Sunday, April 20, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखशहरात टोमॅटो महाग; शेतकऱ्यांना किती लाभ?

शहरात टोमॅटो महाग; शेतकऱ्यांना किती लाभ?

सध्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केटमधील भाजी मार्केटमध्ये तसेच मुंबई शहर, उपनगरे तसेच लगतच्या ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल-उरण, वसई-विरार परिसरात टोमॅटोच्या दरवाढीचीच चर्चा सुरू झालेली आहे. एकीकडे टोमॅटोच्या दरवाढीने ग्राहकांच्या विशेषत: महिला वर्गाच्या कपाळावर चिंतेच्या आठ्या उमटल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळणार, टोमॅटो उत्पादक शेतकरी ‘गब्बर’ होणार, अशा चावडी गप्पांना उधाण आले आहे. दुसरीकडे जिओ कंपनीने तसेच एअरटेल व अन्य कंपन्यांनी आपल्या ग्राहक सेवेतील मोबाइल सेवा महाग केलेली असताना त्याविषयी फारसा गाजावाजा झालेला नाही. मोबाइल कंपन्यांच्या दरवाढीकडे कानाडोळा करून अंबानी पुत्राच्या विवाहाच्या, तेथील नृत्याच्या, शाही बडदास्तीच्याच चर्चा अधिक रंगल्या आहेत.

कांदा दरवाढ असो अथवा नुकतीच झालेली टोमॅटो दरवाढ असो, थोडे दर वाढले की, शहरवासीयांच्या कपाळावर आठ्या पडून बळीराजाला मिळणाऱ्या उत्पन्नाचीच अधिक चर्चा सर्वत्र सुरू होते. एका पिकामध्ये कमविणाऱ्या बळीराजाला पुढच्या पाच-सहा पिकांमध्ये गमवावे लागते. वेळ पडल्यास घरातील महिलांचे दागिने अथवा शेतीचा सातबारा बँकेत ठेऊन कर्ज काढावे लागत आहे. शेती हा बदलत्या लहरी हवामानामुळे बेभरवशाचा प्रकार झालेला आहे. काही हजार रुपये तरी आपण घरात अथवा बँकेत सुरक्षित ठेवतो, पण बळीराजाला मात्र आपल्याला ज्यातून हजारो, लाखो रुपये मिळण्याची शक्यता आहे, आशा आहे, अशा कृषीमालाला देवाच्या हवाल्यावर शेतात सोडावे लागत आहे. मुळात दरवाढ झाल्यावर त्या पिकातून विक्री झालेल्या पैशातील किती पैसे बळीराजाच्या खिशामध्ये जातात, हे जाणून घेण्याचीही तसदी कोणी घेत नाही. कर्जबाजारी बळीराजाने आत्महत्या केल्यावर अथवा बळीराजाला सरकारकडून कर्जमाफी अथवा कर्जावरील व्याजमाफी झाल्यास बळीराजाच्या नावाने बोटे मोडणारे शहरवासीयांनी आजवर केवळ एकांगी विचार करत बळीराजाबाबत आपल्या मनामध्ये चुकीचा ग्रह करून घेतलेला आहे.

मुळात बाजार समितीमधील भाजी मार्केटमध्ये व्यापारी किरकोळ विक्रेत्यांना ज्या दरामध्ये कृषीमालाची विक्री करत असतो, त्याहून १० ते १५ टक्के अधिक दराने किरकोळ विक्रेता स्थानिक बाजारात थेट ग्राहकांना भाज्यांची, फळांची विक्री करत असतो. किरकोळ बाजारातील फळ भाज्यांचे, पालेभाज्यांचे दर पाहूनच शहरवासी शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची आकडेमोड करत असतात; परंतु ज्यावेळी कृषीमालाच्या दरामध्ये घसरण झालेली असते, त्या पिकासाठी केलेला गुंतवणुकीच्या अर्धा खर्चही निघत नसतो. मजुरी अंगावर आलेली असते. फळभाज्या, पालेभाज्या काढण्याचाही खर्च निघत नसल्याने शेताच्या बांधावर या भाज्या ज्यावेळी फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते, त्यावेळी त्या शेतकऱ्याला सहानुभूती दाखविण्यात तसेच त्या शेतकऱ्याच्या परिस्थितीबाबत चर्चा करण्यात दोन सहानुभूतीचे शब्द बोलण्याबाबत शहरातील लोकांना सवड मिळत नसते.

शॉपिंगसाठी मॉलमध्ये गेल्यावर वस्तूंची खरेदी करताना अथवा मॉलमध्ये सिनेमा पाहण्यासाठी महागड्या तिकिटांची खरेदी करताना शहरातील लोक घासाघीस करत नाही. त्यावर जी छापील किंमत असते, ती देऊन महागड्या वस्तू खरेदी करताना खिशाला झळ बसल्यावरही शहरवासीयांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान झळकत असते. मात्र ऊन, वारा, पावसाचा, थंडीचा, वेळीअवेळी जाणाऱ्या विजेचा त्रास सहन करत बळीराजा शेतीमध्ये पीक काढतो, त्या पिकाला दोन पैसे जास्त देण्याची या लोकांची तयारी नसते. कृषीमालाच्या पालेभाज्या, फळभाज्या विकत घेण्यासाठी घासाघीस करताना पाचशे रुपये पॉपकॉर्नसाठी खर्च करणाऱ्या लोकांना धन्यता वाटत असते. कृषीमालाच्या थेट खरेदीविक्रीसाठी सरकारने थेट परवानगी दिली असली तरी ही संकल्पना केवळ कागदोपत्रीच शोभून दिसत आहे. बळीराजाला शेतीमध्ये दिवसभर कष्ट करून त्याच्या शेतातील कृषीमाल विक्रीसाठी थेट शहरामध्ये अथवा शहराच्या उपनगरामध्ये घेऊन येणे शक्य होत नाही आणि यापुढेही ते शक्य होणार नाही.

शेतातील माल काढल्यावर तो हुंडेकरीवाल्याच्या माध्यमातून ट्रान्सपोर्टवाल्याच्या माध्यमातून नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी पाठविला जातो. दुसरा पर्याय म्हणजे भाड्याचा टेम्पो करून तो स्थानिक पातळीवरील तालुकास्तरीय बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणला जातो. मात्र तालुकास्तरीय बाजार समितीमध्ये कृषी मालाला फारसा दर भेटत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे असल्याने ते आपला कृषीमाल नवी मुंबईतील बाजार समितीमध्ये विक्रीसाठी पाठविण्याला प्राधान्य देत असतात. तिसरा पर्याय म्हणजे परप्रांतीय व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषी मालाची खरेदी रोखीच्या स्वरूपात खरेदी करत असतात. मात्र रोखीच्या स्वरूपात कृषी मालाचे पैसे कमी मिळत असले तरी थेट पैसा हातात येत असल्याने शेतकरी या बांधावर आलेल्या व्यापाऱ्यांना आपल्या मालाची विक्री करत असतात.

सुरुवातीला रोखीने माल विकत घेणारे व्यापारी काही वेळा उधारीत माल उचलतात आणि पुढच्या वेळी एकत्र पैसे देतो असल्याचे सांगतो. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कृषीमाल पाठविणाऱ्या शेतकऱ्याच्या मालाच्या विक्रीतून दर किलोमागे ट्रान्सपोर्टवाल्याचे पैसे कापले जातात. कृषीमालातील पालेभाज्यांचे, फळभाज्यांचे दर पाहिल्यावर शेतकऱ्यांच्या नावाने बोटे मोडणाऱ्यांनी तो कृषीमाल पिकविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या खर्चाची माहिती करून घेणे आवश्यक आहे. शेतकऱ्याला बाराही महिने शेतात मजुरी केल्यावर हाती काही शिल्लक राहत नाही.

टॉमटोच्या दराची चर्चा करणाऱ्यांनी सध्या पावसाच्या दिवसामध्ये वाऱ्याच्या उद्रेकामध्ये टोमॅटोची बाग वाचविण्यासाठी काय त्रास सहन करावा लागतो, याची कल्पनाही न केलेली बरी. थोड्याशा वादळवाऱ्यात टोमॅटोची बाग कोसळते. बांबू तूटतात, तारा तुटतात, पुन्हा नव्याने बागेची बांधणी करावी लागते. बांबू, तारा, सुतळीच्या खर्चाबरोबर बागबांधणीसाठी पुन्हा नव्याने मजुरीचा खर्च करावा लागतो. मॉलमध्ये मुक्त हस्ते खर्चाची उधळण करणाऱ्यांनी बळीराजाच्या मालाला थोडीशी किंमत मिळाली तर नाराजीचा सूर न आळविता दोन पैसे तरी बळीराजाच्या खिशात पडतील, या विषयी समाधान व्यक्त करणे आज काळाची गरज आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -