Tuesday, April 22, 2025
Homeताज्या घडामोडीNawab Malik : नवाब मलिक पुन्हा तुरुंगात जाणार? आज जामिनाचा अखेरचा दिवस!

Nawab Malik : नवाब मलिक पुन्हा तुरुंगात जाणार? आज जामिनाचा अखेरचा दिवस!

सुप्रीम कोर्टात आज पार पडणार सुनावणी

मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या जामिनाचा आज शेवटचा दिवस आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेल्या नवाब मलिकांना आजारपणाच्या कारणास्तव जामीन मंजूर करण्यात आला होता. ते तुरुंगात असताना त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) फूट पडली होती. बाहेर आल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) व अजित पवार (Ajit Pawar) दोन्ही गटाच्या नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. अनेक दिवस मलिक आपली भूमिका स्पष्ट करु शकले नव्हते. अखेर त्यांनी अजितदादांना साथ देण्याचा निर्णय घेतला. यानंतर आज नवाब मलिकांच्या जामिनावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे मलिक तुरुंगात जाणार की त्यांच्या जामिनात मुदतवाढ होणार याच फैसला आज होणार आहे.

मुदतवाढ मिळण्यासाठी नवाब मलिक यांनी सुप्रीम कोर्टाकडे अर्ज दाखल केला आहे. मात्र, आज सुप्रीम कोर्टाकडून मुदतवाढ न मिळाल्यास त्यांना पुन्हा जेलमध्ये जावं लागणार आहे. न्यायमूर्ती बेला त्रिवेदी आणि सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी पार पडणार असून कोर्ट नंबर १४ मध्ये आज ६१ व्या नंबर वर सुनावणी आहे. अशातच नवाब मलिक आज विधान परिषदेसाठी मतदान करणार की नाही? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

नवाब मलिक यांना ईडीने २०२२ मध्ये गोवावाला कंपाऊंड प्रकरणात मनी लाँड्रिंग कायद्याखाली अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात होते. नंतर ऑगस्ट २०२३ मध्ये ते अटीशर्तीसह जामिनावर तुरुंगातून बाहेर आले होते. प्रकृतीचे कारण देत जामीन मिळावा अशी मागणी तेव्हा त्यांनी केली होती. क्रूझ ड्रग्ज प्रकरणादरम्यान मलिक चांगलेच चर्चेत आले होते. या प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आरोपी होता. मात्र एनसीबीचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर मलिक यांनी गंभीर आरोप केले होते. या आरोपांमुळे मलिक तेव्हा चर्चेचा विषय ठरले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -