Sunday, April 20, 2025
Homeसंपादकीयरविवार मंथनपावसाळ्यात मुंबई का कोलमडते?

पावसाळ्यात मुंबई का कोलमडते?

स्टेटलाइन: डॉ. सुकृत खांडेकर

गेल्या पन्नास वर्षांत बहुतेक काळ देशात सर्वात श्रीमंत असलेल्या मुंबई महापालिकेवर अगोदर काँग्रेस आणि नंतर अविभाजित शिवसेना-भाजपाची सत्ता होती. याच काळात राज्यात सुरुवातीला काँग्रेस नंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस (आघाडी) अविभाजित शिवसेना – काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (महाविकास आघाडी), आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाची (महायुती) सत्ता आहे. गेल्या पाच दशकांत महापालिका व राज्यात सत्तांतराचे अनेक खेळही झाले. डझनभर महापौर आले व गेले, तेवढेच मुख्यमंत्री सत्तेवर आले. कारभारी बदलले व नवीन आले पण देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगराची काळजी सत्ताधाऱ्यांनी पुरेशी घेतली नाही हे खेदाने म्हणावे लागेल. राजकारण व सत्ताकारण चालूच राहणार. सत्ताधारी व विरोधी पक्ष बदलत राहणार पण मुंबई महानगराच्या समस्यांकडे पुरेसे लक्ष दिले जाणार नसेल, तर राज्यालाच नव्हे तर त्याची किमत देशाला मोजावी लागेल…

मुंबई महानगराची लोकसंख्या दीड कोटींच्या घरात आहे. सर्व देशांतून रोजगारासाठी आलेले लोक या महानगरात राहत आहेत. मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावरील खचाखच भरलेल्या लोकल्स ट्रेनच्या गर्दीतून जीव मुठीत धरून मुंबईकर रोज प्रवास करीत असतात. पंचाहत्तर लाख मुंबईकरांची रोजी-रोटी, मुंबईची जीवनवाहिनी ओळखल्या जाणाऱ्या उपनगरी रेल्वे सेवेवर अवलंबून आहे. ही उपनगरी रेल्वे सेवा खंडित झाली, तर मुंबईत किती हाहाकार उडतो, याची प्रचिती पुन्हा एकदा गेल्या सोमवारी ८ जुलै रोजी आली. रात्री ६ तास कोसळलेल्या मुसळधार पावसाने मुंबई बंद केली. केवळ तीनशे मिमी झालेल्या पावसाने मुंबईची लोकल सेवा ठप्प झाली. रेल्वे मार्गावर व सर्व प्रमुख रस्त्यांवर तसेच लहान-सहान गल्ल्यांमध्ये नि अरुंद रस्त्यांवर पाणीच पाणी साचले. सहा तासांच्या पावसाने मुंबईची तुंबई झाली आणि देशाच्या आर्थिक राजधानीतील दैनंदिन जीवनाची चक्रे बंद पडली.

या देशात मुंबई हे एकच महानगर असे आहे की, ते चोवीस तास चालू असते. रेल्वे रात्री एक-दीडपर्यंत, तर बस, रिक्षा, टॅक्सी आदी वाहने रात्री उशिरापर्यंत कुठेही उपलब्ध असतात. मुंबई हे जसे श्रीमंत व गर्भश्रीमंतांचे शहर आहे, बॉलिवुडचे ग्लॅमर या शहराला आहे तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेचे चलनवलन याच महानगरातून होत असते. देशाला सर्वाधिक महसूल याच मुंबई महानगरातून दिला जातो. मग तीनशे मिमी. पावसाने मुंबईची चाके बंद कशी पडू शकतात? त्याला जबाबदार कोण? एक दिवस मुंबई बंद म्हणजे हजार-दीड हजार कोटींचे नुकसान होते, मग दरवर्षी पावसाळ्यात मुंबईत एकदा-दोनदा ठप्प होते, जनजीवन पूर्ण विस्कळीत होते, उपनगरी रेल्वेसेवा मान टाकते, या मुंबईकरांच्या वेदना कधी थांबणार? दरवर्षी पावसाळ्यात मुसळधार पावसाने मुंबईत अनेक रस्त्यांवर व सब-वेमध्ये पाणी तुंबते. वाहतूक बंद होते, ८ जुलैला तर अनेक रस्त्यांवर अंधेरी, मरोळ, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, कांजूरमार्ग तसेच लालबाग, परळ, शीव, माटुंगा अशी डझनावरी ठिकाणे तीन ते चार फूट पाण्याखाली होती. मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये घराघरांत पाणी शिरले होते. जिथे मेट्रोची, पुलांची व रस्त्यांची कामे चालू आहेत, जिथे निळे पत्रे लावून मोठं मोठे उतुंग टॉवर्स उभारण्याचे काम चालू आहे, तिथे रस्त्यावर मुसळधार पावसाने तलाव निर्माण झाले होते. पाण्याचा निचरा होण्यास मार्ग नसेल, तर पाणी वाहून जाणार तरी कुठे?

