Tuesday, April 22, 2025
Homeताज्या घडामोडीConservation of forts : गडावर मद्यप्राशन करणार्‍या टवाळखोरांना सरकारचा दणका!

Conservation of forts : गडावर मद्यप्राशन करणार्‍या टवाळखोरांना सरकारचा दणका!

राज्य सरकार करणार कायद्यात बदल

नागपूर : गडकिल्ल्यांसारख्या ऐतिहासिक आणि पवित्र ठिकाणी जाऊन गैरवर्तन करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. काही टवाळखोर तरुण पर्यटनासाठी गडांवर जातात आणि त्या ठिकाणी मद्यप्राशन करतात. एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी घाण, कचराही केला जातो. वास्तूवर काही ठिकाणी नावे कोरली जातात. असं घाणेरडं कृत्य करणाऱ्या टवाळखोरांना आता राज्य सरकार चांगलाच दणका देणार आहे. आधी यासाठी केवळ दंड आकारला जायचा, मात्र आता राज्य सरकार कायदा बदलण्याच्या तयारीत आहे, असे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी कठोर पावले उचलली जातील, असं मुनगंटीवार म्हणाले. ते सोमवारी नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या अतिक्रमणावर कारवाई करणाऱ्या अतिक्रमणविरोधी पथकावर दगडफेक झाल्यासंदर्भात भाष्य केले. भविष्यात मोहीम म्हणून राज्यातील सर्व गडकिल्ल्यावरील अतिक्रमण हटवले जाईल. मी सांस्कृतिक खात्याचा कार्यभार हाती घेतल्यापासून गडकिल्ल्यांसंदर्भात गांभीर्याने काम केले जात आहे. पूर्वी गडकिल्ल्यांच्या डागडुजीसाठी १३ ते १४ कोटी रुपये खर्च व्हायचे. मात्र, यंदा गडकिल्ल्यांच्या देखभालीसाठी ८०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आगामी काळात सर्व गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवले जाईल. संबंधित व्यक्तींनी सामोपचाराने ऐकले नाही तर कठोर पाऊल उचलण्यात येईल, असा इशाराही सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.

तसेच लंडनच्या वस्तूसंग्रहालयातून आणण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांच्या मुद्द्यावरही मुनगंटीवार यांनी भाष्य केले. शिवाजी महाराजांच्या वाघनखांना घेऊन एका इतिहासकाराने विरोध केला आहे. मात्र, त्यामुळे राज्य सरकार आपली भूमिका बदलणार नाही, असे मुनगंटीवार यांनी म्हटले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -