Thursday, April 24, 2025
Homeसाप्ताहिककिलबिलसंवाद हरवतोय...

संवाद हरवतोय…

मनस्विनी – पूर्णिमा शिंदे

संवाद कला शब्दाचे सामर्थ्य व अर्थ जाणून घेणे म्हणजेच विचार, आचार, उच्चार यांचा समन्वय साधने होय. संवाद हा मनातून, भाषेतून, भावनेतून होत असतो आणि जेव्हा आपण इतरांसमोर तो मांडतो त्यावेळी त्या संवादाची शब्दांची प्रतिक्रिया आदान-प्रदान क्रिया होते आणि एकमेकांशी संभाषण होते. पूर्वी तुम्हाला ठाऊक असेल पत्र यायची. पत्र आले की, गल्ली गोळा व्हायची किंवा गाव गोळा व्हायचं. शहर असेल तर शहरी लोकसुद्धा गोळा व्हायची; कारण त्या पत्रामध्ये खूप दर्जेदार लिहिलेलं असायचं. विचारपूस, एकमेकांबद्दलची बातमी, त्या पत्रामध्ये आत्मीयता, जिव्हाळा, आपुलकी, प्रेम, स्नेह, नातेसंबंध घट्ट आणि मजबूत होते; पण आता माणसच माणसासाठी दुर्मीळ होत चालली आहेत. त्याचे कारण म्हणजे जागतिकीकरणात जसजशी सुधारणा होत गेली, तसतसे तंत्रयुग बदलत गेले. या युगात मात्र माणसाचं माणूसपण हरवत चालले आहे. माणसाने स्वत:ला मोबाइलच्या पिंजऱ्यात मात्र बंदिस्त करून घेतले आहे.

अगदी छोटे बाळ जरी रडले, तरी आई मोबाइलवरच, पाहुणे घरात आल्यानंतर आई मोबाइलवरच, ड्रायव्हिंग करताना सुद्धा आई मोबाइलवर! किती मोठा बदल पूर्वीपेक्षा आताच्या पिढीमध्ये झालेला आहे. मुलंसुद्धा पाचवीनंतर मोबाइल वापरू लागली आहेत. लहान मुले रडली तरी त्यांना मोबाइलवर गेम्स, व्हीडिओ लावून मुलांच्या हातात देतात. पालकांनी मुलांच्या हातात मोबाइल दिल्याने, मुलांमध्ये संवाद हरवत चालला आहे. हल्ली पाहिले तर मोबाइलच्या सवयीमुळे मुले मैदानी खेळ विसरली आहेत. अनेक मुलांना लहानपणापासूनच डोळ्यांचे विकार, मेंदूचे विकार, मानसिक ताण वाढत जात आहेत.

एका व्हीडिओमध्ये होतं की, आई भाजी कापता कापता मुलाला फ्रीजमध्ये ठेवून देते. जेव्हा मुलाचा शोध सुरू होतो, तेव्हा तिने काय केले, याचे तिला भान नसते आणि मग पश्चाताप करून वेळ निघून जाते. काय उपयोग आहे? वेळीच आपण सावधानता बाळगली, तर या मोबाइल युगामध्ये निश्चित आपण चांगल्या पद्धतीने माणूसपण टिकवून ठेवू शकतो! नाही तर पर्यायाने दुष्परिणाम भोगावे लागतात. त्याच्यानंतर आपण बऱ्याचदा समोर ओळखीचा माणूस भेटून सुद्धा कानाला जर मोबाइल असेल, तर आपण त्याच्याशी चक्क हसत नाही, बोलत नाही. अशा वागण्यातून छोट्या-छोट्या चुकासुद्धा होतात. या मोबाइलमुळे स्मृतीभ्रंश त्याचप्रमाणे बहिरेपणा वाढू लागलाय. माणुसकी कमी होत चालली आहे. लोक हृदयापेक्षा डोक्याने जास्त विचार करू लागलेत. त्यामुळे भावनेचा ओलावा संपलाय. कितीही मोठे काम असू द्या तो संदेश, ते संभाषण मोबाइलवरून…पण तुम्ही समक्ष जाऊन संवाद साधला, एकमेकांना समजून सांगितलं, तर ते समुपदेशन होऊ शकतं; पण सगळेच काम मोबाइलवर होणार आहेत का? कोरोनाच्या काळात सर्व गोष्टी ऑनलाइन असल्याने, बऱ्याच लोकांना मोबाइलची सवय लागली. त्यामुळे मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं.

संवाद वेळच्या वेळी न साधल्याने, नातेसंबंध बिघडू लागले आहेत. गैरसमज दूर करण्यासाठी माणसाने माणसाशी संवाद साधला पाहिजे. तो संवाद हरवला आहे आणि आजच्या युगामध्ये माणुसकीचा ओलावा गुगलमध्ये सर्च करून सुद्धा कुठेही सापडणार नाही. तो घरा-दारामध्येच असून चार भिंतीच्या आत आहे. तो टिकवला पाहिजे. आजकाल मात्र तसे राहिले नाही म्हणून पूर्वी बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले! संत-महात्म्य, संत-संस्कृती आपणाला हेच तर सांगून जाते की, खरे बोला! मोबाइलवर माणूस खोटे बोलू लागला. त्यामुळे माणसाचे विचार, आचार आणि उच्चारसुद्धा बिघडले. पर्यायाने माणूस सामाजिक भान हरवून बसला आहे. त्याचा स्वतःवरती ताबा राहिला नाही. बरीचशी माणसं मोबाइलवर मोठमोठ्याने बोलतात, किंचाळतात, भांडतात ही मनोविकृती म्हणावी लागेल. कारण मोबाइल हा फक्त महत्त्वाच्या कामासाठी वापरा. तो पावलोपावली, प्रत्येक क्षणाला तुम्हाला मोबाइलचा वापर असा हवाच कशाला? एखाद्या दिवशी जर मोबाइल बिघडला किंवा त्याचा चार्जर हरवला तर प्रत्येकाचे हाल तुम्ही फक्त डोक्यात आणा. हसलात ना नक्कीच. वेडे होतात लोक. इतकं सुंदर जीवन आहे, त्या जीवनामध्ये मनःशांतीसाठी विपश्यनेला जा. खूप आनंद वाटेल, तेथे मात्र दहा दिवस तुमच्या हातचा मोबाइल बंद. खूप सुंदर अनुभव नक्की अनुभवा!

अगदी घराघरातून व पती-पत्नी असेल, सासू-सुन असेल किंवा आई-मुलगी असेल हे चित्र. मिनिटा मिनिटाला त्या मोबाइलमध्ये मान घालून बसल्यामुळे, घरातली मुलगी सुद्धा आईला मोबाइलवर मेसेज करून विचारते, “आई भाजी कोणती केलीये?” आई, “वांग्याची.” मुलगी मोबाइल काढते आणि ऑनलाइन पार्सल मागवते. म्हणजे या युगात चाललंय काय? आपण आहे त्या परिस्थितीपेक्षा पंगू होत चालले आहोत. विचारांनी दुबळे पण आहेत. शक्ती आणि युक्तीने सुद्धा. सर्व बाबतीत सर्व श्रीमंत असतात असं नाही. काही ठिकाणी चक्क मुलांना दहावीनंतर मोबाइल मिळत नाही अभ्यासासाठी. आई-वडिलांचा फोन असतो. कॉलेजला जाताना देतात. पालक आणि जर नाही परिस्थिती तर मुलं चक्क आत्महत्या करू लागलीत. केवळ आणि केवळ लोभापाई, हव्यासापाई आपण आपला जीव गमवावा का? हा विचार मंथनाचा प्रश्न आहे. एखादी गोष्ट एखाद्या माणसाची नाही आवडली, तर पूर्वी दिवसेंदिवस माणसं गप्प राहून मौन पाळून उत्तर देत होती. आता मात्र एकमेकांचे म्हणणे पटले नाही म्हणूनसुद्धा माणसं माणसांना ब्लॉक करतात आणि कायमचं माणसाशी असलेलं नातं संपवून टाकतात. केवढा मोठा हा मूर्खपणा. रागारागात समोरच्याला आपलं मत नसेल पटत, तर जाऊन भेटा. बोला. मुद्दा पटवा. आपलं मत मांडा पण नाही. तसे कोठेही आढळून येत नाही. पश्चाताप, अरेरावी, गर्व, घमेंड, मत्सर यांमुळे नात्याची दोर तुटते. माझेच खरे म्हणण्यापेक्षा खरे ते माझे म्हणा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -