शिर्डी : शिर्डीहून एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. ड्रिंक अँड ड्राईव्ह (Drink And Drive) अपघाताच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहेत. अशी दारुची नशा (Alcoholism) अनेकांचा जीव घेतानाचे चित्र दिसून येत आहे. अशातच शिर्डीमध्येही एका तरुणाचा दारुच्या नशेत जीव गेल्याची घटना घडली आहे.
बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातून शिर्डीला (Shirdi) आलेल्या तरुणाचा दारूच्या नशेत हॉटेलच्या टेरेसवरून खाली पडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शिर्डी पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नेमके प्रकरण काय?
शिर्डी जवळील निमगाव कोऱ्हाळे येथील हॉटेल साई सिमरन येथे हा प्रकार घडला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चार मित्र फिरण्यासाठी शिर्डीत आले होते. ते एका हॉटेलमध्ये थांबले होते. परंतु हे चार मित्र हॉटेलमध्ये दारू पिऊन फिरण्यासाठी हॉटेलच्या टेरेसवर गेले. परंतु यावेळी शुभम नारखेडे (२५) या तरुणाचा दारूच्या नशेमुळे तोल गेल्यामुळे तो थेट टेरेसवरून खाली पडला. उंचावरून खाली पडल्यामुळे या तरूणाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरूण दारूच्या नशेत होता. त्यामुळे तोल जावून पडल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत असल्याची माहिती मिळत आहे.