ए टू झेड माहिती

मुंबई : राज्यात पेटलेल्या ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या बैठकीच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी काल शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली होती. यानंतर आज ते शरद पवारांच्या भेटीसाठी थेट सिल्व्हर ओकवर रवाना झाले. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं. मात्र, शरद पवारांची वेळ न घेता थेट भेटीसाठी आल्याने छगन भुजबळांना वेटिंगवर ठेवण्यात आलं होतं. दीड तासांनंतर त्यांना भेटीसाठी आत बोलावलं. त्यांच्यात तब्बल अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती आहे. या भेटीत नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याबाबत स्वतः छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत ए टू झेड माहिती दिली आहे.

छगन भुजबळ म्हणाले, आज पवारसाहेबांकडे सकाळी गेलो होतो. अर्थात त्यांची काही अपॉइन्मेंट वगैरे घेतली नव्हती. फक्त ते घरी आहेत एवढं मला कळलं होतं. साधारण सव्वा दहा वाजता मी गेलो. ते घरी झोपले होते. त्यांची तब्बेत बरी नव्हती. त्यामुळे मी थोडं थांबलो. ते उठल्यानंतर त्यांनी मला बोलावलं. ते बिछान्यावरच होते. तब्बेत बरी नसल्याने ते उठले होते. साधारण आम्ही दीड तास विविध विषयांवर चर्चा केली. मी त्यांना सांगितलं मी काही राजकारण घेऊन आलेलो नाही, मंत्री म्हणून नाही, आमदार म्हणून आलेलो नाही. कुठली पक्षीय भूमिका माझी नाही.

पुढे भुजबळ शरद पवारांना म्हणाले, महाराष्ट्रात ओबीसींना आरक्षण देण्याचं काम तुम्ही राबवलं. परंतु आता राज्यात काही जिल्ह्यांमध्ये फार स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. काही लोक मराठा समाजाच्या हॉटेलमध्ये जात नाहीत, काही लोक ओबीसी, धनगर किंवा कोणत्याही समाजाच्या दुकानात जात नाही. अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे. राज्याचे ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे की हे सर्व शांत झालं पाहिजे. त्यांना एक आठवण करुन दिली की, बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देत असताना, मराठवाडा पेटला होता, त्यावेळी शांत करुन तुम्ही निर्णय घेतला आणि सरकारचं जे काही होईल ते होईल, याचा विचार न करता बाबासाहेबांचं नाव दिलं.

आजची परिस्थितीही काहीशी तशीच आहे. तुम्ही बैठकीला आला नाहीत. तर त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला माहिती नाही, जरांगेंना मंत्री आणि मुख्यमंत्री भेटले, त्यांनी काय चर्चा केली, काय आश्वासने दिली माहिती नाही. तुम्ही अखेर ओबीसी नेत्यांची उपोषणं सोडायला गेला, त्यांना काय सांगितलं ते सुद्धा आम्हाला माहिती नाही, असं शरद पवारांनी मला सांगितलं.

तुम्ही यामध्ये पुढाकार घ्यायला हवा

त्यावर मी त्यांना सांगितलं की हाके आणि उपोषण करणाऱ्यांना सांगण्यात आलं आहे की उपोषण सोडा आणि चर्चा करु, त्यावर मार्ग काढू. जरांगेंना सरकारने काय सांगितलं हे मला माहिती नाही. ते तुम्ही शरद पवारांनी विचारायला हवं, मुख्यमंत्र्यांना विचारायला हवं. तुम्ही आज राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत, आणि सर्व समाजघटकांची गावागावात जिल्ह्याजिल्ह्यात काय परिस्थिती आहे याचा अभ्यास तुम्हाला जास्त आहे. आम्ही मंत्री झालो किंवा मुख्यमंत्री झालो म्हणजे आम्हाला सगळाच अभ्यास आहे असं समजायाचं कारण नाही. त्यामुळे तुम्ही यामध्ये पुढाकार घ्यायला हवा, असं मी म्हणालो.

चर्चा करायला मी तयार : शरद पवार

त्यावर पवार साहेब म्हणाले, आम्ही आलो नाही कारण आम्हाला तुम्ही काय चर्चा केली हे माहितीच नाही. शिवाय ५० लोकांमध्ये कशी काय चर्चा होऊ शकते. यावर मी म्हणालो, तुम्ही सांगा, तुम्ही बोलवा कुणाकुणाला, आम्ही यायला तयार आहोत. त्यावर त्यांनी विचारलं कुणाची काय काय मतं आहेत ते सांगा. मग पवार साहेब म्हणाले, मी एक दोन दिवसात मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलतो, आम्ही काही लोक एकत्र बसतो, काय करायला पाहिजे, कसा प्रश्न सोडवता येईल यावर चर्चा करायला मी तयार आहे, असं पवार म्हणाले. मी म्हणालो, तुम्ही सांगितलं, तुम्ही बोलावलं तर सगळे मंत्री येतील, मुख्यमंत्रीही येतील.

राज्यातील वातावरण शांत असायला हवं : छगन भुजबळ

छगन भुजबळ म्हणाले, हा प्रश्न सोडवावा, ओबीसी, मराठा समाजाचा प्रश्न सुटावा, हे तंग वातावरण शांत व्हावं हा माझा हेतू आहे. यासाठी मी कुणालाही भेटेन. राहुल गांधी असो की पंतप्रधान सर्वांना भेटायला मी तयार आहे. परंतु राज्यातील वातावरण शांत असायला हवं, गोरगरिबांची घरं पेटता कामा नये, एकमेकांच्या जीवावर उठता कामा नये, यामध्ये कोणतंही राजकारण नाही. त्यावर पवार म्हणाले, तुम्ही मीडियाला सांगा आम्ही यामध्ये राजकारण आणणार नाही. सामाजिक प्रश्न म्हणून याकडे बघून, काही लोकांशी चर्चा करु.

ओपनमध्ये चर्चा होणं कठीण दिसतं

आमची दीड तास चर्चा झाली. धनगर आरक्षणावरही चर्चा झाली. सर्व समाजाच्या आरक्षण प्रश्नावर चर्चा झाली. सर्व प्रश्नावर साधक बादक चर्चा झाली. ते तयार झालेत, दोन चार लोकांना ते बोलावतील किंवा मी येतो असं ते म्हणाले. ओपनमध्ये चर्चा होणं कठीण दिसतं, त्याला राजकारणाचा वास लागतो आणि प्रश्न सुटण्याऐवजी वाढत जातो. त्यामुळे याबाबत काय करता येईल, काय पावलं उचलायला हवी हे कळून येईल.

मला ना राजकारणाची पर्वा आहे, ना आमदारकीची

हा राजकारणाचा विषय नाही, जे सभागृहात झालं ते सांगितलं. मला ना राजकारणाची पर्वा आहे, ना आमदारकीची, ना मंत्रि‍पदाची. राज्य शांत व्हायला हवं, मी कुणालाही भेटण्यास, कुणाच्याही घरी जायला, कुणालाही विनंती करायला मला कमीपणा वाटणार नाही. मी शरद पवारांच्या भेटीला जाताना फक्त प्रफुल पटेल यांना बोललो. कोणत्या विषयावर बोलणार आहे हे सांगितलं, त्यावर ते जा म्हणाले, असंही शेवटी छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -