Saturday, April 19, 2025
Homeसंपादकीयरविवार मंथनज्ञानियाचा राजा...

ज्ञानियाचा राजा…

माेरपीस: पूजा काळे

आषाढ महिन्यातली पंढरपूरची वारी म्हणजे, अद्वितीय सोहळा. नाचू आनंदे म्हणत, वादळवाऱ्याची तमा न बाळगता, पुंडलिकाच्या भेटीसाठी एकेक पाऊल पुढे टाकणारा वारकरी तरतो ते, केवळ नामसंकीर्तनाने. प्रेमभावे भरलेली त्याची नौका पोहोचते पैलतीरावर, जिथं स्वर्गाची दारं खुली होतात. तमोगुणांचा ऱ्हास होतो. भक्तीरसाने दुमदुमतो सारा परिसर. टाळ, चिपळ्यांच्या तालात बेभान होतो वारकरी. अंतर्मनातला एकेक शब्द अभंग होऊन बाहेर पडतो. उन्माद घडतो भावनांचा. संतांची शिकवण, महात्म्यांची वचनं, सार्थ पावतात. वारी करणारा तो खरा वारकरी या अर्थानं, नियमित व्रत्तस्त असणारा. विठोबाची संबंधित जो संप्रदाय; ज्याच्या मुखातून आलेला शब्द न् शब्द पुंडलिकाला चरणस्पर्श करतो. धर्माचरणानुसार आषाढ शुद्ध आणि कार्तिक शुद्ध एकादशी या दोन वाऱ्या मानल्या गेल्याने, आयुष्यात एकदा तरी वारीला जाण्याची प्रमुख साधना मान्य पावली.

१३ व्या शतकात भागवत संप्रदायाचे प्रवर्तक संत ज्ञानेश्वर महाराज यांना माऊली म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या अल्पशा आयुष्यातलं चरित्र बरंच काही शिकवून जातं. ज्ञानेश्वरी कथा सत्यतेबद्दल संभ्रम असला तरी, रेड्याला वेद वदवण्याचा प्रसंग, चालणाऱ्या भिंतीवर स्वार होऊन योग्याला नम्र बनवण्याचा प्रसंग चमत्कार बनून लोकरंजन करतात. माऊलींच्या खडतर आयुष्याला चकाकी आली ती, संत नामदेवांच्या संत साहित्याशी जोडल्याने. अमृतानुभव लिहिल्यानंतर नामदेव त्यांचे जवळचे मित्र बनले. ज्ञानेश्वर नामदेवांनी भारतात तीर्थक्षेत्रांची वारी करत, वारकरी संप्रदायाची दीक्षा अनेकांना दिली. ज्ञानेश्वरांचे अभंग याच काळात लिहिले जात होते. संयम आणि योग्य वेळी प्रतिकार याचा समन्वय हा संतांच्या विचारातून सर्वसामान्यांच्या मनावर ठसत होता. ज्ञानेश्वरी म्हणजेच भावार्थदीपिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गीतेच्या रूपांतरात नऊ हजारांहून अधिक श्लोक आहेत. गीतेची शिकवण सामान्यांच्या आवाक्यात आणताना, माऊलींनी जातीय भेदांचा निषेध केला. संतांनी मानवतावादाला पूर्णपणे दिलेला हा वेगळा अर्थ आहे; ज्यामुळे महाराष्ट्राची सांस्कृतिक जडणघडण महत्त्वाची ठरली. संतांनी आनंदी जीवन जगण्याचा मार्ग दिला. ज्यांना संत संगत लाभली ते खरे पुण्यवान होत. मानवास योग्य आचरण, योग्य दिशा दाखवण्याचे काम संतांनी केले. महाराष्ट्र भूमी पावन झालीयं ती थोर संतांमुळे. यातील सर्वश्रेष्ठ संत श्री ज्ञानेश्वर महाराज ज्यांच्या पालखीला वारीचा पहिला मान मिळतो, तो याच कारणानं.

ज्ञानेश्वरांच्या सर्वश्रेष्ठ साहित्यातील पसायदान हा ज्ञानेश्वरी ग्रंथ तत्त्वज्ञान आणि काव्य यांचा मनोज्ञ संगम आहे. यामध्ये तत्त्वज्ञानाचे रहस्य मधुरकाव्य रचनेमधून प्रकटते. श्रीमद्भगवद्गीतेचे मराठी प्राकृत भाषेतील विवेचन म्हणजे ज्ञानेश्वरी. या ग्रंथाच्या शेवटी संत ज्ञानेश्वरांनी ईश्वराकडे पसायदान मागितले आहे. पसायदान महाराष्ट्रात घराघरांत ज्ञात असलेले काव्य आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथांचा शेवट पसायदानाच्या समारोपाने होतो. हे विश्वची माझे घर. परमात्म्याशी एकरूप माऊलींच्या मुखातून प्रसृत झालेलं हे पसायदान म्हणजे परमात्म्याच्या ठायी, अर्पण करणाऱ्या मानवाचं आर्त हृदगत होय. संतश्रेष्ठ माऊलींनी रचलेल्या भावार्थ दीपिका अर्थात “ज्ञानेश्वरी” या भगवद्गीतेवरील ग्रंथाच्या १८ व्या अध्यायातील ओव्या पसायदान म्हणून परिचित आहेत. अखिल मानव जातीचं सर्वोतोपरी उन्नयन व्हावं, या प्रेरणेतून माऊलींला पसायदान स्फुरले.

आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||
प्रारंभी माऊली भगवंतास आर्जव करतात की, चराचरांस व्यापणाऱ्या विश्वात्मक देवा तुझ्या मुखातून आलेली गीता वाड्मयमूर्ती आहे. या वाग् यज्ञाच्या (वाक् म्हणजे वाणीरूपी यज्ञसाहित्य अर्थात साहित्य निर्माण) श्रवणाने तू प्रसन्न होऊन मला प्रसादरूपी दान द्यावेस.

माऊली म्हणते की, जे खळांची व्यंकटी सांडो | म्हणजे प्रसादाचं दान कसं असावं, तर खळांची म्हणजे दृष्टांची व्यंकटी म्हणजे दृष्टप्रवृत्ती नष्ट करणारं असावं. माऊलींना दृष्ट प्रवृत्तींचा नाश इथं अभिप्रेत आहे. त्याची परिणती मुख्यत्वे सत्कर्माची रती या गोष्टींमध्ये अर्थात मंगल कर्म करण्याची आवड निर्माण होऊन प्राणीमात्रात मैत्रीभाव वाढीस लागणारं असावं. समाजात दुःख राहणार नाही, असा निकोप समाज प्रस्थापित झाला तरच, येथे दुरितांचे तिमीर म्हणजे पापवासना उरणार नाही. कर्तव्याशी एकनिष्ठ राहून स्वधर्मे पालन हाचं स्वधर्माचा सूर्योदय होय. त्याचा उदय झाल्यावर मग अज्ञानाचा मागमूस उरणार नाही, अशा इच्छांची पूर्ती होणं म्हणजे, जो जे वाच्छिलं तो ते लाहो। प्राणिजात।। अशाप्रकारे कल्याणाची वृष्टी होत राहिली तर, ईश्वरविषयक भक्तिभाव वाढेल.

ही ईश्वरनिष्ठांची मांदियाळी म्हणजे, ईश्वर एकरूप झालेल्या भक्तांचा जथ्था या मंडलावर नित्यशः भूतमात्रास भेट देत राहील. अशी अवस्था प्राप्त झाल्यास सर्वत्र कल्पतरूचे आरव होतील. मनात आलेली इच्छा पूर्ण करणाऱ्या कल्पवृक्षाची वनराई प्रस्थापित झाल्यावर मंगलमय वातावरण तयार होईल. हेच ते चेतना चिंतामणी रत्नांचे गाव ठरेल. यामुळं येथे उणीव भासणार नाही. येथे ना जरा व्याधी, ना उपाधी या स्थितीस, माऊलीने पीयूषाचे अर्णव म्हणजे यांस अमृताचे महासागर म्हटले आहे. या सृष्टीतील चंद्रावर डाग नाहीत. सूर्यप्रभा आहे. या सृष्टीतील मार्तंड आपल्या उष्णतेनं ताप देत नाही, तर दिव्य प्रकाशाचे वितरण करतो. अशाप्रकारे भावार्थ दीपिकेच्या फलश्रुती रूप पसायदानाची मागणी केल्यावर समोर साकारलेला तो विश्वेशराव म्हणजे सगुणरूप सद्गुरू. अगाध ज्ञान प्राप्त झालेल्या माऊलींना निवृतीनाथांनी प्रसन्न होऊन मिठी मारली. आश्वासन दिले. हा दानप्रसाद होईल बरे।। अरे हे प्रसादरूपी दान मी तुला दिले आहे. हे अमृततुल्य शब्द कानी पडताच ज्ञानदेव परमसुखाय प्राप्त झाले. ज्ञानेश्वर माऊलींचं हे पसायदान म्हणजे मानवाचा दिक्कालातील संदेशाचा हुंकार होय. आपला कार्यभाग संपल्यावर वयाच्या २१व्या वर्षी आळंदीतील सिद्धेश्वर मंदिर परिसरात संजीवन समाधी घेत ज्ञानेश्वरांनी देह त्यागला. जगाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या एका थोर संताच कार्य अजूनही संपलेलं नाही. वारीच्या निमित्ताने ज्ञानेश्वर माऊली प्रत्येक वारकऱ्याला सोबत करतेय वर्षानुवर्षे…

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -