एकाच कुटुंबातील तीन जण जखमी, एकाचा मृत्यू
अमरावती : सातत्याने देशभरात अपघाताच्या (Accident News) घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अमरावती शहरातूनही एक धक्कादायक (Amravati Accident) माहिती समोर आली आहे. एका भरधाव बसने चौघांना चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघेजण गंभीर जखमी झाले असून चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. सध्या जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान या घटनेमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर पसरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज साडे अकराच्या सुमारास अमरावतीच्या सायन्स कोर मैदानासमोर सिटी बसने चौघांना चिरडल्याची घटना घडली. या अपघातामध्ये ९ वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये तिन्ही महिलांचा समावेश आहे. या अपघातानंतर संतप्त झालेल्या जमावाने बसची तोडफोड केली.
अपघाताची माहिती मिळताच अमरावती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. या घटनेनंतर बस ड्रायव्हर घटनास्थळावरून फरार झाला. आरोपीवर सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून सध्या घटनास्थळावर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
जखमींची माहिती
या अपघातामध्ये प्रीतम गोविंद निर्मळे (९) या मुलाचा जागीच मृत्यू झाला. प्रीतम बसच्या पुढच्या चाकाखाली आला. तर नर्मदा निर्मळे (६० वर्षे), वैष्णवी संजय निर्मळे आणि नेहा संतोष निर्मळे हे तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे. या अपघातामुळे निर्मळे कुटुंबावर दु:ख पसरले आहे.