Sunday, April 20, 2025
Homeसाप्ताहिककोलाजपंढरीचे वारी जयाचिये कुळी

पंढरीचे वारी जयाचिये कुळी

‘ज्ञानदेवे रचिला पाया… तुका झालासे कळस’ अशा समृद्ध प्रवासाला भक्तीयुक्त तत्त्वज्ञानाचा पाया मिळाला आणि ‘विठ्ठल आमुचे जीवन, आगम निगमाचे स्थान’ असे म्हणत बाळकृष्ण, भगवान विष्णू आणि शिवतत्त्व ज्याच्या ठाई एकवटले आहे, तो पंढरीचा पांडुरंग या वारकऱ्यांचे आणि पर्यायाने वारकरी संप्रदायाचे दैवत झाले.

विशेष – प्रा. मीरा कुलकर्णी

ज्ञानियाची ओवी, तुक्याचा अभंग,
चित्ताशी सत्संग, शाश्वताचा.
खचलीया धीर, पोळल्या गारवा,
जाणत्या गोडवा, जाणत्याचा.”
मराठी साहित्य विश्वाचा मूलाधार म्हणजे संत साहित्य आणि संत साहित्याचा मूलस्रोत म्हणजे भागवत धर्माची पताका मिरवणारे वारकरी संप्रदायाच्या परंपरेचे संत आणि त्यांची विचारधारा. ‘ज्ञानदेवे रचिला पाया…तुका झालासे कळस’ अशा समृद्ध प्रवासाला भक्तीयुक्त तत्त्वज्ञानाचा पाया मिळाला आणि ‘विठ्ठल आमुचे जीवन, आगम निगमाचे स्थान’ असे म्हणत बाळकृष्ण, भगवान विष्णू आणि शिवतत्त्व ज्याच्या ठाई एकवटले आहे, तो पंढरीचा पांडुरंग या वारकऱ्यांचे आणि पर्यायाने वारकरी संप्रदायाचे दैवत झाले.

पांडुरंग… विठ्ठल… विठोबा… विठाई…! अठ्ठावीस युग कटीवर हात ठेवून, भक्तांच्या प्रेमात अखंड बुडालेल्या आणि त्यांची वाट पाहत, समचरण उभ्या असलेल्या या सावळ्या परब्रह्माची अशी अनेक नावे.

खांद्यावर भागवत धर्माची पताका, कपाळावर गोपीचंदनाचा टिळा, डोक्यावर तुळशी वृंदावन, गळ्यात तुळशीची माळ, हातामध्ये टाळ-मृदंग आणि विठोबा… रखुमाईच्या… तालात ठेका धरणारे पाय असा हा अपार भक्तांचा मेळा वर्षानुवर्ष त्या विठाईला भेटण्यासाठी, पंढरीला हजारो मैल चालत जातो. सोबत संतांच्या पालख्याही मोठ्या भक्तिभावाने आणि आनंदाने नेतो.

ज्या सुखा कारणे योगाभ्यास |
शरीर दंड, काया क्लेश ||
ते उभे आहे अपैस |
भीमातिरी वाळुवंटी ||
असा भगवंताच्या ओढीने आलेला वारकरी पांडुरंगाचे अधिष्ठान असलेल्या अलंकापुरीत येतो. भीमातीरीच्या वाळवंटात जमलेला अवघा संतमेळा वारकऱ्यांसह, पंढरपुरात येताच धन्यता मानतो.

‘पंढरीची वारी पंढरीची वारी
वारी चुकू न दे हरी’
ही त्याची सद्भावना असते.
हे वारकरी पंढरपूरला पोहोचतात आणि मग ‘अवघे गरजे पंढरपूर… जाहला नामाचा गजर’ याची अनुभूती घेतात. या संतांसह समस्त वारकऱ्यांचे भिवरेच्या तीरावर असलेलं पंढरपूर म्हणजे माहेरघर आहे म्हणूनच ‘पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी… प्रत्यक्ष चक्रपाणी उभा विटेवरी’ या अलौकिक सत्याचा अनुभव घेण्याची ओढ त्याला लागलेली असते.
आषाढी एकादशी! समस्त महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा म्हणजेच साक्षात परब्रह्म रूप असलेल्या सावळ्या विठू माऊलीचा अाध्यात्मिक उत्सव.

