एका ठरावीक वेळेनंतर टीनएजर्स मुलांमध्ये विचार, मतं, पद्धती, लाइफ स्टाइलची आवड, भावना निर्माण होतात. भावना या तात्पुरत्या असतात. भावनांक समृद्ध झाल्याने, येणारा संयम वापरून, त्या व्यक्त केल्यास, मुलांना त्यातून संस्मरणीय अनुभव येऊ शकतात.
आनंदी पालकत्व – डाॅ. स्वाती गानू
श्रुतिका घरी आली, तीच मुळी फणफण करत. ती कॉलेजमधून आता येईलच म्हणून आईने तिच्या आवडीचं खायला केलं होतं; पण तिने आईला स्पष्ट सांगितलं. ‘‘आई प्लीज, मला नकोय हे. रोज रोज घरगुती पदार्थ. काही तरी स्पायसी, जरा वेगळं करत जा गं. ही मिडलक्लास मेन्टलिटी सोड. आहे त्यातच भागवायची. सारखी काटकसर. मन मारून जगत राहायचं आणि आम्हालाही तसंच जगत राहायला लावायचं. कॉलेजमध्ये ट्रीट द्यायची, तर शंभर वेळा विचार करावा लागतो आणि मग जर आपण देऊ शकणार नसू, तर मग इतरांनी दिलेलं कसं खायचं?” श्रुतिका वैतागून बोलतच होती.
तशी आईजवळ आली आणि म्हणाली, “आज काय झालंय की, तुझा स्वतःवरचा ताबा सुटलाय?” आईच्या शांत आवाजाने श्रुतिका भानावर आली. तिचा स्वर थोडा खाली आला; पण आवाजात संताप होताच. चीड, वैताग होता. आई चिडू नको तर काय करू? ती मैफली, सुदीप, निशा, देविका सगळे शॉपिंगला चाललेत आज. सेंट्रल मॉलला ५०% ऑफ आहे. मी म्हटलं मला जमणार नाही, तर देविका आणि मैथिलीने मला टॉन्ट मारला आणि म्हणाल्या, “तिला कशाला आग्रह करताय? तिला शक्य तरी आहे का, हे ॲफॉर्ड करणं?” अगं आई माझा संताप आवरला नाही. मी तिला म्हटलं, मी सेंट्रल मॉलला नाही फिनिक्स मॉलला जाणार आहे उद्या, तर ते सगळे माझ्याकडे बघून हसायला लागले. मी खूप सुनावलं त्यांना… “श्रुतिका हे सगळं खरं असलं, तरी तुझ्या भावना व्यक्त करण्याचा मार्ग योग्य नव्हता, असं वाटत नाही का तुला?” आई म्हणाली. असे प्रसंग अलीकडे घराघरात वारंवार घडतात.
मुलं ८ वी, ९वीत आल्यापासूनच त्यांना आपल्या मित्र-मैत्रिणीत अशा प्रसंगांना तोंड द्यावे लागते. कधी दिसण्यावरून, कधी अभ्यासातील प्रगतीवरून, कधी ट्रीप, शॉपिंग, हॉटेलिंग, मित्र इ. सारख्या गोष्टींवरून त्यांची एकमेकांशी घट्ट मैत्री होतेही आणि तुटतेही. या वयातील मुलांकरिता त्यांना आपल्या ‘भावना व्यक्त करणं’ शिकावं लागतं. अगदी लहान मुलं भूक लागली, कपडे ओले झाले तर रडून आपल्या भावना व्यक्त करतात. थोडं मोठं झाल्यावर आपल्याला हवी ती वस्तू नाही मिळाली की हातपाय आपटतात, जमिनीवर लोळतात. त्या नंतरच्या वयात थोडी कुरकुर असते. आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळण्यासाठी सामाजिक, सार्वजनिक जागी आपला नंबर येईपर्यंत थांबण्याची सवय लागते. या सर्व प्राथमिक स्तरावरच्या भावना सांभाळताना जुळवून घेता येते; परंतु साधारणतः टीनएजर्स मुलांमध्ये मी कोणी तरी आहे.
मलाही विचार, मतं आहेत. मला अमूक पद्धतीने, विशिष्ट लाइफ स्टाइलने जगायचंय अशा भावना निर्माण होऊ लागतात. म्हणूनच या भावना समजून घेणं, त्या योग्य पद्धतीने व्यक्त करणं, दुसऱ्याच्या भावना जाणून घेणं, त्यांचा आदर करणं हे जीवनकौशल्य (life skill) कधी सहज, मित्र-मैत्रिणींबरोबर राहून, समाजातील इतर व्यक्तींशी आंतरक्रिया (interaction) करून आत्मसात करता येतात. पण कधीकधी ते शिकावंही लागतं. त्याची जाणीव करून द्यावी लागते.
श्रुतिका ज्या मित्र-मैत्रिणींच्या गटात रोज राहते. त्यात ती तिच्या राहणीमानापेक्षा वेगळ्या किंबहुना उच्चवर्गीय अर्थात श्रीमंत मित्र वर्तुळात असते. त्यामुळे तिचा संताप झाला; परंतु त्या संतापाच्या भावना व्यक्त करताना, तो सारा राग तिने आईकडे ज्या शब्दांत व्यक्त केला, ते शब्द निश्चितच चुकीचे होते. भावना मग ती कधी असते प्रेमाची. एखाद्या मुलाचं एखाद्या मुलीवर प्रेम बसते. समोरची व्यक्ती आपल्याला खूप आवडली असली, तरी आपण प्रथम आपल्या मनातील भावना आकर्षणाची आहे की प्रेमाची आहे, हे समजून घ्यावं आणि समोरच्यालाही माझ्याबद्दल प्रेम वाटायलाच हवं असा अट्टहास, दहशत दाखवणं योग्य नाही हे कळायला हवं. आपल्याला आपल्या भावना समजून, त्यावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे, हे मुलांना मुद्दामहून सांगायला काहीच हरकत नाही.
या वयातल्या मुलांच्या मनात असूया राग, तुलना, श्रेष्ठत्व, समूहांमध्ये म्हणजेच ग्रुपमध्ये राहून मदत करण्याची किंवा त्रास देण्याची वृत्ती, उद्धटपणा किंवा नम्रता, करुणा-दया किंवा संताप-तिरस्कार या आणि अशा खूप भावना असतात. घरी किंवा बाहेर त्या व्यक्त करण्यापूर्वी समजून घ्यायच्या असतात. कारण आपल्याला आनंद होतोय, मदत करावीशी वाटतेय, त्रास देण्यात मजा वाटतेय, पैसे उडवण्यात, बंधनमुक्त जगण्यात, उद्धटपणे वागण्यात धमाल वाटतेय… इतरांचा संताप येतोय की तिरस्कार वाटतोय, कधी खूप एकटं वाटतंय, उदास वाटतंय, सारं संपलंय अशी निराशेची भावना दाटून येते हे आधी समजायला तर हवं आणि तसं वाटत असेल तर ते योग्य पद्धतीने व्यक्त करता यायला हवे.
शाळांमधून अशा प्रकारचे संवाद झाले, तर मुले मोकळी होतील. गटचर्चेत किंवा व्यासपीठावर बोलताना अमूक एखादा प्रसंग घडल्यास त्याप्रसंगी, त्यावेळी तुम्ही कसे व्यक्त व्हाल, अर्थात मुलांचा प्रतिसाद कसा असेल याबद्दल त्यांना बोलतं करायला हवं. कारण अशा प्रकारे भावना व्यक्त कशा कराव्यात, त्यासाठी मुलं विचार करू लागतात. या विचार प्रक्रियेतूनच ते आपल्या आणि दुसऱ्याच्या भावना समजू शकतात. कुटुंबातही पालक एखाद्या दुर्घटनेच्या वेळी, दहशतवादी हल्ला, आकस्मिक संकटप्रसंगी आपल्या भावना कशा व्यक्त करतात? रिॲक्ट होतात की रिस्पॉन्ड करतात? संयमाने आणि संतुलित पद्धतीने व्यक्त होतात का? याचं अनुकरण मुलं करत असतात.
भावना व्यक्त करणं, त्या समजून घेणं, स्वतःच्या भावना नियंत्रित करणं, गटाचा (group)चा प्रभाव, मैत्री हे सगळे भावना नियंत्रण जीवनकौशल्याचे टप्पे आहेत. एखादे पुस्तक, सीरियल, नाटक, चित्रपट, घडलेली घटना यांवर शाळेप्रमाणेच घरातही चर्चा करून, मुलांना आपली मते मांडायला लावावी म्हणजे त्यांना काय वाटते हे आपल्याला कळू शकते.
‘इमोशनल सेल्फ रेग्युलेशन’ हे अत्यंत महत्त्वाचे आणि आयुष्यभर उपयोगी ठरत असते. आपल्या विचार करण्याच्या कौशल्यावर, बुद्धीवर, आपल्या भावना वरचढ ठरायला नकोत. त्यांनी आपल्याला ठरविलेल्या ध्येयापासून विचलित करू नये. या भावना निर्माण होण्याच्या कारणापेक्षा ‘एक ड्रायव्हिंग फोर्स’ म्हणून बघण्यासाठी असते. त्यातूनच आपली भावनिक बुद्धिमत्ता वाढत असते आणि योग्य निर्णय घेण्यासाठी आवश्यक असणारा मनाचा सकारात्मक दृष्टिकोन ती तयार करत असते. प्रत्यक्ष संधी देऊन, याचा मुलांना अनुभव द्यायला हवा.
भावना या तात्पुरत्या असतात. ती मनाची एक तात्कालिक अवस्था असते. म्हणूनच ती चुकीच्या पद्धतीने व्यक्त करून नंतर पश्चाताप करण्यापेक्षा शक्य तितका भावनांक समृद्ध झाल्याने, येणारा संयम वापरून, त्या व्यक्त केल्यास, मुलांना त्यातून संस्मरणीय अनुभव येऊ शकतात.