Sunday, April 20, 2025
Homeसाप्ताहिककोलाजदादरचा श्री स्वामी समर्थ मठ

दादरचा श्री स्वामी समर्थ मठ

श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा मठ अलीकडे ‘दादर मठ’ नावाने ओळखला जातो. श्री सद्गुरू बाळकृष्ण महाराज सूरतकर यांनी २९ मे १९१० साली स्थापन केला. त्यांची शिकवण भक्तिमार्गाची असे. मठाचा मुख्य वार शनिवार असल्याने त्या दिवशी कोणीही सूरतेचा मठ सोडून जात नसे, असा महाराजांचा दंडक आहे.

कोकणी बाणा – सतीश पाटणकर

श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा मठ अलीकडे ‘दादर मठ’ नावाने ओळखला जातो. श्री सद्गुरू बाळकृष्ण महाराज सूरतकर यांनी २९ मे १९१० साली स्थापन केला. श्री बाळकृष्ण महाराज यांचा जन्म सूरत येथे २८ ऑक्टोबर १८६६ साली झाला. लहानपणापासूनच त्यांना देवभक्तीची व नामस्मरणाची आवड होती. पुढे ते आपले चुलते शिवशंकर यांच्याकडे मुंबईला शिक्षणासाठी आले. मुंबईस आल्यावर त्यांच्यावर आर्य समाजाच्या शिकवणीचा पगडा बसला. त्यांचे चुलते शिवशंकर कट्टर शिवभक्त. त्यांचे शेजारी श्री रामचंद्र व्यंकटेश बरडकर ऊर्फ सारस्वत ब्राह्मण भेंडे, हे महाराजांचे गुरू.

‘तात महाराज’ श्री स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त होते. त्यांना महाराजांच्यात सुधारणा करण्यास, त्यांनी विनंती केली. त्यांनी श्री सद्गुरू बाळकृष्ण महाराजांना भुलेश्वरच्या अष्टभुजादेवीच्या देवळात देवीचे हास्यमुखाचे दर्शन देऊन, त्यांच्या वृत्तीमध्ये आमूलाग्र फरक केला गेला व त्याचक्षणी महाराजांनी श्री तात महाराजांना गुरू करून, ते श्री स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त बनले.

महाराजांना इंग्रजी व संस्कृतचे उत्तम ज्ञान होते. ते शिकवण्याकरिता गोकुळदास संस्कृत पाठशाळेत संस्कृतचे मास्तर होते. त्यावेळी ते मास्तर या नावाने ओळखले जात. जांभूळवाडीत महाराजांचे शेजारीच धोत्रे नावाचे कुटुंब राहत असे. त्या कुटुंबातील पिशाच्चबाधा महाराजांनी दूर केली व तेव्हापासून हे साधे ‘मास्तर’ नसून, एक दिव्य महात्मे आहेत, याची ओळख लोकांना झाली. जांभूळवाडीतून महाराज पुढे मालाडमध्ये त्यांचे मित्र द्वारकादास, यांच्याकडे राहावयास गेले.

महाराजांच्या दैवी सामर्थ्याचा प्रसार झाल्यामुळे, पुष्कळ लोक त्यांच्याकडे येऊ लागले. महाराजांना भजन फार आवडत असे व त्यांच्याकडे येणाऱ्यांना कटाक्षाने भजन करण्यास गुरुवारी व शनिवारी बोलावीत असत. शनिवारी सबंध रात्र भजन होत असल्यामुळे, द्वारकादासांच्या मंडळीस त्रास वाटू लागला. ही गोष्ट कै. विश्वनाथ मोरेश्वर कोठारे व त्यांच्या मातोश्री पुतळाबाई यांना कळल्यावर, त्यांनी महाराजांना मालाडला मामलेदार वाडीतील आपल्या घरात आणले. महाराजांकडे त्यावेळी कुलाब्यापासून वसई, घाटकोपर, चेंबूर येथवरची मंडळी दर्शनास व भजनास येत असत. इतक्या लांबून शनिवारी रात्री तेही त्या काळात मालाडला भजनास येणे, हे गैरसोयीची असल्याने, महाराजांनी कोठे तरी मध्यवर्ती ठिकाणी राहणे सर्वांना सोयीस्कर होईल, असा विचार भक्तजनांत उत्पन्न झाला.

कै. भाऊसाहेब देशमुख त्यावेळी मुंबई कलेक्टरचे हेडक्लार्क असल्यामुळे, दादरची पुढे होणारी वाढ त्यांना माहीत होती व महाराजांच्या सांगण्यावरून भक्त मंडळींनी दादरला जागा बघायला सुरुवात केली. त्यांना एक बंगला सापडला. तो भुताटकीचा व तीन खुनी बंगला म्हणून ओळखला जात असे. मंडळींनी ही गोष्ट महाराजांस कळविली. महाराज म्हणाले, “काही हरकत नाही. आपण तेथे समर्थांची स्थापना करून, सर्व भुतांना मुक्ती देऊ. आपण परत जावे व कुलूप उघडून आत अत्तराचा व उदबत्तीचा सुगंध येईल, तो आल्यास भाडे देऊन, ताबडतोब बंगला ताब्यात घ्यावा.” वरील मंडळींना कुलूप उघडल्यावर अत्तराचा व उदबत्तीचा सुगंध आला व त्यांनी महाराजांच्या सांगण्यावरून बंगला भाड्याने घेतला. भाड्याने घेतलेला बंगलाच आपल्या आजच्या मठाचे स्थान आहे.