गेले अनेक दिवस टाळ-मृदंगाच्या जल्लोषात आणि विठू माऊलीच्या नाम गजरात, हजारो वारकरी, हजारो मैल ‘याचि देही याचि डोळा’ पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी, पांडुरंगाच्या ओढीने पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. भजन, कीर्तन करत झिम्मा-फुगडी खेळत, कधी हरिपाठ तर कधी नामस्मरणाचा जयघोष करत वर्षानुवर्ष हा वारकरी वारीमध्ये चालतो.
आषाढी कार्तिकी एकादशीला | भक्तजन येती तुझ्या दर्शनाला || निरोप माझा जाऊनी सांगा|| मज भेट दे रे आगा पांडुरंगा ||

अशी पांडुरंगाच्या भेटीची ओढ सगळ्यांनाच असते. वारी हा सगळ्यांनी मिळून, अनुभवण्याचा आनंद आहे. वारीत समूहभाव असतो. सर्वांना भक्तीच्या एकाच सूत्रामध्ये बांधण्याचं काम वारीत होत असल्याने, समूहभावना वाढीस लागते. झिम्मा, फुगडी, गौळण, भारूड, कीर्तन, भजन या सगळ्या भक्तींमध्ये लहान-थोर सगळे एकरूप होतात. या भक्तीचा आनंदही समूहभावाने घेत, आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाच्या चरणावर नतमस्तक होतो. सश्रद्ध भक्तिभावाने भारावून गेलेला हा भाविक याचि देही याचि डोळा पाहत असतो…

‘सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी,
कर कटावरी, ठेवूनी या’
वारकरी संप्रदायाचा पाया रचण्यासाठी आधी दैवत आणि मग त्याचा मोठेपणा सांगण्यासाठी वाङ्मयाची निर्मिती झाली. त्यामुळे फक्त विठोबाच नाही, तर विठोबा-रखुमाईसह ज्ञानेश्वरसुद्धा इथे माऊली रूपात आहेत आणि म्हणूनच वारकरी संप्रदायाचा ‘विठोबा रखुमाई’ आणि ‘ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम’ हा मंत्र ठरला. वारकरी संप्रदाय भक्तीप्रेमाला महत्त्व देतो. प्रभू प्रेमाच्या, भगवंताच्या प्रेमात कोणताच भेदभाव येत नाही. देव वेगळा आणि मी वेगळा असे जो मानतो तो विभक्त आणि जो मानत नाही तो भक्त असतो. एकदा वारकरी झालात की, मग ‘भेदाभेद अमंगळ’ ठरतात आणि चंद्रभागेच्या वाळवंटात नाचताना तर…

क्रोध अभिमान केला पावटणी
एकएका लागतील पाया रे…
वर्ण, अभिमान विसरली याती
एक एका लोटांगणी जाती
वारकरी संत परंपरेने देवाला माणसामध्ये आणलं. जनाईला दळताना मदत करणारा पांडुरंग साक्षात स्वयंपाक घरापर्यंत आला. आई-वडिलांची सेवा करणाऱ्या पुंडलिकानं ‘थोडं थांब’ म्हणून वीट फेकली आणि तो भूवैकुंठी येऊन युगानुयुगे भक्तांची वाट पाहत उभा राहिला. नरहरी सोनाराचा भाता त्याने चालवला. विठोबा असा भक्तांच्या घरात गेला. शेतात गेला. माणसांच्या कष्टात सामावला आणि आनंदाचं निमित्त झाला. सावत्याची ‘कांदा, मुळा भाजीच अवघी विठाई झाली.’ ही सगळी लेकरं विठू माऊलीच्या अंगा-खांद्यावर विसावली. विठोबा असा कुटुंब वत्सल आहे. लेकुरवाळा आहे.

निवृत्ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात धरी
पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर
गोरा कुंभार मांडीवर, चोखा जीवाबरोबर
बंका कडीयेवर, नामा करांगळी धरी
जनी म्हणे गोपाळा, करी भक्तांचा सोहळा
भक्तांनी भक्तिभावानं निर्माण केलेला असा हा भगवंत आहे. या वारकऱ्यांमध्ये शेतीकाम, कुंभारकाम करणारे, अठरापगड जाती-धर्माचे कष्टकरी आहेत. शोषित, स्त्री-पुरुष आहेत. त्यांना त्यांचे दुःख कुणाजवळ तरी व्यक्त करत मोकळं व्हायचंय. दुःखातून मुक्त होण्याच्या अपेक्षेने हा भक्त वारकरी इथे येतो. आई सगळी दुःख पदराखाली घेते आणि बाळाच्या सुखासाठी झटते. विठू माऊलीचे रूप यापेक्षा वेगळे नाही. ही माऊली भक्तांवर मायेची पाखर घालते. या प्रेमाचा उत्सव मग सातत्याने होतो. कधी भजन, कीर्तनाच्या रूपाने, तर कधी नामस्मरणाच्या. आषाढी, कार्तिकी वारी हा या उत्सवाचा परमानंद असतो.

