Wednesday, April 23, 2025
Homeसाप्ताहिककोलाजकवकांची अद्भुत दुनिया!

कवकांची अद्भुत दुनिया!

निसर्गवेद – डॉ. महालक्ष्मी वानखेडकर

या जगात मशरूमची जंगलं पण आहेत. जंगलातील मशरूम ही अत्यंत पौष्टिक, स्वादिष्ट असतात; परंतु तरीही हे आपल्या मृत्यूस कारणीभूतही असू शकतात. जंगली कवकामध्ये लाल दुर्गंधीयुक्त शिंगाचे, कार्डीसेफ मिलिटेरी, इंडिगो मिल्क कैप -आकर्षक निळ्या रंगाचे, मैरास्मियस टेगेटीकोलर पांढऱ्या रंगाचे असून यावर गुलाबी रेषा असतात आणि हे फांद्यांवरच उगवते. हे मेक्सिको, दक्षिण आणि मध्य अमेरिकेत आढळतात. डेथ कैप मशरूममुळे मूत्रपिंड आणि यकृत निकामी होते. काही विषारी कवकांचा वास घेतला तरीसुद्धा ती व्यक्ती कोमात जाऊ शकते. काही कवके इतकी विषारी असतात की, आपल्या शरीरातील सर्व अवयवांवर त्यांचा विपरीत परिणाम होऊ शकतो. बायोल्युमिनसेंट कवक अत्यंत रहस्यमयी. हे रात्री अत्यंत चमकतात. वैज्ञानिकांच्या मते की, रात्रीच्या अंधारात कीटकांना आकर्षित करणे आणि त्यांच्याद्वारे यांच्या बीजांचा प्रसार करणे हा यांचा चमकण्याचा मूळ उद्देश आहे. दुर्मीळ मशरूम सहज नजरेस पडत नाहीत. बऱ्याचदा हिऱ्यांसाठी खणन करताना दुर्मीळ मशरूम मिळतात.

रोडोटस पाल्मेटस संयुक्त अमेरिकेत आढळणारी कवके छोट्या उलट्या वाटीसारखे, गुलाबी लालसर दिसतात, तर स्कार्लेट कप मशरूम हे आतून लालसर आणि एखाद्या कपासारखे दिसतात. अमानिटा मुस्कारिया हे विषारी मशरूम दिसायला अत्यंत आकर्षक, गोल लाल रंगाची टोपी आणि खालचा पांढऱ्या रंगाचा दांडा, लाल टोपीवर पांढरे ठिपके. कधीकधी हे एक फूट उंचीचे असतात आणि याची छत्री एखाद्या मोठ्या ताटलीएवढी असते. माश्यांना आकर्षित करण्यासाठी या मशरूमचे तुकडे दुधात टाकून त्यांना खाऊ घातले जातात. जेणेकरून माश्यांना नशा येते आणि त्या भिंतींवर आपटून मरतात. असे काही ठिकाणी केले जाते. एमेथिस डिसिवर नावाचे दोन ते सहा सेंटीमीटरचे छोटेसे शंकूच्या आकाराचे मशरूम गर्द जंगलात झाडांच्या आसपास उगवतात. ताजे असताना याचा रंग जांभळा असतो. हळूहळू तो तपकिरी होऊ लागतो. ब्लीडिंग टूथ फंगस नावाप्रमाणेच खतरनाक. हे रक्तबंबाळ झाल्यासारखे ओलसर दिसतात. हे अमेरिका, दक्षिण कोरिया, युरोप, इराणमध्ये आढळतात. क्लावेरिया जोलिंगेरी हे जांभळट रंगाचे असून समूहामध्ये ओक सारख्या झाडाखाली चार इंचांच्या नळीसारखे वाढतात.

एनटोलोमा होचस्टेटरी न्यूझीलँडमधील एक प्रसिद्ध कवकजात. हिचा, निळा रंग कोकाको या पक्षासारखा दिसतो. अतिशय सुंदर असे मशरूम; परंतु हे खाण्यायोग्य नाही. ऐसेरो रूब्रा एखाद्या ताऱ्यासारखे लाल रंगाचे माशांना आकर्षित करणारे आणि अतिशय दुर्गंधीयुक्त असे मशरूम जे ऑस्ट्रेलियामध्ये पाहावयास मिळते. क्लैथरस रूबर हे सडलेल्या मांसासारखे दुर्गंधीयुक्त, दिसायला सुद्धा लालसर. दिवसभरात आकर्षित न वाटणारे; परंतु रात्री चमकणारे असे पैनेलस स्टिप्टीकस. आकर्षक रेडियम युक्त हिरवट रंगाचे चमचमते एक ते तीन सेंटीमीटरची टोपी असणारे उत्तर अमेरिकेत आढळणारे, खाण्यायोग्य नसणारे पण चवीला आंबट असणारे. पफ बॉल जे गॅस सोडतात. या पफ बॉल बुरशीला स्पर्श झाल्यास लगेच तिच्यातून गॅस सुटतो, पण हा गॅस नसून पावडर रूपी असलेले ते बिजाणू असतात. हे पांढरे किंवा तपकिरी रंगाचे असून ते गोल गुबगुबीत असून त्यावर बारीक बारीक काटे असल्यासारखे वाटतात. जाळीदार गाऊन घातल्यासारखे फुललेली एखाद्या परीसारखी असलेली कवक, ओलसर द्रव टपकणारे, हरणाच्या शिंगांसारखे, नाचणाऱ्या, डोलणाऱ्या या कवकांची आकर्षक दुनियाच काही वेगळी आहे. बुरशी तिला हवी असणारी पोषक द्रव्ये मृत किंवा विघटनशील पदार्थांपासून मिळवते. खरं तर बुरशीचे अनेक प्रकार असतात. वर्षावनात एकत्रितपणे अनेक प्रकारची कवके दिसतात. कवकांना त्यांच्या छत्र्या फुलवण्यासाठी पाण्याची खूप आवश्यकता असते.

या कवकांचे कार्य सुद्धा तेवढेच अद्भुत आहे. वनपरिसंस्थेमध्ये बुरशीचे खूप महत्त्व आहे. पर्यावरणपूरक उद्दिष्टे टिकवून ठेवणे हे याचे प्रमुख कार्य आहे. वनातील प्रदूषण कमी करण्याचे कार्य ही कवक करतात. काही कवकांचा उपयोग हा पेनिसिलिन आणि अँटिबायोटिक्समध्ये आपले जीवन रक्षक म्हणून केला जातो. जंगलामध्ये सामाजिक इंटरनेटची कामं करतात. म्हणजे ही जमिनीवर उगवत असल्यामुळे जमिनीखालून जाणाऱ्या वनस्पतीच्या मुळांना संदेश पोहोचवण्याचे, त्याच आदान- प्रदान करण्याचे कार्य ही कवक करत असतात. एका शोधानुसार अलास्कामधील कवक उच्च तापमानात अनुकूल होऊन कार्बन डायऑक्साइडची मात्रा वातावरणात वाढवून ग्लोबल वॉर्मिंगमध्ये योगदान करतात. कवक आपल्यासारखेच ऑक्सिजन घेतात आणि co2 सोडतात. तापमानातील बदल करण्यास आणि ग्लोबल वॉर्मिंग थांबविण्यास कवकांचा मोठा हातभार आहे. परमेश्वराने या कवकांची रचना ही वनस्पती सडल्यानंतर त्याचे विघटन योग्यरीत्या करण्यासाठीच योग्य अशी केली आहे. ज्यामुळे या वनस्पतीमुळे प्रदूषण होऊ नये. आपण यांची शेती कितीही करायला गेलो तरी आपण रासायनिक खते वापरतो आणि आपले उगवणारे मशरूम जंगलातील मशरूमपेक्षा नक्कीच सकस नसतात.

आपण जंगली मशरूम एवढी सकसता आणू शकतच नाही. जंगलातील पर्यावरण संतुलन प्रक्रिया ही त्या अद्भुत शक्तीने अगदी नैसर्गिक सुदृढ साखळी कुठेही असंतुलन न होता संतुलन प्रक्रियेमध्ये सुदृढपणे केली आहे. याचे कारण तिथे मानवाचा स्पर्श झालेला नाही. प्रत्येक भूछत्र हे जंगलातील नैसर्गिक प्रक्रियाशी स्वतःला जुळवणारे आणि समरस होणारे आहे. म्हणूनच ते इतके अद्भुत आणि अद्वितीय आहे. त्यामुळेच जंगलातील सौंदर्य आणि आरोग्य टिकवून आहे.

dr.mahalaxmiwankhedkar @gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -