मुंबई: गेल्या दोन दिवसांपासून कोकणात पावसाने धुमशान घातले आहे. रत्नागिरी तसेच रायगड जिल्ह्याला तर पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी तसेच रायगड जिल्ह्यातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील रेल्वे वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. कोसळत असलेल्या संततधारेमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा तसेच कॉलेजना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या जिल्ह्यातील सर्व शाळा तसेच महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत.
कोकण रेल्वे ठप्प
मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेलाही बसला आहे. विन्हेरे ते दिवाणखवटी या स्थानकादरम्यान दरड कोसळल्याने माती संपूर्ण ट्रॅकवर आली आहे. यामुळे रेल्वेची वाहतूक बंद झाली आहे. दरम्यान, काही गाड्या विविध रेल्वे स्थानकात थांबवण्यात आल्या आहेत. प्रवाशांचे मात्र यामुळे प्रचंड हाल होत आहेत.
कोकण रेल्वे गेल्या १३ तासांपासून ठप्प आहे. यामुळे प्रवाशांचे मात्र अतोनात हाल झाले आहेत. अनेक रेल्वे गाड्या स्थानकांमध्ये अडकून पडल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
रेल्वे क्रमांक 22229 मुंबई सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे.
तर मडगाव-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस, मडगाव-मुंबई तेजस एक्सप्रेस, मडगाव-मुंबई कोकण कन्या एक्सप्रेस, तसे सावंतवाडी-दादर तुतारी एक्सप्रेस या रेल्वे गाड्या केवळ रत्नागिरीपर्यंतच धावणार आहे.