रेल्वेगाड्यांना दोन ते अडीच तास उशीर
रत्नागिरी : कोकणात मागच्या आठवडाभरापासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे कोकणातल्या अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला असून हे पूराचे पाणी अनेक गावांमध्ये शिरले आहे. या पावसाचा फटका रस्ते वाहतुकीसोबत रेल्वे वाहतुकीवर देखील झाला आहे. मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. अनेक रेल्वे गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. एकाच ठिकाणी गाड्या थांबून असल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
पावसामुळे कोकण रेल्वेचा वेग मंदावला आहे. मुंबईहून मडगावकडे जाणारी कोकणकन्या एक्स्प्रेस आणि दादर सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस २ तास उशिराने धावत आहेत. मुंबईहून येणाऱ्या आणि मुंबईकडे जाणाऱ्या ट्रेन दोन ते अडीच तास उशिराने धावत आहेत. मंगळूरू एक्स्प्रेस दोन तास उशिराने आहे. तुतारी एक्स्प्रेस दोन तास उशिराने आहे. तर मुंबईच्या दिशेने जाणारी मंगला एक्स्प्रेस अडीच तास विलंबाने आणि निजामुद्दीन एर्नाकुलम एक्सप्रेस सहा ते सात तास उशिराने धावत आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड भिंगळोली एसटी डेपो ते शासकिय रेस्टहाऊस तसेच समर्थ अपार्मेट याठिकाणी पुन्हा पुराचे पाणी शिरल्याने वाहन चालकाना कसरत करावी लागत आहे. रस्ता जलमय झाल्याने वाहन चालवणे चालकांना कठीण झाले आहे. जिल्हयात रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे वेंगुर्ले बेळगाव राज्य मार्गावरील होडावडे पुलावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक वेंगुर्ले मठ मार्गाने वळविली आहे. तर कसाल आंब्रड पोखरण कळसुली मार्गावर कुंदे येथे पुलावर पाणी आल्याने कसाल कळसुली मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हयात आज रेड अलर्ट जारी
सिंधुदुर्ग जिल्हयात आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात सर्वत्र पावसाची संततधार पाऊस सुरू आहे. जिल्हयात रात्री सावंतवाडी, कणकवली, कुडाळ, दोडामार्ग तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळला. किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने जिल्हयात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.