संवाद – गुरुनाथ तेंडुलकर
राजा विक्रमादित्याला राज्याच्या प्रधानपदासाठी एका तरुण आणि हुशार व्यक्तीची आवश्यकता होती. त्यासाठी त्याने अनेक तरुणांच्या मुलाखती घेतल्या. अनेक कठोर परीक्षा घेतल्या. उत्सुक तरुणांपैकी एक एक वगळत अखेरीस दोन तरुण प्रधान होण्यासाठी योग्य आहेत असं त्याला आढळलं. दोघंही साधारण एकाच वयाचे. दोघेही हुशार, बुद्धिमान, चतुर आणि साहसी.
दोघांतल्या कुणाला निवडावं हा निर्णय राजाला करता येईना. अखेरीस त्याने आपल्या गुरूंवर, ऋषी पंचभूतेश्वरांवर निर्णय सोपवला. दोन्ही युवकांना ऋषी पंचभूतेश्वरांच्या आश्रमात पाठवून दिलं. ऋषींनीही त्या दोन्ही मुलांची वेगवेगळ्या प्रकारे पुन्हा परीक्षा केली. दोघेही समान गुणाने उत्तीर्ण झाले. अखेरीस ऋषी पंचभूतेश्वरांनी दोन्ही तरुणांना एक एक कबुतर दिलं आणि म्हणाले, ‘तुम्ही दोघंही वेगवेगळ्या दिशेनं जा आणि जिथं कुणीही बघणार नाही अशा जागी जाऊन या कबुतराला मारून परत या.’
दोन्ही तरुण कबुतर घेऊन दोन दिशांना गेले. दोघांपैकी एकजण तासाभरातच परतला.
‘काय झालं? मारलंस का कबुतर?’ ऋषींनी विचारलं.
‘हो.’ तरुण अभिमानानं उत्तरला.
‘कुठे आणि कसं मारलंस ते सांग.’
‘आपण सांगितल्याप्रमाणे निघालो. दाट जंगलात गेलो. एका झाडाजवळ थांबलो. एक आडोसा शोधला. एका बाजूला भलंमोठं झाड होतं, दुसऱ्या बाजूला पहाडाचा प्रचंड उंच सुळका होता. कुणीही पाहात नव्हतं. कट्यार काढली आणि कबुतराच्या मानेवरून अलगदपणे फिरवली.’
‘कुणीच पाहिलं नाही तुला?’
‘छे… तिथे कुणीसुद्धा नव्हतं. अगदी सुनसान जागा होती.’ तरुण आत्मविश्वासपूर्वक उत्तरला.
‘ठीक आहे. तू जाऊ शकतोस.’ ऋषींनी त्या तरुणाला जाण्याची आज्ञा दिली.
दुसरा तरुण मात्र संध्याकाळपर्यंत आश्रमात परतलाच नाही. रात्र झाली… रात्र सरली देखील पण त्याचा पत्ता नव्हता. ऋषींनी आश्रमातील इतर विद्यार्थ्यांना त्या तरुणाचा शोध घेण्यासाठी धाडलं आणि दुपारच्या सुमारास तो तरुण सापडला. तो तरुण आश्रमात परतला त्यावेळी त्याच्याबरोबरचं ते कबुतर जिवंत होतं.
‘काय झालं? कबुतर जिवंत कसं?’ ऋषींनी विचारलं.
‘नाही मारू शकलो मी या कबुतराला.’ तो तरुण खिन्नपणे उत्तरला
‘कां ? भीती वाटली?’
‘नाही भीती कसली? मी क्षत्रीय आहे. वाघ सिंहांची शिकार केली आहे मी.’
‘मग…?’
‘पण मी या कबुतराला मारू शकलो नाही.’
‘का?’
‘कारण तुम्ही म्हणाला होता की जिथं कुणीही पहात नाही अशाच जागी कबुतराला मार.’
‘मग अशी एकही जागा तुला आढळली नाही?’ ऋषींनी आश्चर्यानं विचारलं.
‘खरंच नाही आढळळी. मी जंगलात गेलो. आडोसा शोधला. कट्यार उपसली तोच माझ्या ध्यानी आलं की एक माकड झाडावर बसून काहीतरी करतंय… मी त्या माकडाला हाकललं. पुन्हा कट्यार उपसली त्यावेळी लक्षात आलं की पलीकडे झाडाच्या बुंध्यावर एक मुंग्यांची भलीमोठी रांग चाललीय. त्या मुंग्या माझ्याकडे पाहत असतील… मी दुसरीकडे गेलो. तिथंही कुणीतरी होतंच, किडे-मुंग्या आकाशात उडणारे पक्षी… मी रात्र होईतो थांबलो. पण रात्रीही रातकिडे ओरडत होते. ते मला दिसत नव्हते पण कदाचित मी त्यांना दिसत असेन असं मला वाटलं. मी पहाटेपर्यंत थांबलो आणि रातकिड्यांची किरकीर थांबल्यानंतर कबुतराला मारण्यासाठी कट्यार उपसली. पण माझ्या ध्यानात आलं की मी स्वतःच हे सगळं पाहतोय… मी डोळे मिटले. पण नंतर लक्षात आलं की मी जरी डोळे मिटले तरी कबुतराचे डोळे उघडे असतील. मी एका हाताने त्या कबुतराचे डोळे झाकले आणि कट्यार चालवणार तोच माझ्या ध्यानी आलं की मी डोळे मिटूनही मला ते कबुतर दिसतंय… माझ्या आत कुणीतरी आहे ज्याला हे सारं दिसतंय. माझ्या बंद डोळ्यांच्या आडूनदेखील कुणीतरी पाहतोय हे मला जाणवलं आणि मी त्या कबुतराला मारू शकलो नाही.
‘शाब्बास…!’ ऋषींनी त्या तरुणाच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली…
अनेकदा माणसं अशा गोष्टी करतात की ज्या करताना आपल्याला कुणीही पाहत नाही असं त्यांना वाटत असतं. त्या गोष्टी ‘काही समाज विघातक कृत्य’ असतात किंवा ‘फार मोठं पाप’ असतं अशातला भाग नसेलही, पण तरीही ‘कुणी पाहत नाही.’ किंवा ‘कुणालाही कळणार नाही.’ असं म्हणून लोक चुकीचे वागतात आणि लोकांचंच कशाला आपणही ‘कुणी पाहत नाही ना.’ हे पाहून अनेकदा चुकीचं वागतो.
त्या वागण्याचे परिणाम कधी दिसतात, तर कधी दिसत नाहीत. पण परिणाम मात्र होतातच. कधी हे परिणाम अगदी सामान्य असतात तर कधी भयानक असतात.
वास्तविक कोणत्याही सत्कृत्याचा काय किंवा दुष्कृत्याचा काय पहिला साक्षीदार त्या माणसाचा स्वतःचा आत्मा असतो. पण ज्यांना स्वतःच्या आत्म्याची जाणीवच नसते अशी माणसं काय करणार?
‘कुणी बघत नाहीये ना? मग करूया की थोडा आराम.’ असं म्हणणारा ऑफिसमधला कर्मचारी…
कुणाचं लक्ष नाही म्हणून बागेतली फुलं तोडणारी गृहिणी…
शिक्षकांचं लक्ष नाहीये हे पाहून परीक्षेत कॉपी करणारा विद्यार्थी…
सर्व गुन्हेगारी वृत्तीची मुळं या ‘कुणी पहात नाहीये.’ मध्ये दडलेली असतात असं मला वाटतं.
पोलीस नाहीये असं पाहून सिग्नल तोडून पुढे जाणारा तरुण कधीतरी अचानकपणे अपघात करतो. कधी स्वतः मरतो तर कधी दुसऱ्या कुणा निरपराधाचा बळी घेतो.
कुणी पाहात नाहीये या निर्धास्त भावनेनंच चोर चोऱ्या करतात.
कुणाला कळणार नाही याची खात्री करूनच माणसं व्यभिचार करतात. भ्रष्टाचार करतात.
ट्रेनमध्ये बाॅम्ब ठेवणारे अतिरेकी ‘कुणी बघत नाही.’ हे बघूनच बाॅम्ब ठेवतात…
‘कुणाला कळणार नाही. कुणी सांगणार नाही.’ या मग्रुरीनेच गुंड अबलेवर बलात्कार करतात.
कुणाला कळणार नाही या भावनेतूनच राजकारणी नेते भ्रष्टाचार करताता आणि पुढे हा भ्रष्ट आचार हाच त्यांचा स्थायीभाव बनतो. कुणाला कळणार नाही आणि कळलं तर बघून घेऊ ही भावना फोफावते.
कुणाला कळणार नाही, आपण पकडले जाणार नाही या भावनेनंच प्रत्येक गुन्हेगार गुन्हा करीत असतो.
पुढे पुढे तर अशा प्रकारच्या वागण्याची सवय लागते. कुणी पाहात नाही म्हणून कसंही वागणारा माणूस हळूहळू निगरघट्ट होऊन कुणी पाहिलं तरी आपलं काय बिघडणार आहे अशा थाटात वावरू लागतो.
परिणामी…?
परिणामी समाजातल्या सामान्य निरपराध घटकांना त्याचे परिणाम भोगावे लागतात.
कुणाला खरं कळणार नाही याच भावनेनं माणूस खोटं बोलत असतो. पण हे खोटं बोलणं काय किंवा खोटं वागणं काय इतर कुणाला कळो किंवा न कळो ते स्वतःला तर कळतंच ना ?
म्हणूनच दुसऱ्या कुणीही पाहिलं नाही तरी आपली आतली दृष्टी आपल्याकडे सतत बघत असते याची जाणीव ठेवणं हीच सत्शीलतेची पहिली पायरी आहे.
‘देवबाप्पा सगळं बघत असतो…’ असं लहानपणी आपले आई-वडील आपल्याला सांगत असतात त्यामागची भूमिका हीच असते. देव आहे की नाही? आणि असला तरी तो बघतो की नाही? या चर्चेत न पडता आपल्या
आत कुणीतरी आपल्यावर सतत लक्ष ठेवून आहे याची जाणीव प्रत्येकाने ठेवायला हवी.
मी जे काही करतोय ते इतर कुणालाही कळो, वा न कळो ‘ते आपल्याला’ कळतंय याची जाणीव प्रत्येकाने ठेवायला हवी.
कथेतल्या दुसऱ्या तरुणानं आतल्या डोळ्यांनी कबुतर पाहिल्यामुळे त्याला ते मारणं शक्य झालं नाही. तशाच प्रकारे प्रत्येकाने स्वतःची कृती डोळ्यांच्या आतल्या डोळ्यांनी तपासून पाहू लागलो तर…
तर माणसा माणसातल्या समस्या बऱ्याच प्रमाणात दूर होतील असं मला वाटतं.