Monday, April 21, 2025
Homeताज्या घडामोडीAhmdenagar news : अहमदनगर जिल्हा विभाजनासाठी श्रीरामपूरकर आक्रमक!

Ahmdenagar news : अहमदनगर जिल्हा विभाजनासाठी श्रीरामपूरकर आक्रमक!

आज श्रीरामपूर शहरात कडकडीत बंद

अहमदनगर : राज्यात क्षेत्रफळाने सर्वात मोठा असलेला जिल्हा म्हणून अहमदनगरची (Ahmdenagar) ओळख आहे. मात्र, गेल्या ४० वर्षांपासून या जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी होत आहे. श्रीरामपूरच्या (Shrirampur) रहिवाशांनी वेगळ्या श्रीरामपूर जिल्ह्याची मागणी केली आहे. हे विभाजन १५ ऑगस्टपूर्वी करण्यात यावे, यासाठी ते आक्रमक झाले आहेत. या मागणीसाठी आज श्रीरामपूर शहरात कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीरामपूर जिल्हा मुख्यालय करावं ही मागणी आता जोर धरू लागली आहे. गेल्या आठ दिवसांपासून विविध आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने करण्यात येतोय. याच मागणीसाठी आज श्रीरामपूर शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे.

अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा असून त्याचं क्षेत्रफळ १७४१२ चौ. किमी आहे. हा जिल्हा तसा दोन भागांत विभागला आहे, उत्तर नगर जिल्हा आणि दक्षिण नगर जिल्हा. गोवा राज्यापेक्षा पाचपट क्षेत्रफळ असलेला अहमदनगर जिल्हा आहे. त्याच्या विभाजनाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. यात श्रीरामपूर शहरातील नागरिक सर्वाधिक आग्रही राहिले आहेत. उत्तर नगर जिल्ह्यात अकोले, संगमनेर, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासे हे तालुके येतात. यात भौगोलिक मध्य हा श्रीरामपूर तालुका येतो. त्यामुळे राज्य सरकार यावर काय निर्णय घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

जिल्हा विभाजन झालं नाही तर…

शरद पवार मुख्यमंत्री असताना जिल्ह्याची घोषणा त्यांनी सोनई येथील एका कार्यक्रमात केली होती. तेव्हापासूनच जिल्हा विभाजनाची मागणी जोर धरू लागली. श्रीरामपूर पाठोपाठ संगमनेर तालुक्याने सुद्धा मुख्यालयाची मागणी केली आहे तर शिर्डीकर सुद्धा जिल्हा मुख्यालय होण्यासाठी आग्रही आहेत. याचमुळे गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा विभाजनाचा प्रश्न शासन दरबारी प्रलंबीत असून हे जिल्हा विभाजन होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागल आहे. १५ ऑगस्ट पूर्वी जिल्हा विभाजन केलं नाही तर मंत्र्यांना तालुक्यात फिरू देणार नाही असा इशारा जिल्हा कृती समितीने दिलाय आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -