जुलै महिन्याच्या १२ तारखेला १९९८ या वर्षी वास्तवतेचा दाहक अनुभव देणारी एक नाट्यकृती मराठी रंगभूमीवर आली. या नाटकाने मराठी रंगभूमीवर चाकोरीबाहेरचा विषय आणला. हे नाटक म्हणजे ‘गोलपीठा!’ श्री शिवाजी मंदिरात या नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाला हाऊसफूल्ल गर्दी झाली होती. सुरेश चिखले यांचे लेखन आणि मिलिंद पेडणेकर यांचे दिग्दर्शन असलेल्या याच नाटकाला यंदाच्या १२ जुलैला २६ वर्षे झाली आहेत. हे नाटक रंगभूमीवर येण्यापूर्वीचा काळ मात्र कसोटीचा होता आणि त्याच्या आठवणी इतक्या वर्षांनंतरही या नाटकमंडळींच्या मनात ताज्या आहेत. वास्तविक ‘गोलपीठा’ हे नाटक १९९५-९६ मध्ये राज्य नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत नंबरात आले होते. हे नाटक वेश्यांच्या जीवनावर आधारित असल्याने, अंतिम फेरीत निवड करतानाच, याबाबत वाद निर्माण झाला होता. अशी सगळी पार्श्वभूमी असतानाही, हे नाटक पुढे निश्चयाने करण्याचा पण संबंधित नाटकमंडळींनी केला आणि ‘गोलपीठा’ व्यावसायिक रंगभूमीवर आले.
‘गोलपीठा’ची पडद्यामागची कहाणी सांगताना, या नाटकाचे दिग्दर्शक मिलिंद पेडणेकर आजही त्या दिवसांमध्ये हरवून जातात. ते सांगतात, “राज्य नाट्य स्पर्धेनंतर या नाटकासाठी व्यावसायिक कलाकारांचा शोध सुरू झाला. या नाटकाबद्दल बाहेर वेगळीच चर्चा सुरू झाली होती. काही अडचण येऊ नये म्हणून आमच्या निर्मात्यांनी, नाट्यक्षेत्रातले काही निर्माते, कलाकार, तसेच पत्रकारांसाठी या नाटकाचा एक खास प्रयोग मुंबई मराठी साहित्य संघात आयोजित केला. हे नाटक पाहिल्यावर अनेकांनी आमचे कौतुक केले. भक्ती बर्वे-इनामदार यांनीही नाटक पाहून आमचा हुरूप वाढवला. शेवटी १२ जुलै १९९८ रोजी आमच्या नाटकाचा शुभारंभ हाऊसफूल्ल गर्दीत रंगला. त्या वर्षी आमच्या नाटकाने व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत अकरा पारितोषिके मिळवली आणि हा विक्रम आजही ‘गोलपीठा’च्या नावावर आहे.”
या नाटकाला वास्तवाची डूब यावी, यासाठी मिलिंद पेडणेकर यांनी मुंबईतल्या कामाठीपुराच्या वेश्या वस्तीत पायधूळ झाडली. कामाठीपुराच्या अंतरंगात त्यांना आलेला अनुभव अंगावर शहारे आणणारा आहे. त्याबद्दल बोलताना ते म्हणतात, “त्या वेश्यावस्तीत ‘दुर्गा’ ही मुलगी मला भेटली. तिची कहाणी ऐकल्यावर, तर मी थक्क झालो. लहानपणी एकदा ही मुलगी तिच्या आई-वडिलांसोबत त्यांच्या शेतात गेली असताना, एका माणसाने दाखवलेल्या चॉकलेटच्या आमिषाला ती बळी पडली आणि त्याने तिला एस.टी.मध्ये बसवून शेतातून पळवून नेले. तिला जेव्हा हे कळले, तोपर्यंत तिची रवानगी थेट वेश्यावस्तीत झाली होती. हे सर्व तिच्या तोंडून ऐकताना माझ्या अंगावर काटा उभा राहिला होता.”
या नाटकाकडे मागे वळून पाहताना काय वाटते; असे त्यांना विचारताच नॉस्टॅल्जिक होते ते म्हणतात, “इतका कठीण विषय मी तेव्हा कसा काय हाताळला आणि असे चांगले नाटक माझ्या हातून कसे झाले, असा विचार मनात येतो.
सचिवालय जिमखान्याच्या कलाकारांनी हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेत गाजवले आणि मग ते आम्ही व्यावसायिक रंगभूमीवर आणले. ज्यांनी हे नाटक उभे केले, त्या कलाकारांची मला आता खूप आठवण येते. सुधीर भट, विलास जाधव या निर्मात्यांनी राज्य नाट्यस्पर्धेत हे नाटक पाहून, ते व्यावसायिक करण्याचे सुचवले; त्यांचीही आता प्रकर्षाने आठवण येते. या नाटकामुळे मला नाव मिळाले. पुन्हा एकदा असे एखादे नाटक मला करायला मिळावे आणि असा वेगळा विषय रंगभूमीवर सादर व्हावा.”
या नाटकात महत्त्वाची भूमिका रंगवणारी अभिनेत्री सीमा घोगळे नाटकाच्या आठवणींत हरवून जाताना सांगते, “राज्य नाट्य स्पर्धेत मी हे नाटक केले होते; पण हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर करण्याचे ठरले, तेव्हाही माझी भूमिका मीच करणार, यावर आमचे दिग्दर्शक मिलिंद पेडणेकर ठाम होते आणि ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. पहिल्याच प्रयोगानंतर माझे खूप कौतुक झाले. विमल म्हात्रे, अरुण अत्रे, अशोक परब, राजेश कदम, राजेश मालवणकर, सुनील जाधव, प्रमोद सुर्वे, रवी बनकर, संदेश जाधव या सिनिअर कलाकारांनी मला सांभाळून घेतले. आज २६ वर्षांनी मागे वळून बघताना, असे वाटते की तेव्हा मी लहान होते, समज नव्हती, काही तरी करून दाखवायचे होते, अल्लडपणा होता म्हणून ते जमले. तेव्हा मी अवघी १७ वर्षांची होते. काही काही संदर्भ कळण्याचे ते वय नव्हते. आता इतकी वर्षे काम करून थोडा अनुभव, शहाणपणा वाढला आहे. निदान काय करावे आणि काय करू नये, हे नक्की कळतेय. आज जर मला कोणी ‘गोलपीठा’मधली ‘मीना’ करायला सांगितली; तर ती तशी नाही होणार. पण मला ती तशीच करायला आवडेल; कारण लोकांच्या ती तशीच लक्षात आहे. आज मी जी काही आहे, त्यात ‘गोलपीठा’ नाटकाचा खूप मोठा वाटा आहे.”
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…