फिरता फिरता – मेघना साने
मराठी माणसांची वस्ती ही जगातील अनेक देशांत पसरली आहे. पूर्वी भारतातील लोकांना शिक्षणासाठी इंग्लंड व अमेरिकेचे आकर्षण होते; पण आता जर्मनीत उच्चशिक्षण घेण्याकडे कल वाढला आहे. याचे कारण जर्मनीत उत्तम उत्तम विश्वविद्यालये तर आहेतच; पण तिथे शिकण्यासाठी विद्यार्थ्याला अत्यल्प फी भरावी लागते. तसेच उच्च दर्जाचे शिक्षण मिळाल्यामुळे, नोकरीही अपेक्षेप्रमाणे मिळते. जर्मनीचे हवामान इंग्लंडसारखेच असल्यामुळे, भारतीयांना सुसह्य होते. त्यामुळे भारताच्या कानाकोपऱ्यातून कानडी, बंगाली, पंजाबी, तामिळ विद्यार्थी जसे जर्मनीत आले आहेत, तसेच
मराठी विद्यार्थीही मोठ्या प्रमाणात जात आहेत.
मराठी माणूस कोणत्याही देशात गेला आणि तेथील देशातील वातावरणाशी मिळते जुळते घेऊन राहायला लागला, तरी आपली भाषा आणि संस्कृती टिकवून धरणे त्याला जरुरीचे वाटते. जर्मनीत स्थायिक झालेली मराठी माणसे देखील एकमेकांच्या भेटीगाठी घेऊन, सण- उत्सव एकत्र साजरे करू लागली. यातूनच २०१४ मध्ये जर्मनीत ‘मराठी मित्र मंडळ’ नावाचे पहिले मराठी मंडळ स्थापन झाले. याचे अध्यक्ष झाले-रवी जठार. पुढे पाच वर्षे आपल्या कारकिर्दीत अनेक मराठी सण-उत्सवांच्या निमित्ताने त्यांनी कार्यक्रम आयोजित केले. संक्रांत (हळदी-कुंकू), महाराष्ट्र दिन, गणेशोत्सव, दिवाळी अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना मराठी जनांना खूप आनंद होत असतो. २०२०मध्ये अध्यक्ष झालेले प्रसाद भालेराव यांनाही हीच परंपरा सुरू ठेवायची होती. परंतु २०२० मध्ये आलेल्या कोरोना संकटामुळे हे शक्य झाले नाही. दिवाळी पहाट कार्यक्रम ऑनलाइन करावा लागला. रवी जठार यांनी सांगितले, “आमच्या पहिल्या मंडळाच्या स्थापनेनंतर स्फूर्ती घेऊन, जर्मनीतील इतर प्रांतात मिळून ‘फ्रँकफर्ट मराठी कट्टा’, ‘महाराष्ट्र मंडळ म्युनिक’, ‘बर्लिन मराठी मंडळ’, ‘हॅम्बुर्ग मराठी मंडळ’ इ. अकरा मराठी मंडळे स्थापन झाली आहेत. प्रत्येक मंडळात ५० ते १५० सभासद आहेत. सर्व मंडळे आपापल्या परीने मराठी भाषिकांना एकत्र आणून सर्व मराठी सण आणि मराठी भाषा दिन साजरा करतात. अशा तर्ऱ्हेने मराठी संस्कृतीचे जर्मनीत जतन होत आहे.”
२०१४च्या सुमारास फ्रँकफर्ट येथे ‘मराठी कट्टा’ स्थापन झाला आहे. आसपासच्या गावातील मंडळीही येथील कार्यक्रमात सामील होतात. मराठमोळ्या कार्यक्रमांचा आणि खाद्यसंस्कृतीचा आस्वाद हे याचे वैशिष्ट्य आहे. कधी मराठीजनांचे रेशीमबंधही येथे जुळतात. परिसरातील सभागृहाचा वापर करून, ही मंडळे मराठी सांस्कृतिक कार्यक्रम तसेच कट्ट्याचा वर्धापन दिनदेखील साजरा करतात. जुन्या आणि नवीन पिढीतील भाषेच्या फरकामुळे (मराठी आणि जर्मन) तेथे स्थायिक झालेली मराठी मंडळी अस्वस्थ होत होती. हा फरक नाहीसा करण्यासाठी, मराठी शाळा स्थापन करण्याचा उपक्रमही हाती घेतला. तसेच वाचनालयही सुरू केले.
फ्रँकफर्टचा प्रसिद्ध मराठी गणपती फार उत्साहाने साजरा केला जातो. तसेच दिवाळी संमेलनही थाटात होते. मराठी भाषा आणि संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी या मंडळाने आणखी एक वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. तो म्हणजे मराठी चित्रपट चित्रपटगृहात दाखवणे. यातून मिळणारा नफा ते सत्कारणी लावतात. कधी महाराष्ट्रातील एन.जी.ओ. ना आर्थिक मदत पाठवून, तर कधी वेगवेगळ्या विषयांवर शिबिरे आयोजित करून. सामाजिक बांधिलकीचे हे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल. मराठी मंडळांचे सांस्कृतिक आदान-प्रदान प्रभावीपणे सुरू असताना नव्या पिढीला माय मराठीशी जोडून घेण्याची गरज भासू लागली. इंटरनॅशनल स्कूलमध्ये जाणारे विद्यार्थी इंग्रजी अथवा जर्मन भाषेत शिकत होते.
साहजिकच त्यांची मराठीची नाळ तुटत चालली होती. भारतातील आपल्या नातलगांशी त्यांचा नीट संवाद होत नव्हता. यावर काही तरी उपाय शोधणे आवश्यक झाले होते. जर्मनीतील महाराष्ट्र मंडळ म्युनिक सभासद, डॉ. प्रवीण पाटील यांनी म्युनिक येथे मराठी शाळा स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. त्याला अनेकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला; कारण सर्वांनाच आपल्या मुलांनी भारतातील नातलगांशी मराठीत संवाद करावा, असं वाटत होतं. शाळेचा अभ्यासक्रम व पुस्तके यासाठी भारती विद्यापीठाचे कदम यांना डॉ. पाटील भेटले. भारती विद्यापीठाने पुस्तके देण्याची तयारी दाखवली. अशा तर्ऱ्हेने हा उपक्रम मार्गी लागला. ‘माय मराठी’च्या पाठोपाठ ‘फ्रँकफर्ट मराठी कट्टा’ या मंडळानेदेखील मराठी शाळा सुरू केली.
जर्मनीतील मराठी मंडळे व त्यांनी चालविलेल्या शाळा ही तेथील मराठी जनांचे मराठी भाषेवरील व संस्कृतीवरील प्रेम आणि निष्ठाच अधोरेखित करते. आपापल्या नोकरी, व्यवसायाचे अवधान सांभाळून ही मंडळी मराठीची रोपे लावणे व त्यांचे संवर्धन करण्याचे कार्य करीत असतात, हे खरेच कौतुकास्पद आहे. सुमारे ३०-४० वर्षांपूर्वी युरोपात गेलेल्या भारतीयांची मुले आता विवाहयोग्य झाली आहेत. ती तेथेच वाढलेली असल्याने. त्यांच्यावर कुटुंबात जरी भारतीय संस्कार असले, तरी बाहेर युरोपीयन वातावरण असल्याने मिश्र संस्कार झालेले आहेत. त्यामुळे त्यांना तेथे वाढलेला भारतीय वंशाचा जोडीदार मिळाला, तर सोयीचे जाते.
मात्र तिथे गेलेल्या भारतीय वंशाच्या मुलांना लग्नासाठी भारतीय वंशाचाच पण युरोपात स्थायिक असलेला जोडीदार निवडणे कठीण जाते. नेमकी हीच समस्या हेरून, आता जर्मनीतील म्युनिच येथील डॉ. प्रवीण पाटील एक अशी विवाहसंस्था स्थापन केली आहे, जी संपूर्ण युरोपातील भारतीय मुलामुलींना त्यांचा जोडीदार निवडण्यास एक व्यासपीठ उपलब्ध करून देते. त्यांच्या ‘शुभमंगलयुरोप’ या विवाहसंस्थेतर्फे विवाहेच्छू मुलामुलींना एकत्र आणण्यासाठी अनेक शहरांत वधुवर मेळावे आयोजित केले जाणार आहेत. त्यातील पहिला मेळावा १३ जुलैला म्युनिक येथे आहे, तर नंतरचे मेळावे बर्लिन, ॲमस्टरडॅम, झुरिक येथे होणार आहेत.