
महाराष्ट्राहून राजस्थानला जात होती बस
अहमदाबाद : गेल्या काही दिवसांत अपघातांच्या घटनांमध्ये (Accident news) प्रचंड वाढ झाली असून यामध्ये मोठी जीवितहानी होत आहे. अनेक चित्रविचित्र अपघाताच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यातच आता गुजरातमधून आणखी एक मोठी अपघाताची (Gujrat Accident) घटना समोर आली आहे. महाराष्ट्राहून राजस्थानला निघालेल्या एका प्रवासी बसचा गुजरातच्या आनंद जिल्ह्यात अहमदाबाद-वडोदरा एक्स्प्रेस हायवेवर ट्रकने दिलेल्या धडकेमुळे भीषण अपघात झाला. यात ६ जण जागीच ठार झाले तर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. आज पहाटे साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवासी बस महाराष्ट्रातून राजस्थान येथे जात होती. त्याचवेळी या बसला पहाटे साडेचारच्या सुमारास आनंद जिल्ह्यातील अहमदाबाद-वडोदरा एक्स्प्रेस हायवेवर अपघात झाला. लक्झरी बस पंक्चर झाली होती. त्यामुळे बस हायवेच्या बाजूला उभी होती. चालक, क्लिनर आणि प्रवासी बसखाली उभे होते. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या ट्रकने बसला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की ३ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ११ जण जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच, आनंद अग्निशमन दल, एक्स्प्रेस हायवे पेट्रोलिंग पथक आणि आनंद ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. पोलिसांनी जखमींना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल केले. जखमींमधील ३ जणांना रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. या अपघातामध्ये एकूण ६ जणांचा मृत्यू झाला, तर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.