अतिक्रमण मुक्ती आंदोलनाला लागलं हिंसक वळण
कोल्हापूर : संभाजी राजे छत्रपती यांनी विशाळगडावरील अतिक्रमण हटवा मोहिमेसाठी आक्रमक पवित्रा घेतला व ते काल विशाळगडाकडे (Vishalgad) शेकडो कार्यकर्त्यांसह रवाना झाले. मात्र, या मोहिमेला हिंसक वळण लागलं. विशाळगडावरील स्थानिकांवर हल्ला झाल्याचा प्रकार घडला आहे. इतकेच नव्हे तर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांवर सुद्धा हल्ला झाल्याचा आरोप होत आहे. विशाळगड परिसरातील वाहनांची तोडफोड तसेच घरांची तोडफोड करण्यात आली. यानंतर आता कोल्हापूर पोलिसांकडून गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रकरणी पुण्यातील रवींद्र पडवळ आणि कोल्हापुरातील बंडा साळोखे यांच्यासह ५०० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, कोणत्याही परिस्थितीत विशाळगडावर जाणार अशी भूमिका घेतलेल्या संभाजी राजे छत्रपती यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया शाहूवाडी पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे. ५०० लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कलम १३२, १८८ (२), १९०, १९१ (२) , १९१ (३), ३२३, २९८, २९९ (४९), १८९ (५) यासह पोलिस अधिनियम ३७ (१) उल्लंघन १३५ यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील रवींद्र पडवळ आणि आणि संभाजी राजे यांच्या नेतृत्वात विशाळगडाच्या पायथ्याशी दोन वेगवेगळी आंदोलने करण्यात आली. पोलीस तापासामध्ये आणखी नावे निष्पन्न होण्याची शक्यता आहे. सीसीटीव्ही आणि इतर रेकॉर्डिंग पाहून कोल्हापूर पोलीस गुन्हा दाखल करणार आहेत.
रात्री एक वाजता मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात कायदा, सुव्यवस्थेची घेतला आढावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात जाऊन मध्यरात्री विशाळगडाची माहिती घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्री एक वाजता शिंदे कोल्हापुरात आले होते. त्यांनी आपल्या या दौऱ्यात कोल्हापूरच्या आयजींकडून विशाळगडाबाबत तसेच येथील परिस्थितीबाबत माहिती घेतली आहे. तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी त्यांनी आवश्यक तो बंदोबस्त करावा, असे सांगितले आहे. त्यांनी येथील कायदा आणि सुव्यवस्थेबाबतही आयजींसोबत चर्चा केली आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे हे पंढरपूरच्या दौऱ्यावर होते. मात्र त्यांनी अचानक आपला मोर्चा वळवून रात्री एक वाजता थेट कोल्हापूरची वाट धरली आणि विशाळगडाच्या अतिक्रमणाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा केली.