जयपूर : सध्या अनेकांना कोणत्याही ठिकाणी गेल्यास सेल्फी काढण्याचे वेड लागले आहे. सोशल मीडियावर लाइक्स कमवण्यासाठी कोणत्या थराला जातील हे देखील सांगता येत नाही. राजस्थानमधील सेल्फीचे वेड असणाऱ्या जोडप्याने फोटो काढता जीव धोक्यात घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या पाली जिल्ह्यात ही घटना घडली आहे. सध्या पावसामुळे हिरवळ झालेल्या वातावरणात अनेक पर्यटनस्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. पाली जिल्ह्यातील गोरम घाट हा पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्र ठरला आहे. तिथेच राहुल आणि जान्हवी हे जोडपेही फिरण्यासाठी आले होते. पुलिया येथील एका रेल्वे ट्रॅकवर हे जोडपे उभे राहून सेल्फी घेत होते. मात्र, सेल्फीच्या नादात समोरुन ट्रेन येताच या दोघांनी घाबरुन थेट दरीत उडी मारली. या घटनेमुळे दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे आणि वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दोघांनाही रेस्क्यू करुन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या या दोघांचीही प्रकृती नाजूक आहे. मात्र या संपूर्ण घटनेमुळे नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.