‘पंढरीची वारी |आहे माझे घरी |
आणिक न करी | तीर्थव्रत ||
अशी तुकोबांनी स्वतःबरोबरच समस्त विठ्ठल भक्तांची भावनाच मांडली आहे. त्यामुळे महिनाभर ऊन, वारा, पाऊस सहन करत पंढरपूरकडे चाललेल्या या वारकऱ्यांचा, पंढरीच्या वेशीवर पोहोचल्यानंतर मात्र धावा असतो. माझे माहेर पंढरी अशी माहेरची ओढ, विठ्ठल दर्शनाची ओढ असतेच; पण त्यानंतर प्रत्यक्ष दर्शन समोर असताना मात्र तहान-भूक हरपून जाते.

‌‘होय होय वारकरी | पाहे पाहे रे पंढरी |
असा परमानंद तिथे असतो. कारण
‘ऐसा ठाव नाही कोठे |
देव उभा उभी भेटे |
हे त्या पंढरीचं महात्म्य तुकोबाराय कौतुकाने सांगतात म्हणूनच आषाढीच्या निमित्ताने श्रद्धेने पंढरीकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या ओठी अभंग असतो…

‘आधी रचली पंढरी |मग वैकुंठ नगरी||
कंठातून घुमणारा असा स्वर हृदयातल्या माऊलीचा जयघोष करत असतो.
अठरापगड जातींना, भक्तीच्या निमित्ताने सुखेनैव एकत्र नांदवणारा हा विठुराया भक्तांच्या घरापर्यंत, कर्मापर्यंत पोहोचतो. कधी त्याने कबिराचे शेले विणले. कधी गोऱ्या कुंभाराचा चिखल तुडवला म्हणूनच या पांडुरंगाला आवडणारा प्रसाद म्हणजे काला हा सुद्धा एकतेचं प्रतीक आहे. सगळ्या घरून आणलेली शिदोरी एकत्र करून केलेला काला हा कालातीत समानतेचा पुरस्कार करणारा आहे. आपल्या कर्मातच ईश्वराचे रूप बघणाऱ्या, या वारकऱ्याने कर्मकांडाला नाकारून, भागवत धर्माची पताका फडकवली.

विठू नाम घेत, पंढरीच्या दिशेने चालणारी ही पावलं कुण्या एका वारकऱ्याची नाहीत, तर सगळ्या दिंड्यांची आहेत. समूह भावनेतून निर्माण होणारे ऐक्य आणि ऐक्यातून निर्माण होणारा आनंद हा वारीचा स्थायीभाव आहे. समूहाने नामस्मरण करणे, समूहाने वारी करणे हा समानतेचा, बंधुतेचा प्रत्यय क्षणाक्षणाला येतो या वारकऱ्यांच्या वारीतून. ओव्यांपासून, अभंग, भारूड, गवळणीपर्यंत समग्र संत साहित्याला स्वरांचा स्पर्श झाल्यामुळे तो अभंग, ती कविता आपोआपच रोचक आणि नित्यस्मरणीय होते. वक्तृत्व, संगीत, अभिनय अशा सगळ्या कलांचं उपयोजन वारीत कीर्तन, भारूड अशा कलांमधून होतं. समाजाकडून उपेक्षा, अवहेलना सोसून सुद्धा ‘जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात’ असे विश्वात्मक देवाकडे पसायदान मागणारे ज्ञानदेव, जीवनातल्या सगळ्या वृत्ती प्रवृत्तींना शांतचित्ताने, सद्विचाराने सामोरे जाता येते, हा विचार पसायदानाच्या रूपाने आपल्याला देतात.