महापालिका व राज्य सरकारमधील कारभारी बदलले तरी कर्मचारी, अधिकारी तेच असतात. दरवर्षी पावसाळ्यात पाणी का तुंबते, मुंबईची तुंबई का होते, याचे कारण त्यांना पक्के ठाऊक असते. यावर्षी मुंबईत नालेसफाई ११० टक्के झाल्याचा दावा करण्यात आला होता. स्वत: मुख्यमंत्री व सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनी नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी केली होती. मग एका पावसातच मुंबई का पाण्याने वेढली गेली? सोमवारी विधिमंडळाचे अधिवेशन होते. बाहेरगावाहून येणारे काही मंत्री व आमदारही रेल्वे गाडीत अडकले होते, कोणी रेल्वेतून खाली उतरून रेल्वे मार्गावरून चालत होते, तर कोणी रेल्वेच्या दरवाजात उभे राहून गाडी कधी सुरू होणार याची वाट बघत होते. आमदार व मंत्री अडकले म्हणून त्यांना टीव्हीची प्रसिद्धी मिळाली, पण लक्षावधी मुंबईकर दरवर्षी पावसाळ्यात या यातना भोगतात, त्यावर विधिमंडळात कधी चर्चा होत नाही. महापालिका, रेल्वे, बेस्ट प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तसेच मुंबई पोलिसांना पावसाळ्यापूर्वी एकत्रित चर्चेला बोलावून मुंबईची तुंबई होऊ नये म्हणून काय काय उपाययोजना केली आहे व करायला हवी, यावर दरवर्षी चर्चा होत नाही. राज्य सरकार व महापालिका, रेल्वे, बेस्ट, मुंबई पोलीस यांच्यात समन्वय असणे सर्वात महत्त्वाचे आहे.

बॅ. ए. आर. अंतुले मुख्यमंत्री असताना त्यांच्या पत्नी नर्गिस या पुण्याला जाताना खंडाळा घाटात वाहतूक कोंडीत अडकल्या होत्या. त्याच सुमारास तत्कालीन ऊर्जामंत्री जयंतराव टिळक हे पुण्याहून मुंबईला येताना खंडाळा घाटात अनेक तास अडकले होते. स्वत: अंतुले यांनी खंडाळा घाटातील वाहतूक कोंडीची दखल घेतली व तातडीने घाटात पर्यायी मार्ग उभारण्याचा निर्णय घेतला. दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते व आर्थिक राजधानीचे जनजीवन ठप्प होते, हा मोठा अपराध आहे असे कुणाला वाटत नाही का? मुंबईचे जनजीवन एक मिनीटही खंडित होता कामा नये, यासाठी राज्यकर्ते ठोस उपाय का शोधत नाहीत? मुसळधार पाऊस असताना समुद्राला भरती सुरू झाली की, मुंबईत पाणी तुंबते, हेच कारण वर्षानुवर्षे ऐकायला मिळत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात यापुढेही दरवर्षी पावसाळ्यात मुंबई तुंबतच राहणार का? दिल्ली, चेन्नई, पाटणा, गुवाहटी अगदी युरोप, अमेरिकेतील शहरांनाही अतिवृष्टीचा फटका बसल्यावर तेथील जनजीवन विस्कळीत होते, पण दरवर्षी नित्यनियमाने पावसाळ्यात ही शहरे नेहमी हमखास पाण्याखाली असतात असे दृश्य दिसत नाही. समुद्राकाठी शहर आहे म्हणून पावसाळ्यात पाणी तुंबणारच, असेच सर्व जगात घडत असते का? पावसाळ्यात रुळावर पाणी साचले किंवा सिग्नल यंत्रणा बिघडली म्हणून लोकल्स एकापाठोपाठ उभ्या राहिलेल्या दिसतात, लोकल का थांबली याचे कारण फलाटावर प्रतीक्षा करणाऱ्या व डब्यात अडकून राहिलेल्या प्रवाशांना सांगण्याची व्यवस्था रेल्वेकडे नाही का?

