क्राइम – अॅड. रिया करंजकर
मुंबई हे असे शहर आहे, जिथे दररोज लाखो लोक घर खरेदी-विक्री करतात. करोडोंची उलाढाल ही घर खरेदी-विक्रीमध्ये होत असते. यामध्ये अनेक लोकांची फसवणूक केली जाते म्हणून घर घेताना विचार करून आणि अनेकांचे सल्ले घेऊनच घर घेतले पाहिजे; पण काही लोक असे असतात की, ज्यांना एखादे घर आवडले, तर ते लगेच घेऊन मोकळे होतात आणि मग शेवटी त्यांना पश्चातापाशिवाय कोणताही पर्याय उरत नाही.
शोभा ही अनेक वर्षं भाड्याच्या घरात राहिल्यानंतर स्वत:चं घर पाहिजे, असा विचार तिच्या मनात आला. त्यामुळे शोभाने आपल्या ओळखीच्या व्यक्तींना कुठे घर असेल तर सांगा, असे सांगून ठेवले होते. शोभाच्या जवळचीच एक व्यक्ती घर विकत असल्याची माहिती मिळाली. १५ लाखांपर्यंत चाळीमध्ये घर आहे, असे त्या व्यक्तीने सांगितले.
शोभाने ते घर बघितलं आणि तिला ते घर फार आवडलं. चाळीतलंच घर होतं. तिच्या ऐपतीप्रमाणे ते घर होतं. त्याच्यामुळे तिने ते घर घेण्याचे ठरवलं. त्यासाठी काही रक्कम तिने घरमालक सुरेशला दिली व थोडे पैसे तिने आपले दागिने ठेवून दिले. शोभा ही अगोदरच भाड्याने राहत होती. त्याच्यामुळे तिचे लिव्ह लायसन्स संपायला अजून दोन-तीन महिने होते म्हणून घर मालक बोलले की, आम्ही तोपर्यंत इथे भाड्याने राहतो. आम्हाला दुसरं घर मिळालं की, आम्ही इथून जातो. शोभालाही ते पटलं आणि त्यांच्या दोघांमध्ये लिव्ह लायसन्स एग्रीमेंट तयार झालं. त्याचदरम्यान पूर्ण देशभर लॉकडाऊन झाल्यामुळे शोभा आणि त्यांचे कुटुंब गावी गेले होते. त्या घरामध्ये पूर्वीचा मालक सुरेश राहत होता. लॉकडाऊन संपल्यानंतर शोभा आणि त्याचं कुटुंब मुंबईत आल्यानंतर त्यांनी त्या घराचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी सुरेश काही त्या घरातून बाहेर पडेना. सुरेश शोभाला सांगू लागला की, हे घर माझं आहे आणि या घरातून मी बाहेर पडणार नाही; पण रूमचा व्यवहार झालेला होता आणि शोभा ही त्या घरची आता मालकीण होती, तरीही सुरेश घरातून बाहेर पडायला तयार नव्हता. सुरेशला शोभाने घरी राहायला दिलं, तेच चुकीचं केलेलं होतं. आजूबाजूची लोकं शोभाला गाठून, मालकाबद्दल काही गोष्टी सांगू लागल्या. सुरेशने अजून दोन लोकांना हे घर विकलेलं आहे आणि त्यांनाही आम्ही थोडे दिवस भाड्याने राहतो, असं सांगितलेलं आहे आणि त्या दोन मालकांबरोबरही त्याने लिव्ह अॅण्ड लायसन्स एग्रीमेंट केलेलं आहे. शोभाने गावी घर घेतलं, त्या दरम्यान लॉकडाऊन झाल्यामुळे, शोभाला त्या घरचा मीटर आणि गॅस बदलायला वेळच मिळाला नव्हता. दुसऱ्या व्यक्तीने ते घर घेतलं होतं, त्यांनी मात्र तिथलं लाईट बिल बदललेलं होतं म्हणून शोभाने सुरेशला घर विकलं होतं. त्या दोन व्यक्तींचा शोध घेतला, त्यावेळी त्यांच्याकडे पेपरनुसार तिला असं समजलं की, ती प्रथम खरेदीदार आहे म्हणून तिने पोलिसात तक्रार केली आणि पोलिसांनी त्याला तुमच्याकडे व्यवस्थित कागदपत्र असेल, तर कोर्टात जा, असा सल्ला दिला आणि कोर्टात जाण्याच्या अगोदर सुरेशशी बोलून घ्यावं, असं तिने ठरवलं; पण सुरेश मात्र त्या घरातून बाहेर पडायला तयार नव्हता.
शोभानंतरच्या दोघांनी ते घर परत विकत घेतलं होतं. त्यांना या भानगडी नको होत्या म्हणून त्यांनी सरळ सांगितलं की, आम्हाला आमचे पैसे परत द्या. सुरेश तेही पैसे द्यायला तयार नव्हता. शेवटी शोभाने कायदेशीर मार्गाने लढा लढवायचा ठरवला आणि त्यासाठी सुरेशच्या विरुद्ध तिने कोर्टामध्ये केस फाइल केली. शोभाने घर विकत घेताना, तो मालक कसा आहे, याची चौकशी आजूबाजूला केली नव्हती. घर चांगलं दिसलं म्हणून ते तिने विकत घेतलं होतं. विकत घेतल्या घेतल्याबरोबर तिने स्वतःच्या नावावर लाइट बिल आणि गॅस कनेक्शन करून घ्यायला पाहिजे होतं, ते मात्र तिचं राहून गेलं. कारण त्याचदरम्यान जगभरात लॉकडाऊन झालेला होता आणि परत आल्यानंतर तिने ते करायला पाहिजे होतं, ते राहून गेलं. एवढंच नाही तर तिची सर्वात मोठी चूक होती की, ती स्वतः भाड्याने राहत असताना, तिने विकत घेतलेल्या रूममध्ये दुसऱ्याला तरी भाड्याने ठेवायचं होतं. ते न करता जो मालक होता, त्याच्यावर विश्वास ठेवून, तिने त्यालाच त्या घरामध्ये भाडोत्री म्हणून ठेवलं होतं.
सुरेश त्या घरात राहत होता. सुरेशकडे जे घराचे मूळ पेपर होते, ते शोभाने घेतले नव्हते. त्यामुळे सुरेशने अजून तीन जणांची फसवणूक केली होती. शोभाने त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला होता. आता केस कोर्टामध्ये चालू आहे. निकाल जेव्हा लागेल तेव्हा लागेल; पण तोपर्यंत शोभा आणि बाकीच्या दोन खरेदीदारांना विनाकारण मानसिक त्रास सहन करावा लागत आहे म्हणून घर खरेदी करताना थोडा वेळ लागला तरी चालेल; पण चौकशी करून आणि पूर्ण माहिती घेऊनच घर विकत घ्या. नाही तर विनाकारण मानसिक त्रासाला समोर जावे लागते. त्यामुळे मानसिक त्रास आणि आर्थिक नुकसानही होते.
(सत्यघटनेवर आधारित)