टर्निंग पॉइंट – युवराज अवसरमल
नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमांतून अभिनयाची मुशाफिरी करणारा चॉकलेट हिरो अशी ओळख असणारा अभिनेता म्हणजे संग्राम समेळ होय. सन वाहिनीवर ‘मुलगी पसंत आहे’ या मालिकेत तो सध्या दिसून येत आहे.
ज्येष्ठ नाटककार, लेखक व दिग्दर्शक अशोक समेळ व गायिका अभिनेत्री संजीवनी समेळ यांच्या अभिनयाचा वारसा चालविण्याचे कार्य संग्रामकडून होत आहे. ठाण्यातील श्रीरंग विद्यालयातून त्याचे शालेय शिक्षण झाले. पुढे मुलुंडच्या वझे केळकर कॉलेजमधून त्याने मास मीडिया ॲडव्हरटायझिंगमध्ये पदवी घेतली, तर वेलिंगकर इन्स्टिट्यूटमधून त्याने मार्केटिंगमधून पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा प्राप्त केला. डिजिटल ॲनिमेशनमधून त्याने डिप्लोमादेखील पूर्ण केला.
अभिनयाची आवड त्याला शांत बसू देईना. ‘रायगडला जेव्हा जाग येते’, ‘केशव मनोहर लेले’, ‘मन उधाण वाऱ्याचे’ ही नाटके त्याने केली. स्वामी विवेकानंदावर आधारित ‘संन्यस्थ्य ज्वालामुखी’ या नाटकात त्याने स्वामी विवेकानंदांची भूमिका केली. हे नाटक खूप गाजले. चाळीस तासांमध्ये सलग अकरा प्रयोग करून, या नाटकाने लिम्का बुकमध्ये नोंद केली. संग्रामने साकारलेला स्वामी विवेकानंद अक्षरशः डोळ्यासमोर उभा राहिला. रंगमंचावर सशक्त, संवेदनशील अभिनय करणारा अभिनेता पहायला मिळाला. हे नाटक त्यांच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरले. या नाटकाला उत्तुंग पुरस्कार, स्व. मामा पेंडसे पुरस्कार, झी गौरव पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्याने अश्रूंची झाली फुले, मी कुमारी अरूणा, वर खाली दोन पाय, तोच परत आलाय, एकच प्याला, कुसुम मनोहर लेले या नाटकांत कामे केली.
अल्बम ही त्याची सह्याद्री वाहिनीवरील पहिली मालिका होती. त्यानंतर त्याने तिसरा डोळा, हे बंध रेशमाचे, आनंदाश्रम, बुद्धिबळ, लढा, चार दिवस सासूचे, कादंबरी, अनोळखी दिशा, असावा सुंदर स्वप्नांचा बंगला, मेंदीच्या पानावर, दिल्या घरी तू सुखी रहा, बापमाणूस, तू अशी जवळी रहा, स्वप्नांच्या पलीकडले, पुढचं पाऊल, एक मोहोर अबोल, आंबट गोड, आनंदी हे जग सारे, हे मन बावरे, शुभ मंगल ऑनलाइन, ताराराणी, योग योगेश्वर जय शंकर या मालिकेत काम केले. राम राम महाराष्ट्र व जत्रा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
दासबाबू दिग्दर्शित ‘ब्रेव्हहार्ट’ या चित्रपटासाठी संग्रामने भरपूर मेहनत घेतली. अगोदर या चित्रपटाच्या शेवटच्या दृश्याचे चित्रीकरण करण्यात आले होते, त्यासाठी त्याने त्याचे वजन वाढवले व नंतर कमी केले. मृत्यूच्या प्रसंगाचे चित्रीकरण करताना, त्याने केलेला नैसर्गिक अभिनय वाखाणण्याजोगा होता. चित्रपटातील नायकाला माहूत असते की, शेवटी तो त्या आजाराने मरणार आहे, परंतु मिळालेल्या वेळेत आपली स्वप्न पूर्ती करण्यासाठी, त्याने केलेली पराकाष्ठा दिसून आली. या चित्रपटाला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. नाशिकचा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. मराठी फिल्मफेअर नवोदित अभिनेत्यासाठी त्याला नॉमिनेशन देखील मिळाले होते. त्यानंतर विकी वेलिंगकर, स्विटी सातारकर, साथ सोबत हे चित्रपट त्याने केले.
‘मुलगी पसंत आहे’ ही त्याची मालिका सध्या सुरू आहे. भूमिकेसाठी अतोनात मेहनत घेण्याची तयारी, निर्मात्याला न दुखावणे, शूटिंगला वेळेत येणे या साऱ्या गुणांमुळे तो अनेक निर्मात्यांचा आवडता झालेला आहे. त्यामुळे काही निर्माते त्याला आपल्या पुढील मालिकेमध्ये घेत आहेत. त्यांच्या पसंतीस संग्रामला प्रथम प्राधान्य देण्यात येत आहे. संग्रामची या क्षेत्रातील प्रगती अशीच होत राहो व त्याला त्याच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!