वॉशिंग्टन: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणुकीच्या रॅलीत गोळीबार झाला असून ते यात जखमी झाले आहेत. तेथील स्थानिक वेळेनुसार शनिवारी पेनसिल्वेनियाच्या बटलर शहरात निवडणुकीच्या रॅलीदरम्यान ते संबोधित करण्यासाठी पोहोचले होते. यावेळी तेथे गोळीबार झाला.
या हल्ल्यात माजी राष्ट्राध्यक्ष जखमी झाले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर रक्त लागलेले दिसले. त्यांना सुरक्षारक्षकांनी तातडीने स्टेजवरून उतरवले. या निवडणुकीच्या रॅलीत झालेल्या गोळीबाराचा व्हिडिओही समोर आला. यात ट्रम्प यांच्या कानाजवळ रक्त येताना दिसत आहे.
काय घडले नेमके?
डोनाल्ड ट्रम्प पेनसिल्वेनियाच्या बटलर शहरात निवडणुकीच्या रॅलीमध्ये संबोधित करण्यासाठी आले होते. तेथे रिपब्लिकन पक्षाकडून ते राष्ट्रपती पदासाठी दावेदार आहेत. स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ६ वाजता त्यांनी आपल्या भाषणास सुरूवात केली. तेव्हा गोळ्यांचा आवाज ऐकू आला. हे ऐकल्यानंतर ट्रम्प यांच्या सुरक्षेतील सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी तातडीने कारवाई करताना त्यांना घेरले.