नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर आणखी एक रेकॉर्डची नोंद झाली आहे. त्यांचे रविवारी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर १०० मिलियन म्हणजेच १० कोटीहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत. यासोबतच ते सर्वाधिक फॉलो केले जाणारे जागतिक नेते बनले आहेत.
पंतप्रधान मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडे(३८.१ मिलियन फॉलोअर्स), दुबईचे राजे शेख मोहम्मद(११.२ मिलियन फॉलोअर्स) आणि पोप फ्रान्सिस(१८.५ मिलियन फॉलोअर्स) यासारखे अन्य जागतिक नेत्यांपेक्षा खूप पुढे आहेत.
एक्सवर पंतप्रधान मोदींची लोकप्रियता पाहता जगभरातील नेते सोशल मीडियावर त्यांच्याशी जोडले जाण्यास उत्सुक असतात. भारतात पंतप्रधान मोदींच्या फॉलोअर्सची संख्या इतर भारतीय नेत्यांच्या तुलनेत अधिक आहे. लोकसभेत विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचे २६.४ मिलियन फॉलोअर्स आहेत तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे २७.५ मिलियन फॉलोअर्स आहेत.
सातत्याने वाढतेय लोकप्रियता
गेल्या तीन वर्षांत पंतप्रधान मोदींच्या एक्स हँडलवर साधारण ३० मिलियन युजर्सची वाढ पाहायला मिळाली. त्यांचा प्रभाव यूट्यूब आणि इन्स्टाग्रामपर्यंत वाढलेला आहे. येथे त्यांचे २५ मिलियन सबस्क्रायबर आणि ९१ मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.