रायगडला रेड तर मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
मुंबई : पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यभरात पावसाची शक्यता वाढली असून, कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे. मंगळवारी त्यामुळे रायगडला रेड तर मुंबई शहर आणि उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाचे प्रमुख सुनील कांबळे यांनी दिली.
बुधवारी आणि गुरुवारी सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर शुक्रवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सोमवारी मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने दमदार हजेरी लावली. दक्षिण, दक्षिण मध्य मुंबईसोबतच पूर्व उपनगरात सर्वत्र सकाळी दमदार पाऊस पडला. कुर्ला, सायन, विद्याविहार, घाटकोपर परिसरात दुपारी ३ वाजेपर्यंत अधून-मधून तुरळक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. तर दक्षिण आणि दक्षिण मध्य मुंबईतही पाऊस लागून राहिला होता.
पश्चिम उपनगरात पावसाच्या रिमझिम सरी कोसळत होत्या. दुपारी ३ नंतर मात्र पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाल्याचे चित्र होते. दरम्यान, दुपारपर्यंत कोसळलेल्या पावसाने चाकरमान्यांसह पालक आणि विद्यार्थ्यांची कसरत सुरु असल्याचे चित्र होते.