सन १९१० मध्ये मठ स्थापन झाला. हा बंगला खूपच जुना असल्याने, कालांतराने बंगल्याचे दुरुस्तीचे काम करण्यास सुरू केले. त्या काळात मठ माटुंग्याला दुसऱ्या जागेत हलवणे भाग पडले. ऑगस्ट १९१३ मध्ये पुरे झाले व ३० ऑगस्ट रोजी मठ परत पहिल्या जागी आला. दोन्ही बाजूस दोन मोठ्या खोल्या व पुढच्या बाजूस म्हणजे रस्त्यावरून आत शिरण्याच्या बाजूला मोठा ओटा, दोन्ही बाजूस बसावयास दगडी ओटे व पुढे चढण्यास पायऱ्या येण्याच्या मार्गावर दुतर्फा फुलांच्या कुंड्या, तसेच गॅसबत्त्या पण लागल्या. मठात परत आल्यावर महाराजांनी सध्याचे सिंहासन सूरतहून कारागीर आणून तयार केले. सिंहासनाच्या बैठकीत स्वामी समर्थांचे अवशेष घालून, त्यावर संगमरवरी लादी बसवून, समर्थांच्या फोटोची स्थापना केली. रिवाजानुसार लांबून येणाऱ्या भक्तांसाठी गुरुवार-शनिवार आरती रात्री १०ला सुरू होऊन ११.३०ला संपे. त्यानंतर महाराज, हल्ली महाराजांचे छायाचित्र आहे, तेथे आरामखुर्चीत बसत. अर्धा-एक तास भक्तजनांचे महाराजांना हार घालणे चाले.

हार इतके येत की, तीन-तीन वेळा काढून ठेवावे लागत. त्यानंतर महाराज गुजराथी असूनसुद्धा मराठीत एकनाथी भागवतावर रात्री २ वाजेपर्यंत प्रवचन करीत. त्यावेळी त्यांचा कंठ दाटून येई. त्यांची शिकवण भक्तिमार्गाची असे. महाराजांचे प्रवचन चालू असता, श्रोते मंत्रमुग्ध होत असत. मठाचा मुख्य वार शनिवार. त्या दिवशी कोणीही येथील किंवा सूरतेचा मठ सोडून जावयाचे नाही, असा महाराजांचा दंडक आहे. तसे गाभाऱ्यात कोणीही टोपी, पगडी किंवा रुमाल घालून जायचे नाही. ती काढूनच गाभाऱ्यात जाऊन प्रदक्षिणा कराव्यात, असा त्यांचा आदेश आहे. समर्थांना तांबडी फुले, कण्हेर, जास्वंद, तगर घालू नयेत, असा त्यांचा दंडक असे व घातल्यास ताबडतोब कटाक्षाने सांगून काढून टाकत. तांबडा गुलाब चालत असे.

दादर मठाच्या स्थापनेनंतर सन १९११ मध्ये वडवली शेरी बेगमपुरा सूरत येथेसुद्धा महाराजांनी श्री स्वामी समर्थांचा मठ स्थापन केला. त्या मठात श्री स्वामी समर्थांचा पलंग श्री स्वामी समर्थांनी दृष्टांत दिल्याप्रमाणे महाराजांनी अक्कलकोटला जाऊन आणली, ती त्या मठातील गाभाऱ्यात ठेवलेली आहे. महाराज नेहमी श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथीची पालखी मुंबईस काढून, दुसऱ्या दिवशी तशीच पालखी सूरतेस काढण्यास जात असे. त्याप्रमाणे महाराज १० मे १९१८ रोजी रात्रीच्या गाडीने सूरतेस गेले. त्या वेळेपासून महाराजांनी निर्याणास जाण्याच्या पुष्कळ पूर्वसूचना दिल्या; पण कोणालाच समजल्या नाहीत. वैशाख वद्य दशमी शके १८४० संवत १९७४ तारीख ४ जून १९१८ मंगळवार रात्रौ ते पहाटे ५ वाजेपर्यंत सूरतेच्या मठात भजनाचा कार्यक्रम होत असताना, महाराजांनी तो बंद करून सर्वांना घरी जाण्यास सांगितले; परंतु एका तासाने यावे लागेल असे म्हणाले. त्यांचा अर्थ त्यावेळी कोणालाही कळला नाही. सूर्योदय होण्याच्या थोड्या वेळापूर्वी महाराज मागील चौकात गेले. तेथे एक दोरी टांगलेली होती. तिला धरून महाराज नाचू लागले.

‘खडावांचा खड खड खड खड’ असा आवाज ऐकून परमपूज्य आई खाली आल्या व महाराजांस म्हणाल्या, “दोरी जुनी आहे, ती तुटेल व तुम्ही पडाल.” महाराजांनी उत्तर दिले, “दोरी तर केव्हाच तुटली आहे, या घे किल्ल्या!” असे म्हणून त्या प. पु. आईच्या अंगावर फेकल्या व म्हणाले, “सांभाळ.” प. पु. आई म्हणाली, “मला किल्ल्या का देता?” इतक्यात सूर्योदय झाला. सूर्यास नमस्कार करून बाजूला असलेल्या आराम खुर्चीवर बसून छातीवर हात ठेवून त्रिवार ‘ओ तात, ओ तात, ओ तात’ असे स्मरण करून, महाराजांनी मान टाकली. याप्रमाणे वैशाख वद्य एकादशी शके १८४० संवत १९७४ बुधवार, तारीख ५ जून १९१८ रोजी सूर्योदयी निर्याणास गेले. बाळकृष्ण महाराजांची समाधी ही सूरत येथील स्वामींच्या मठाजवळच आहे.

(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -