Sunday, April 20, 2025
Homeसाप्ताहिककिलबिलथोडासा उरलेला चिवडा

थोडासा उरलेला चिवडा

प्रतिभारंग – प्रा. प्रतिभा सराफ

घरात बाई जेव्हा चिवडा बनवते, तेव्हा तिला मनापासून वाटते की, घरातल्या सगळ्यांनी त्याचा आस्वाद घ्यावा. ती आग्रह करून घरातल्यांना, पाहुण्यांना, शेजाऱ्या-पाजाऱ्यांना, कधी जवळच्या नातेवाइकांना तो चिवडा देते. हे देण्या-घेण्यात आणि खाऊ घालण्यातच बाईला खूप आनंद मिळतो. मग खालचा थोडासा चिवडा शिल्लक राहतो. या चिवड्याकडे सहसा घरातल्यांचे लक्ष नसते; कारण या चिवड्यातले पोहे डबा हलवून हलवून तुटून छोटे झालेले असतात. त्यामुळे तो चिवडा आकर्षक दिसत नाही. या चिवड्यात नेमकेपणाने काय असते? तुटून छोटे झालेले किंवा चुरा झालेले पोहे, अतिशय छोटे आणि पोह्यातून सहज खाली गेलेले तीळ, धणे, मोहरी, कढीपत्त्याचा चुरा, मिरचीचे बारीक तुकडे याशिवाय थोडीशी धणे-जिरे पावडर, काळे मीठ, आमचूर पावडर, पिठीसाखर इत्यादी. डब्याच्या तळाशी राहिलेला हा चिवडा सर्वात चवदार असतो; कारण तो मुरलेला असतो. यात सहजपणे खाली गेलेले तेलही असते. त्यामुळे तो थोडासा तेलकटही असतो.

बायका या चिवड्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो टाकतात. कच्ची कैरी उपलब्ध असेल, तर तीही किसून टाकतात, जेणेकरून तिखट-मीठ प्रमाणशीर होऊन जाते आणि तो चिवडा त्या आनंदाने संपवतात. याची चव ज्यांनी चाखली आहे, त्यांना ती माहीत आहे आणि ज्यांनी चाखली नसेल, त्यांनी ती जरूर चाखून पाहावी.

काही भाज्या उदाहरणार्थ – छोले, बटाटा-वाटाणा रस्सा, फणसाची भाजी, कढी गोळे हे पदार्थ दुसऱ्या दिवशी खाण्याची गंमतच वेगळी असते. याच्यात मसाले व्यवस्थित मुरलेले असतात. ते पदार्थांना विशिष्ट आणि चांगली चव देतात. ‘ईद’च्या दिवशी बनलेली बिर्याणी ही दुसऱ्या दिवशी ‘बासी बिर्याणी’ म्हणून खाण्याची वेगळीच गंमत आहे, असे माझ्या नजीर नावाच्या मित्राने मला सांगितले आहे. बासी बिर्याणीची सुद्धा त्यांच्या घरी पार्टी असते. ज्या ज्ञातीतील माणसांना आदल्या दिवशी घरचा सण असल्यामुळे येता आलेले नसते, ते दुसऱ्या दिवशी हमखास एकत्र भेटतात आणि मुख्य म्हणजे बासी बिर्याणी खाण्याचा आनंद घेतात.

आता थोडेसे खाण्या-पिण्याकडून आपण बाजूला होऊया आणि माणसांचा विचार करूया. आपल्याकडे ज्यांनी आयुष्य भरभरून भोगलेले आहे, ज्यांच्यात आयुष्य पूर्णपणे मुरलेले आहे, त्या माणसांना बोलण्याची संधी दिली जात नाही. त्यांचे विचार जाणून घेतले जात नाहीत. घरात एखादे फर्निचर घ्यायचे असो किंवा एखादी पार्टी आयोजित करायची असो, त्या घरातले तरुण आपल्याच पद्धतीने निर्णय घेतात. पूर्वी बायका कमीत कमी नवीन लग्न होऊन नव्या घरात आल्या की सासूकडून, आजेसासूकडून, घरातल्या वयस्करांकडून अनेक व्यवहार शिकायच्या. काही खाद्यपदार्थ बनवताना टिप्स घ्यायच्या. आता घरातलीच माणसे कमी झाली आहेत. यामुळे असेल कदाचित किंवा घरातल्यांना महत्त्व देणे निरर्थक वाटत असेल. यामुळे कदाचित याशिवाय सहज उपलब्ध असलेल्या सोशल मीडियावर या टिप्स उपलब्ध आहेत म्हणूनही कदाचित घरातल्या वयस्करांशी या विषयीचे संवाद होत नसावेत. त्यांनी स्वतःहून काही सांगायचा प्रयत्न केला, तरी ती ऐकण्याची मानसिकताही अलीकडे राहिलेली नाहीये. आरोग्यविषयक असो वा आर्थिक व्यवहार असो किंवा आणखी काही सर्व प्रकारच्या टिप्स आपल्याला आजच्या काळात सोशल मीडियावरून सहज उपलब्ध होतात, त्यामुळे तिथूनच घेण्याची सगळ्यांनाच सवय लागली आहे; पण कधी तरी निवांत वेळ असेल, तेव्हा कोणत्याही वयातील माणसांनी, त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ असलेल्या माणसांशी संवाद साधून पाहावा. तुमच्या नक्की लक्षात येईल की, त्यांचे अनुभवाचे जे बोल असतात, ते निश्चितपणे आपल्याला आयुष्यात उपयोगी पडतात. ‘पुढच्याच ठेच, मागचा शहाणा!’ ही म्हण उगाचच लिहिली गेली नाही. आपल्या आधीच्या पिढीने केलेल्या चुका आपण लक्षात घेतल्या, तर वेळ आणि पैसा याचा अपव्यय होणार नाही. मनस्वास्थ्य ढळणार नाही.

प्रत्येक माणसाने आपल्या आयुष्यात नवीन प्रयोग केले पाहिजेत, नवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत, आपल्या पूर्वजांनी जे काही करून ठेवले आहे, त्याच्यामध्ये मौलिक भर घातली पाहिजे, हे तेव्हाच होऊ शकेल, जेव्हा त्यांनी जे काही केले आहे, हे आपल्याला आधीच माहीत होईल!

डब्याच्या तळाशी राहिलेला, उरलेला चिवडा अधिक चविष्ट बनतो. तशी आयुष्यात थोडाच काळ उरलेली माणसे कोणत्या तरी बाबतीत नक्कीच आपल्यापेक्षा थोडी अधिक ज्ञानी बनलेली आढळतात. या माणसांकडून संयम आणि चिकाटी हे आजच्या काळात असणारे दुर्मीळ गुण आपल्याला अंगीकारता येतील.

मग एक छोटीशी गोष्ट करून पाहूया की, कमीत कमी आठवड्यातून एकदा आपल्यापेक्षा वयाने ज्येष्ठ असणाऱ्या घरातल्या किंवा बाहेरच्या कोणत्याही माणसाशी मग तो शिकलेला असो की अशिक्षित, श्रीमंत असो की गरीब, शहरातला असो की गावातला… त्याच्यासोबत बसून काही क्षण घालवूया. एक नवीन अनुभव पाठीशी बांधूया आणि आपल्या आयुष्याच्या प्रवासाला वेगळे वळण आणि वेग देऊया!

pratibha.saraph@ gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -