भालचंद्र कुबल – पाचवा वेद
दर आठवड्याला एखाद्या नाटकाविषयी स्वतःचे मत इतरांना वाचनीय वाटेल, अशा पद्धतीने लिहिणे म्हणजे एक प्रकारची कसरतच असते. तू पण चांगला, तू पण उत्तम, तू पण सरस अशा व्हाॅट्सॲप टेम्परामेंटमुळे सगळेच कसे तुझ्या गळा माझ्या गळा म्हणत, समीक्षण गुळमुळीत झालेय. पूर्वीच्या समीक्षाकारांना कसे समीक्षेच्या नावाखाली झोडपता यायचे; परंतु आता तसे झोडपून चालत नाही, याचे प्रमुख कारण म्हणजे समाज माध्यमांनी निर्माण केलेली सजगता. ही सजगता प्रत्येक वाचकात एवढी ठासून भरलीय की, एखादा कंटेंट पब्लिश व्हायची खोटी, व्हायरल करणारे आपणहून कामाला लागतात. मग प्रसिद्ध झालेल्या लिखाणात जर टीका असेल, तर व्हायरलतेला बंधन नसते. यावर वितुष्टता हा एकमेव परणाम साधला जातो. मी स्वतः नाटकं दिग्दर्शित केली आहेत, लिहिली आहेत किंवा काही नाटकांच्या निर्मितीत महत्त्वाचे योगदानही दिले आहे. त्यामुळे एखाद्या नाटकाला जन्म देतानाच्या प्रसूती वेदना मी अनुभवल्या आहेत.
त्या मागचे कष्ट मी भोगले आहेत म्हणूनच एखाद्या नाटकावर टीका करणे, हे मला मनापासून रुचत नाही. पुष्पा भावे मॅडमच्या बैठकीत समीक्षेवर झालेले संस्कार सकारात्मक असल्यामुळे ‘बाल की खाल’ काढत केलेले विवेचन अधिक प्रभावशाली ठरू शकते, यावर माझा आजही विश्वास आहेच म्हणूनच बाकी कशावर नसले, तरी वाचकांच्या अपेक्षांच्या पायऱ्यांवर चढायला मला आवडते.
गेल्या दीड-दोन वर्षांत मी एकाही नाटकाला झोडपलेले नाही, मात्र वैयक्तिक गुणदोष जरूर दाखवून दिले आहेत. कुठल्याही निर्मितीबाबत पदार्पणात निर्माता अत्यंत उत्साही असतो. त्याला नाटक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवून, त्याचे इन्व्हेस्टेड रिटर्न्स मिळवायचे असतात. यात नाटकाचा दर्जा, तांत्रिक बाबींचा अभ्यास आणि गल्ला जमवणारा नटसंच याची सूतराम कल्पना नसणारे या नाट्यव्यवसायात उतरतात आणि नाटक न तरल्याने मातीमोल होतात. हे या लेखात मांडायचे कारण म्हणजे नुकतेच एक ऐतिहासिक ‘शिवप्रताप’ हे नाटक बघावे लागले. हे नाटक बघण्यामागचे प्रमुख कारण होते, यात अभिनय करणारा महिला नटसंच. श्रुती परब यांनी लिहिलेले आणि दिग्दर्शित केलेले ४५ महिलांद्वारे सादर केलेला छत्रपती शिवरायांच्या जीवनपटाचे सादरीकरण आजच्या या निरीक्षणाचा प्रमुख विषय आहे.
शिवाजी महाराजांचा जीवनक्रम हा नाट्यमय असल्याने, त्यावर आजपर्यंत अनेक नाटकांची निर्मिती झाली. प्रत्येक मराठी माणसाच्या मनात असलेल्या अपार श्रद्धेने महाराजांविषयीच्या नाटकांना तारले. ‘शिवप्रताप’चा विषय देखील चरित्रात्मक असल्याने, प्रेक्षकांना अगदी सुरुवातीपासूनच्या सर्व घटना ज्ञात आहेत. प्रेक्षक मग त्यात नावीन्य शोधू लागतात. संपूर्ण नटसंच हा महिला वर्ग असल्याने, नावीन्य हे सादरीकरणात आहेच. पण मग ते पाहण्यात जी निराशा पदरी पडते, त्याबाबत लिहिणे गरजेचे वाटते. शिवप्रताप हा एक डाॅक्युड्रामा आहे. नाटकातील काही अंशी भाग हा ध्वनीमुद्रित तर काही भाग मंचीय सादरीकरणात पेश केला जातो. नॅशनल स्कूल आॅफ ड्रामावाल्यानी प्रेक्षकांतून एण्ट्री घेण्याच्या पद्धतीला आज ५० वर्षे उलटून गेली, तरी ती सुरूच आहे.
चौथी अदृष्य भिंत मोडून प्रेक्षकांचे प्रतिनिधित्व करणारे पात्र मंचावर प्रवेशकर्ते होण्याबाबतची ती नाट्यशास्त्रीय सैद्धांतिक संकल्पना होती. ८०-९०च्या दशकात प्रायोगिकतेच्या नावाखाली अशा वारेमाप ‘एन्ट्रया’ मराठी नाटकातून दिसल्या. पैकी दशावतारी खेळात संकासुर किंवा अतिअत्याचारी खलनायक किंवा वरात वा प्रेतयात्रा प्रेक्षकातून मंचावर येते. या फ्रेम ब्रेकिंगला खरेच काही अर्थ होता का? आणि जर प्रेक्षकांचे लक्ष अधोरेखित करण्यासाठीची ही जर युक्ती असेल, तर दिग्दर्शक मंचय सादरीकरणात (स्टेज मूव्हमेंट्स) कमी पडतो, हे सिद्ध होते. शिवप्रताप या नाटकात सुरुवातीच्या वासुदेवाच्या प्रवेशापासून बरेच प्रवेश प्रेक्षकांतून आहेत. जे निरर्थक व प्रभावशून्य वाटतात. आधी उल्लेखिल्याप्रमाणे ध्वनिमुद्रित निवेदन संपताच, परफाॅरमन्स सुरू होतो. इथे दोन्ही आवाजातील विषमता ही या नाटकासाठी घातक आहे आणि ते सातत्याने घडत राहाते व अर्थातच आॅडियन्स होल्ड या नाटकासाठी शेवटपर्यंत उरत नाही. हेच नाटक पूर्णतः ध्वनिमुद्रित करून, त्यात पुरुषी आवाज वापरून सादर केल्यास प्रभावी ठरेल, याबाबत दुमत नाही. शिवाय मुद्दा अभिनयाचा आहेच.
आंगिक, वाचिक, आहार्य तथा सात्विक अभिनयाचा संबंध असल्यास भूमिका व भूमिकेचे पात्र वठवतात येते. हे रंगभूमीबाबत कितीही नवखे असलात. तरी प्रत्येक नटास अंगीकारावेच लागते. त्यात तुम्ही जर व्यावसायिक रंगभूमीवर स्वतःचा नवखेपणा मान्य करायला जाल, तर ती चूक नसून घोडचूक ठरते. प्रेक्षक ज्यावेळेस व्यावसायिक नाटकास व्यावसायिक दराचे तिकीट काढून येतो, त्यावेळेस ‘आम्ही नवखे आहोत, आम्हाला सांभाळून घ्या’ असे म्हणणेच मुळात शुद्ध बेजबाबदारपणा…! हौशी नाटकवाल्यांना आपण व्यावसायिक आहोत, हे दाखवण्याची अकाली खुमखुमी येते आणि मग प्रेक्षकांनी नाकारल्यावर त्यांच्यावरच खापर फोडायचा ट्रेंड गेली कित्येक वर्षांचा आहे. अशा नाटकांना प्रेक्षक या नात्याने प्रोत्साहन देणे सुद्धा अपराध वाटू लागतो. त्यातही हल्ली तांत्रिक बाजू चकाचक करून, परफाॅरमन्समधील दोष लपवता येतात, हा सार्वत्रिक पसरलेला गैरसमज.
अशा एक ना दोन, असंख्य त्रुटीतून निर्मिलेली नाट्याकृती पाहून तिकीटधारी मंडळीना पश्चाताप करायला लावण्यापेक्षा नाटक परिपक्व करणे गरजेचे नाही का? एक मात्र धाडस या नाटकाबाबत श्रुती परब आणि निर्माते प्रवीण विनया विजय राणे यांचे मानावे लागेल, ते म्हणजे अत्यंत प्रतिकूल नाट्यव्यवसायाची अवस्था असताना, अशा स्वरुपाचा परीयड प्ले व्यवसायासाठी निवड करून प्रयोगात सातत्य राखणे. त्यांच्या या जिद्दीला सलाम. आमचा मित्र संजय मोने म्हणतो, ते अगदी खरंय, कैरी ही आंब्यापेक्षा स्वस्तच असते. कच्चा आंबा जसा स्वस्त तसे कच्चे नाटक देखील स्वस्तच असायला हवे. शिवप्रताप या नाटकास उद्देश्यून लिहिण्यासारखे बरेच आहे, परंतु ते सकारात्मक लिहिण्याजोगे नाही म्हणूनच या नोटवर थांबतो…!