विशेष – भालचंद्र ठोंबरे
जय व विजय हे विष्णूच्या वैकुंठाचे द्वारपाल होते. ब्रह्मांड पुराणानुसार ते वरुण व पत्नी स्तुता यांचा मुलगा कली याचे पुत्र होते. त्यांना प्रत्येकी चार हात असून, जयच्या वरच्या डाव्या हातात चक्र व उजव्या हातात शंख तर खालच्या डाव्या हातात गदा, तर उजव्या हातात तलवार आहे. विजयच्या वरच्या डाव्या हातात शंख व उजव्या हातात चक्र, तर खालच्या डाव्या हातात तलवार, तर उजव्या हातात गदा असते.
भागवत पुराणानुसार, विश्वाच्या निर्मितीच्या सुरुवातीला ब्रह्मदेवाने आपल्या तपश्चर्येने व इच्छेने चार पुत्रांची उत्पत्ती केली. ते म्हणजे सनक, सनंदन, सनातन व सनतकुमार. त्यामुळे यांना ब्रह्मदेवाचे मानसपुत्र म्हणतात. ते वेद विद्या पारंगत व सर्व शास्त्र संपन्न होते. मात्र त्यांनी आम्हाला नेहमीच्या बाल रूपातच राहू द्यावे, अशी ब्रह्मदेवाजवळ इच्छा व्यक्त केल्याने ते वयस्कर, ज्ञानी असूनही नेहमीच बालस्वरूपात व नग्न स्वरूपात होते. एके दिवशी हे चारही मुनी विष्णूंना भेटण्यासाठी वैकुंठात गेले होते. त्यावेळी विष्णूचे द्वारपाल जय आणि विजय यांनी त्यांना विष्णूच्या भेटीसाठी जाऊ देण्यास अटकाव केला. त्यांनी अनेक प्रकारे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला; परंतु जय आणि विजय यांनी त्यांना प्रवेश देण्यास नकार दिला. तेव्हा सनतकुमारांनी जय व विजयला तुम्ही श्री विष्णूंच्या सान्निध्यात असूनही अहंकारी आहात, असे म्हणून त्यांना अद्दल घडविण्याच्या उद्देशाने क्रोध धारण करून, तीन जन्म दैत्याच्या रूपात पृथ्वीवर राहण्याचा शाप दिला. हा कोलाहल ऐकून, विष्णू त्या ठिकाणी प्रकट झाले. तेव्हा जय आणि विजय यांनी विष्णूंकडे शापमुक्त करण्याची विनंती केली. मात्र हे मुनीवर माझे परमभक्त असून, त्यांची अवज्ञा म्हणजे माझी अवज्ञा आहे. त्यामुळे तुमच्या असभ्य वर्तनाबद्दल तुम्हाला झालेला दंड योग्यच आहे, असे म्हणून जय आणि विजयच्या असभ्य वर्तनाबद्दल श्री विष्णूंनी मुनीवरांची क्षमा मागितली.
श्री विष्णूंच्या बोलण्याने प्रभावित झालेल्या व प्रसन्न झालेल्या मुनीवरांनी आपण क्रोधाच्या भरात शाप दिला असून, यापासून आपण त्यांना मुक्त करू शकता, असे श्रीविष्णूंना सांगितले. मात्र असे करता येत असूनही तसे करणे, हे धर्माच्या विरुद्ध होईल आणि आपल्याकडून घडलेले वर्तन हे माझ्या प्रेरणेनेच झालेले आहे. त्यामुळे त्यांना हा दंड योग्यच आहे असे म्हटले. अखेर जय आणि विजय यांनी मुनीवरांची आपल्या वर्तनाबद्दल क्षमा मागून, आपणास शापमुक्त करण्याची विनंती केली; परंतु आता शापमुक्ती करणे अशक्य असून, त्याऐवजी मी दोन पर्याय देऊ इच्छितो. पहिल्या पर्यायानुसार आपण सात जन्म विष्णू भक्त म्हणून पृथ्वीवर राहाल, तर दुसऱ्या पर्यायानुसार आपण तीन जन्म विष्णूंचे शत्रू म्हणून भूतलावर राक्षस योनीत राहाल, यापैकी एक पर्याय निवडण्यास सांगितले. सात जन्म विष्णूपासून दूर होण्याची कल्पना जय आणि विजयला असह्य असल्याने त्यांनी तीन वर्षांत शत्रू होऊन, तीन वर्षांत परत येण्याचा पर्याय निवडला. प्रत्येक जन्मात विष्णू स्वतःच येऊन तुमचा वध करून, तुम्हाला मोक्ष मिळवून देतील, असेही मुनींनी सांगितले. त्यानुसार सतयुगात कश्यप व दिती यांच्या पोटी जय हिरण्यकश्यप व विजय हिरण्याक्षच्या रूपात जन्मले.
श्री विष्णूंनी हिरण्यकश्यपूचा नृसिंह रूपात वध केला, तर पृथ्वीला समुद्रात घेऊन जाणाऱ्या हिरण्याक्षाला वराह रूपाने विष्णूंनी ठार करून मुक्त केले. दुसऱ्या जन्मात त्रेता युगात महर्षी विश्ववा व कैकसी यांच्या पोटी जय रावण म्हणून आणि विजय कुंभकर्णाच्या रूपात जन्माला आले. त्या युगात विष्णूंनी श्रीराम अवतारात त्यांचा वध करून, त्यांना मुक्ती मिळवून दिली, तर तिसऱ्या जन्मात चेदी देशाचा राजा दमघोष व राणी श्रुतश्रवा (श्रीकृष्णाचे वडील वासुदेवची बहीण) यांच्या पोटी जय शिशुपाल म्हणून तर विजय करूष देशाचा राजा वृद्धशर्मा आणि श्रुतदेवी (श्रीकृष्णाची आई देवकीची बहीण) यांच्या पोटी दंतवक्रच्या रूपाने जन्माला आला. युधिष्ठिराच्या राजसूक्त यज्ञाच्या वेळी श्रीकृष्णाने शिशुपालाचा वध केला, तर राजसूत यज्ञावरून परतत असताना दंतवक्राने कृष्णावर हल्ला केला, तेव्हा झालेल्या गदा युद्धात श्रीकृष्णाने दंतवक्राचा वध करून, त्याला मुक्ती दिली.
अशा प्रकारे जय आणि विजय मुक्त होऊन पुन्हा वैकुंठी गेले.