आतापर्यंत १२४ आमदारांनी केलं मतदान; तर ठाकरेंचे आमदार कुठे?
मुंबई : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी (Vidhanparishad Election) आज मतदान होत आहे. सकाळी ९ वाजेपासून मतदानास सुरुवात झाली आहे. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीत महायुतीने मोठा डाव टाकला असल्याची शक्यता आहे. मतदानाच्या दिवशीच महाविकास आघाडीचे काही आमदार फुटणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने (NCP Ajit Pawar group) काँग्रेसचे (Congress) तब्बल ५ आमदार फोडल्याचं सांगितलं जातंय. तर भाजपकडून (BJP) देखील काँग्रेसचे ४ आमदार फोडण्यात आल्याची माहिती आहे. एकूणच काँग्रेसचे तब्बल ८ आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजप उमेदवारांना मतदान करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज मविआला मोठा धक्का बसू शकतो.
तर दुसरीकडे, काँग्रेसच्या आमदारांनी अद्याप मतदानच केलेलं नाही. ते अजूनही पक्ष कार्यालयात आहेत. ११ वाजेपर्यंत १२४ आमदारांनी मतदान केल्याची माहिती आहे. मात्र, काँग्रेसचा एकही आमदार विधानभवनात पोहाचलेला नाही. तर ठाकरे गटाचेही (Thackeray Group) आमदार परळच्या आयटीसी हॉटेलमध्ये मुक्कामाला होते व ते आता मतदानासाठी विधानभवनाच्या दिशेने रवाना झाले आहेत.