कथा – प्रा. देवबा पाटील
आज पुन्हा परीने तिच्याजवळील चहाच यशश्रीला प्यायला दिला. तो चहा पिऊन झाल्यावर यशश्रीला आपल्या चहापेक्षा खूपच तरतरीत वाटले. मग तिने उत्साहाने प्रश्नमाला सुरू केली.
“न्यूट्रॉन तारा कसा असतो परीताई?” ‘‘यशश्रीने प्रश्न केला.’’
“एखाद्या ताऱ्याचा जन्म झाला व तो ऊर्जा निर्माण करून चमकू लागला की हजारो वर्षे तो त्याच स्थितीत चमकत राहतो. आपला सूर्य आज या स्थितीत असलेला एक सामान्य तारा आहे. जेव्हा अशा ताऱ्याची ऊर्जा हळूहळू संपत जाते म्हणजे त्यातील हायड्रोजन संपत जातो तेव्हा तो आकुंचन पावू लागतो व त्यावरील दाब वाढतो. त्यामुळे त्याची घनता वाढत जाते आणि तो निस्तेज बनतो. त्यावरील प्रचंड दाबामुळे त्यातील इलेक्ट्रॉन्स प्रोटॉन्स जवळ येतात व त्यांच्यात अणुप्रक्रिया होऊन त्यांपासून न्यूट्रॉन्स तयार होतात; परंतु अशा ताऱ्यांचे वस्तूमान व आकार जर वाढत गेले तर शेवटी त्याचा स्फोट होतो नि त्याच्या केंद्र भागात पृथ्वीपेक्षाही लहान आकाराचा जो भाररहित न्यूट्रॉन्सचा अति घन केंद्र गाभाच शिल्लक राहतो. अशा ताऱ्याला ‘‘न्यूट्रॉन तारा म्हणतात.” ‘‘परीने स्पष्टीकरण दिले.’’
“मग पल्सार्स व क्वासार्स हे तारे म्हणजे काय असतात परीताई?” ‘‘यशश्रीने पुन्हा नवीन प्रश्न उकरून काढलाच.’’
“ पल्सार्स म्हणजे सतत स्पंदन पावणारे तारे. यांना स्पंदक तारे किंवा कंपमान तारे वा स्पंदमान तारे म्हणतात. त्यांच्यातील आण्विक घडामोडींमुळे त्यांचे तेज ठरावीक काळात नेहमी कमी-जास्त होत असते. पल्सार्स हे अति लहान तारे असून ते आकुंचित होताना त्यांच्यात नवताऱ्यांप्रमाणे स्फोट होत नाही. ते अतिशय घनीभूत असलेले वजनदार न्यूट्रॉन तारे असतात व विशिष्ट कालमर्यादेत होणाऱ्या त्यांच्या आकुंचन-प्रसरणामुळे रेडिओ तरंगांची निर्मिती होत असते नि त्यांच्या पोटातील अणुकण प्रकाशापेक्षाही जास्त वेगाने धावत असतात. ते समुद्रातील दीपस्तंभाप्रमाणे कमी-जास्त सतत बदलत्या तेजाची प्रारणे बाहेर फेकतात म्हणून त्यांना पल्सार्स किंवा स्पंदन तारे म्हणतात.” ‘‘परीने सांगितले.’’
“क्वासार्सबद्दल माहिती सांग ना परीताई.” ‘‘यशश्री म्हणाली.’’
“ सांगते गं. तुझ्यासारख्या चौकस व जिज्ञासू मुलीला माहिती सांगण्यात मलासुद्धा खूप आनंद होत आहे. जे तारे रेडिओ लहरींचे प्रारण उत्सर्जित करतात त्यांना रेडिओ तारे म्हणतात.” ‘‘परी पुढे सांगू लागली, “ जे तारे शक्तिशाली दुर्बिणीतूनही न दिसता ज्यांचे अस्तित्व त्यांनी बाहेर फेकलेल्या त्यांच्या रेडिओ तरंगांवरून म्हणजे प्रारणांवरून फक्त रेडिओ दुर्बिणीद्वारेच कळते त्यांना “ताऱ्यांसारखे दिसणारे रेडिओ उगम” म्हणजे रेडिओ तारे किंवा क्वासार्स म्हणतात. ते फिक्या निळसर ताऱ्यांसारखे दिसतात. वास्तविकत: ते सूर्यापेक्षाही खूपच देदीप्यमान व तेजस्वी असतात पण ते सूर्यापेक्षाही कितीतरी जास्त दूर असल्याने आपणास फिके दिसतात. ते आपल्या किंवा आपल्या जवळपासच्या कोणत्याच आकाशगंगेत नसून अतिशय दूरच्या कोठल्या तरी आकाशगंगेत आहेत. त्या आकाशगंगेच्या गर्भात स्फोट होऊन त्यांची निर्मिती होते. त्यांचीही तेजस्विता कमी-जास्त होत असते. त्यांचा रेडिओ तरंग इतरांपेक्षा वेगळा असून दरवर्षी त्याच्या शक्तीमध्ये वाढ होत असते. ते सूर्यापेक्षाही खूप जास्त पटींच्या प्रमाणात ऊर्जा उत्सर्जित करतात.”
“ रेडिओ तारे कोणते असतात परीताई?” ‘‘यशश्रीने प्रश्न केला.’’
परी म्हणाली, “अवकाशात आपणास जरी असंख्य प्रकाशमान तारे दिसतात तरी काही तारे काळसर रंगाचेही आहेत. ते काळपट रंगाचे तारे काचेच्या दुर्बिणीतून दिसत नाहीत. त्या ताऱ्यांमधून जे क्ष-किरण, गॅमा किरण व अतिनील किरण बाहेर पडतात त्यांच्यावरून रेडिओ दुर्बिणीद्वारा त्यांचे अस्तित्व कळते. त्या ताऱ्यांना रेडिओ तारे म्हणतात. त्यांचेही दोन प्रकार असतात. काही कमी कंपन संख्येचे तप्त तरंग बाहेर फेकणारे तर काही तीव्र कंपनांचे अतिशय उष्ण किरण उत्सर्जित करणारे असतात.”
“यशश्री तुझ्या शंका खरोखरच खूपच महत्त्वाच्या असतात. मला तुझा खूप खूप अभिमान आहे. आता राहिलेल्या शंका आपण उद्या बघू.” ‘‘परी म्हणाली.’’
“ हो ताई.” ‘‘यशश्री उत्तरली.’’