मुंबईची तुंबई होण्यास भ्रष्टाचाराचा मार्ग अवलंबिणारे नोकदार, त्यांच्याशी हातमिळवणी करणारे कंत्राटदार आणि टेंडर घुसवणारे हितसंबंधी हे जास्त जबाबदार आहेत तसेच अस्वच्छ वागणारे व रस्त्यावर कचरा-घाण टाकणारे लोकही तेवढेच जबाबदार आहेत. रस्त्यावर थुंकणारे, तंबाखूच्या पिचकाऱ्या मारणारे, मावा-गुटख्याची पाकिटे फेकणारे, वेफर्स किंवा अन्य खाद्य पदार्थांच्या प्लास्टिकच्या पिशव्या रस्त्यावर टाकून देणारे, रेल्वे रुळावर चुळा भरणारे, कागदाच्या पुरचुंड्या, कापडी बोळे, बिसलरीच्या बाटल्या रेल्वे मार्गावर भिरकावणारे हे काय आदर्श नागरिक आहेत काय? यांना महापालिका व रेल्वेच्या सुरक्षा रक्षकांकडून वेळीच दंडीत केले पाहिजे. मुंबईची तुंबई करण्यास नोकरदार – कंत्राटदार यांची भ्रष्टाचारी साखळी जबाबदार आहे, तेवढेच रस्त्यावर व रेल्वे मार्गावर कचरा व घाण टाकणारे बेजबाबदार हजारो लोकही तेवढेच दोषी आहेत.
पावसाळ्यापूर्वी नालेसफाई १०० टक्के का होत नाही? रस्त्यावरील कचऱ्याचे ढीग १०० टक्के उचलून रस्ते स्वच्छ का होत नाहीत? रेल्वे स्थानकाच्या परिसरात दोन्ही बाजूला रस्ते अडवून ठाण मांडून बसलेले फेरीवाल्यांचे जथे कायमचे का हटवले जात नाहीत? अतिक्रमणमुक्त पदपथ व तुंबईमुक्त मुंबई ही जबाबदारी कोणाची आहे ?

पावसामुळे मुंबई कोलमडून पडली की मुंबईची अर्थव्यवस्था अस्ताव्यस्त होते. मुंबईचे जीवन कोलमडून पडते. हे काय देशाच्या आर्थिक व महाराष्ट्राच्या राजधानीला भूषणावह आहे का? यापूर्वीच्या अनेक मुख्यमंत्र्यांनी मुंबईचे सिंगापूर करणार, हाँगकाँग करणार अशा घोषणा केल्या होत्या. आताचे सत्ताधारी तशा घोषणा करीत नाहीत, पण मुंबईचे दैनंदिन जीवन सुखकर होईल यासाठीही सरकारकडे ठोस आराखडा किंवा नियोजन नाही. मुंबई महानगरासाठी राज्य व केंद्र सरकार तसेच मुंबईसाठी विविध सेवा देणाऱ्या यंत्रणांमध्ये समन्वय साधणारे स्वतंत्र मंत्रालय निर्माण करणे ही काळाची गरज आहे.
[email protected]
[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -