काल जोरदार टीका आणि आज भेट; राजकीय वर्तुळात उडाली खळबळ
मुंबई : राज्यात पेटलेल्या ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या बैठकीच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी काल शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली होती. यानंतर आज ते शरद पवारांच्या भेटीसाठी थेट सिल्व्हर ओकवर रवाना झाले आहेत. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, शरद पवारांची वेळ न घेता थेट भेटीसाठी आल्याने छगन भुजबळांना वेटिंगवर ठेवण्यात आलं होतं. दीड तासांनंतर त्यांना भेटीसाठी आत बोलावलं. त्यांच्यात तब्बल अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती आहे.
छगन भुजबळ अचानक शरद पवार यांना भेटायला का आले, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे या भेटीबाबत अनेकांची उत्सुकता वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून भुजबळ नाराज असल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर आता छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले आहेत. ते भेटीनंतर काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या भेटीबाबत अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया
भुजबळ महायुतीचे मोठे नेते आहेत. महायुतीला नुकसान होईल, असं कोणतेही पाऊल ते उचलणार नाहीत. शरद पवार यांना भेटणे यात काहीही गैर नाही. आम्हीही अनेक वेळेला त्यांना भेटतो, असं बावनकुळे म्हणाले आहेत.
सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
शरद पवार आणि छगन भुजबळ भेटीबाबत काहीही माहिती नसल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. मी पुण्यात आहे तर, पवार साहेब मुंबईत आहेत. छगन भुजबळ त्यांना कशासाठी भेटायला गेलेत, हे मला सांगता येणार नाही अशी प्रतिक्रिया सुळेंनी दिली.