धम्मचक्र प्रवर्तन दिनाआधी बौद्ध अनुयायांची मागणी होणार पूर्ण
नागपूर : जगभरातील बौद्ध अनुयायांसह (Buddhist followers) तमाम भारतीयांचे श्रद्धास्थान असलेल्या नागपूरच्या दीक्षाभूमी (Dikshabhoomi) येथील अंडरग्राऊंड पार्किंग (Underground parking) वादाचा विषय बनलं होतं. दीक्षाभूमी स्मारक समितीने मनमानी करत लोकांना विश्वासात न घेता हे विकासकार्य केल्याचा आरोप बौद्ध अनुयायी आंदोलकांनी केल्यामुळे या पार्किंगला कडाडून विरोध दर्शवत परिसरात जाळपोळही करण्यात आली. पार्किंगसाठी केलेला हा खड्डा बुजवण्यात यावा, अशी मागणी केली जात होती. दीक्षाभूमी स्मारक समितीच्या विनंतीनंतर लवकरच खड्डा बुजवण्याची प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती आता समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खड्डा बुजवण्याच्या आक्रमक मागणीमुळे दीक्षाभूमी स्मारक समितीचे विश्वस्त विलास गजघाटे यांनी नुकतेच अंडरग्राउंड पार्किंगचे काम करणाऱ्या एनआयटी आणि एनएमआरडीएच्या अधिकाऱ्यांशी भेट घेत तो खड्डा बुजवण्याची मागणी केली. या अधिकाऱ्यांनी तसा प्रस्ताव शासनाच्या उच्च अधिकार समितीकडे पाठवला होता. यानंतर आता पार्किंगसाठी खोदण्यात आलेला परिसर ऑगस्ट महिन्याच्या शेवटी किंवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत समतल केला जाणार असल्याची माहिती समितीचे विश्वस्त विलास गजघाटे यांनी दिली आहे. ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वी दीक्षाभूमीचा परिसर पूर्ववत होईल, असा विश्वासही गजघाटे यांनी व्यक्त केला आहे.
बौद्ध अनुयायांनी केलं होतं आंदोलन
दीक्षाभूमी परिसरात १ जुलै रोजी मोठ्या संख्येने जमलेल्या संतप्त जमावाने विकासकामाच्या साहित्याची तोडफोड केली. तर इतर विकासकामाला आमचा विरोध नसून केवळ चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या अंडरग्राऊंड पार्किंगला आमचा कडाडून विरोध असल्याचे मत या आंदोलकांनी व्यक्त केलं होतं. त्यानंतर राज्य सरकार आणि दीक्षाभूमीचे व्यवस्थापन सांभाळणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीनेही अंडरग्राउंड पार्किंगचे प्रकल्प रद्द केल्याचे जाहीर केले होते. मात्र, अंडरग्राउंड पार्किंगसाठी दीक्षाभूमीच्या परिसरात खोदलेला अवाढव्य खड्डा तसाच कायम होता. आंदोलनकर्त्यांचा रोष लक्षात घेता त्यांची मागणी आता पूर्ण केली जाणार आहे व लवकरच खड्डा बुजवण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
समाजमाध्यमावर खोट्या अफवा, त्यातून आंदोलनाचा भडका
वस्तुस्थितीशी कोणताही संबंध नसताना केवळ समाजमाध्यमांवरच्या खोट्या अफवा आणि त्या अफवांची कसलीही चौकशी न करता त्यावर सामान्य नागरिकांनी विश्वास ठेवला. परिणामी त्यातूनच आंदोलनाचा भडका उठल्याचे मत दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य डॉ. प्रदीप आगलावे यांनी व्यक्त केले. दीक्षाभूमी येथे झालेल्या आंदोलनाआधी अंडरग्राऊण्ड पार्किंगचा नागपूर मेट्रोशी कोणताही संबंध नसताना फक्त अंडर ग्राऊण्ड पार्किंगच्या ठिकाणी सुरक्षेसाठी आणलेल्या बॅरिकेट्स वर नागपूर मेट्रो लिहिले होते. त्यामुळे ही पार्किंग नागपूर मेट्रोला दिली जाईल, ही अफवा पसरवण्यात काही समाजकंटक यशस्वी झाले, असं स्मारक समितीचे अध्यक्ष प्रदीप आगलावे (Pradeep Aglave) यांनी सांगितलं.