Wednesday, March 26, 2025
Homeताज्या घडामोडीभारतीय बाजारात अफगणिस्तानचा कांदा विक्रीसाठी दाखल

भारतीय बाजारात अफगणिस्तानचा कांदा विक्रीसाठी दाखल

नाशिक, मध्य प्रदेशच्या कांद्याला करावी लागणार स्पर्धा

नाशिक : कांद्याचे दर वाढत चालल्याने देशातील व्यापाऱ्यांनी अफगणिस्तानातील लाल कांद्याची खरेदी करुन तो भारतीय बाजारात विक्रीला आणला आहे. अफगणिस्तानमध्ये लाल कांद्याचे दर कमी असल्याने तो कांदा आयात करुन भारतीय बाजारात महागड्या दरात विक्री करुन नफा कमविण्याचा उद्योग सुरु केला आहे. या प्रकाराचा मध्य प्रदेशातील कांदा उत्पादकांसह नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसू लागला आहे.
कांद्यावर केंद्र सरकारने लागू केलेले ४० टक्के निर्यातशुल्क, ‘नाफेड’चा तटपुंजा भाव या सगळ्या घोळात आता अफगाणिस्तानचा लाल कांदा पाकिस्तानमार्गे भारतात दाखल होत आहे. भारतात कांद्याचे वाढत असलेले दर अन् अफगानिस्तानमध्ये घसरलेले दर याचा फायदा घेत खासगी व्यापारी तिकडील कांदा भारतात आणून मालामाल बनू पाहत आहेत.

अमृतसर अन् दिल्लीच्या बााजरपेठेत या कांद्याने आपले बस्तान बसविले असून, लवकरच तो इतर बाजारपेठ काबीज करण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे राजस्थानचा कांदा संपल्याने दिल्लीत नाशिकसह मध्य प्रदेशचा कांदा अधिक प्रमाणात जाऊ लागला आहे. या कांद्याची स्पर्धा दिल्लीच्या बाजारात अफगाणिस्तानच्या कांद्याशी होत आहे.

कांदा भारत सरकारच खरेदी करीत असल्याची शक्यता देशातील कांदा उत्पादकांनी व्यक्त केली होती; परंतु अधिक माहिती घेतली असता कांदा खासगी व्यापारीच थेट खरेदी करीत असल्याचे सांगण्यात आले. दिल्लीच्या व्यापाऱ्यांनी पाकिस्तानच्या रस्त्याने अफगाणिस्तानचा कांदा आणला असून, २८ ते ३० रुपये किलो या भावाने तो पोच मिळाला आहे. तर भारतात कांद्याचे दर ४० ते ५० रुपये किलो झाले आहेत. त्यामुळे तिकडील कांदा मोठ्या व्यापाऱ्यांना परवडणारा आहे; मात्र नाशिकसह इतर ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी अफगाणिस्तानच्या कांद्याला परवानगी देऊ नये, अशी भूमिका मांडली आहे. दोन देशांमध्ये झालेल्या व्यापारी करारामुळे हा व्यवहार दोघा बाजूंच्या व्यापाऱ्यांना शक्य होत आहे; मात्र तिकडील कांदा जरी भारतात दाखल झाला असला तरी नाशिक, नगर, पुणे आणि मध्य प्रदेशातील कांदा गुणवत्तेने भारी पडत असल्याने आपल्याकडील कांद्यालाच जास्त मागणी असल्याचे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले.

अफगाणिस्तानमधील ४० टनाचा एक अशा पाच ट्रकमधून २०० टन कांदा दिल्लीसह अमृतसरमध्ये विक्रीसाठी आला आहे. त्यात अजून वाढ होऊ शकते. हा कांदा ग्राहकांना २६ ते ३२ रुपये किलो भावाने विकला जाण्याची शक्यता आहे. रस्त्याने ट्रकमधून कांदा आणण्यासाठी करासह ट्रकचे भाडे ७५ ते ८५ हजार रुपयांपर्यंत देण्यात आले आहे. पाकिस्तानमार्गे वाघा बॉर्डर पास करून कांदा भारतात दाखल होत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -