प्रवाशांची मोठी तारांबळ
मुंबई : काही दिवसांपासून मुंबईमध्ये पावसाने (Mumbai Rain) चांगलीच हजेरी लावली आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत पावसाचा जोर आणखी वाढला आहे. मात्र या जोरदार पावसामुळे (Heavy Rain) अनेक ठिकाणी पाणी साचून नागरिकांची तारांबळ उडाली आहे. एकीकडे अतिवृष्टीमुळे रेल्वेसेवेवर (Mumbai Local) बसलेला फटका सुरळीत करण्यासाठी रेल्वेने ब्लॉक (Megablock) जारी केला आहे. अशातच पश्चिम रेल्वेवरही (Western Railway) दोन स्थानकांदरम्यान झाड कोसळल्याने रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होऊन मोठी गैरसोय झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास प्रभादेवी (Prabhadevi) आणि दादर (Dadar) दरम्यान झाड कोसळल्याने पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत झाली होती. तर बोरीवलीच्या (Borivali) दिशेने जाणाऱ्या धिम्या मार्गावरही पिंपळाचे झाड कोसळले. ऐन रेल्वे रुळावर झाड कोसळल्याने धिम्या मार्गावरील लोकल तासभर उशिरा आल्यामुळे प्रवाशांची तासभर रखडपट्टी झाली होती. दरम्यान, झाड पडलेला मार्ग सुरळीत करुन तासाभरानंतर बोरीवलीच्या दिशेने धिम्या मार्गावरील गाड्या सुरू करण्यात आल्या.
मुंबईत पावसाची इतकी नोंद
आज सकाळी मुंबई उपनगरात सकाळी पाच वाजेपर्यंत १३१.२ मिलिमीटर तर मुंबई शहरात ७७.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. साडेपाच वाजेपर्यंत दहिसरमध्ये १७१ मिमी, मुंबई एयरपोर्टमध्ये ११२ मिमी, राम मंदिरपरिसरात १५१ मिमी, टाटा पॉवर (चेंबूर)मध्ये ५१ मिमी, विक्रोळीत १३१.५ मिमी, भायखळा ६५.५ मिमी, महालक्ष्मी २७.५ मिमी, माटुंगा ७१.५ मिमी, तर सायनमध्ये ८१. २ मिमी पावसाची नोंद झाली. तर मुंबईत पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.
मुंबईला येलो अलर्ट
मुंबईत काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अशातच पुढील ४८ तास मुंबईत पावसाच्या धारा आणखी वाढणार असल्यामुळे येलो अलर्ट देण्यात आला आहे.