वारीमध्ये संत साहित्याचा जागर होतो; कारण संत साहित्याने नेहमी मूल्यांचा आग्रह धरला. आपणही तो अंगीकारला, तर आपल्या निरामय जीवनासाठी ते फार मोठे संचित असेल.बा. भ. बोरकर यांनी संतांचे हे ऋण अतिशय मार्मिक भाषेत व्यक्त केले आहे. वारीमध्ये आणि पांडुरंगाच्या सेवेत बोरकरांच्या या भावनेचा आपल्याला वारंवार पुन्हा प्रत्यय येत राहतो.

“दूध आईचे आटता, तिच्या हाके धावलीस
माय होवूनिया मला, वेळोवेळी पावलीस,
उचलून ओटीपोटी, सुखे लाविलेस उरा,
पान्हा पोसणारा तुझा झाला अमृताचा झरा”
आज एकविसाव्या शतकात नवी पिढी नव्या विचारांनी वारीमध्ये सहभागी होते आहे… ही नवी पिढी नव्या जीवन प्रवाहांना स्वीकारणारी आणि विज्ञाननिष्ठ आहे. जीवनात आपण माणसं फक्त धावतो आहोत. पोटासाठी धावणारी आपण माणसं, वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी अव्याहत व्यस्त आहोत. नोकरीसाठी वाटेल ते …इतके पराकोटीचे महत्त्व करिअरला आणि पैशाला दिले जाते. मग जीवाचा आटापिटा करत, परिस्थितीशी तडजोड करत, सगळी वाटचाल होते. प्रसंगी कुटुंबाची फरफट होते. मुलं हट्टी आणि एकलकोंडी बनतात. आई-वडिलांनी आपल्यासाठी वाटेल ते करावं, ही भावना बळावते आणि मुलांना आपण वेळ देऊ शकत नाही म्हणून हट्ट मान्य करण्याचा पालकांचाही केविलवाणा प्रयत्न असतो. या सगळ्यात माणसांचं मनस्वास्थ्य ढासळतं.

म्हणूनच आजच्या बद्दलत्या, धावत्या युगातही दिंडी, वारी, वारकरी आणि संत विचार आपल्याला प्रभावी वाटतात. आपले मनसामर्थ्य वाढवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी संतांनी मौलिक मार्गदर्शन केले आहे. आजच्या काळात संत विचारांची सोबत सर्वात महत्त्वाची आहे. आजच्या अहंकेंद्री, भोगप्रधान स्पर्धात्मक, हिंसात्मक, विचारातून समाजाला मुक्त करायला हवं. माणसाला तणावमुक्त आणि विकारमुक्त करणं ही काळाची गरज आहे. स्पर्धा, भोग, स्वार्थ, संपत्ती यांच्यामागे लागण्यापेक्षा परस्पर स्नेहभाव, ऋणानुबंध, विश्वास आणि मैत्रीवर आधारित समाज जीवनच सगळ्यांना प्रगतीकडे आणि समाधानाकडे नेईल. ऐहिक सुखाची लालसा बाळगणाऱ्या जगाला संत त्या आकर्षक भासणाऱ्या जगाची क्षणभंगुरता पटवून देतात आणि शाश्वत सुखप्राप्ती देणाऱ्या मूल्य विचारांचा आग्रह धरतात. या प्रबोधनाने आपल्या विचारात परिवर्तन होते. हे संत साहित्याचे योगदान आहे.

‘आपुलाले चित्त शुद्ध करा’ या न्यायाने आपला आणि पर्यायाने समाजाचा विकास होण्यासाठी चित्तवृत्ती शुद्ध ठेवून विचाराला कृतीची जोड देऊया.

‘कंठी मिरवा तुलसी | व्रत करा एकादशी’
इथे तुळशीची माळ आणि एकादशी यांचे वाच्यार्थ न घेता, ते प्रतीक आहे, हे लक्षात घेऊया. अनेक आकारांचे मणी जोडून माळ तयार होते. तसेच समाजातल्या सगळ्या घटकांना एकत्र गुंफणे, हे मूलभूत सूत्र यामागे आहे आणि एकादशी याचा अर्थ संतुलन. ती फक्त तिथी नाही, तर दहा इंद्रियांचा मिळून देह बनला आहे आणि अकरावे मन. या सगळ्यांचे संतुलन म्हणजे एकादशी.

या आषाढी एकादशीच्या निमित्ताने संत विचाराची कास धरली, तर ‘आनंदाचे डोही, आनंद तरंग…’ हे वास्तव सर्वत्र दिसेल.

(क. जे. सोमैया कला आणि वाणिज्य महाविद्यालय, घाटकोपर, मुंबई )

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -