मुंबई : `कॅम्लिन फाईन सायन्सेस`चे संस्थापक व `कोकुयो कॅम्लिन`चे मानद अध्यक्ष सुभाष ऊर्फ दादासाहेब दिगंबर दांडेकर यांचे सोमवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या मागे मुलगा आशिष व मुलगी अनघा असा परिवार आहे. दांडेकर यांच्या निधनाबद्दल उद्योग व सामाजिक वर्तुळातून तीव्र दु:ख व्यक्त होत आहे.
सुभाष दांडेकर हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. मुंबई येथील हिंदुजा रुग्णालयात सोमवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी दांडेकर परिवारातील सदस्य, कॅम्लिन समुहातील कर्मचारी व उद्योग क्षेत्रातील मान्यवर आदी उपस्थित होते.
सामाजिक भान, कलेची जाण व उद्यमशीलता अंगी बाळगणा-या सुभाष दांडेकर यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात आला आहे.
सुभाष दांडेकर यांच्या सामाजिक दायित्त्वाच्या भूमिकेमुळे ते शुश्रुषा सिटिझन्स को-ऑप रुग्णालयाशी जोडले गेले. विविध सामाजिक संस्था तसेच `सिकॉम`सारख्या अनेक उद्योग संघटनांचे ते मार्गदर्शक बनले. `महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री`चे ते माजी अध्यक्ष होते. संबंधित क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना “गेम चेंजर्स ऑफ महाराष्ट्र”, “लाइफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड” अशा पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले.
कॅम्लिन शाई सुप्रसिद्ध आहे. शालेय विद्यार्थ्यांना लागणारी गणितीय उपकरणे, पेन्सिल, मार्कर, शाई तसेच चित्रकार व अन्य कलाकारांना लागणारे सर्व प्रकारचे साहित्य, कार्यालयीन उत्पादने आणि व्यावसायिक उत्पादनांची निर्मिती कॅम्लिन या कंपनीकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. त्यांच्या निधनाने एक उत्तम उद्योजक व रंगांचा जादूगार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सकडून श्रद्धांजली
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दांडेकर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं. ‘दांडेकर हे राज्याच्या उद्योग क्षेत्रातलं प्रमुख व्यक्तिमत्त्व होतं. त्यांनी हजारो मराठी उद्योजकांना बळ दिलं. अनेक तरुणांना रोजगार दिला. त्यांच्या रूपानं मोठा आधारवड गेल्याची भावना सर्वांच्या मनात आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात राज्यातील संपूर्ण उद्योग क्षेत्र सहभागी आहे, अशा शब्दांत ललित गांधी यांनी सुभाष दांडेकर यांना श्रद्धांजली वाहिली.