‘माझ्यावर कोणतीही कारवाई होऊ शकत नाही, मी हल्ला करतो’; अल्पवयीन मुलाचे थरारक कृत्य सीसीटीव्हीत कैद
नाशिक : राज्यात अल्पवयीन मुलांकडून होणाऱ्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असतानाच नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिकमधील माजी नगरसेवकाच्या (Councillor) मुलावर विरोधकांनी जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला (Nashik Crime). अंबड पोलीस ठाण्याच्या (Ambad Police Station) हद्दीतील लेखानगर येथे गौळणे गावाचे सरपंच अजिंक्य चुंभळे याच्यावर काही समाजकंटकांनी वादाच्या कारणांमुळे धारदार शस्त्राने वार केला. यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश होता. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी जमली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकचे माजी नगरसेवक यांचा मुलगा अजिंक्य चुंभळे याचा काही समाजकंटकांविरोधात वाद सुरु होता. मात्र या वादाला पूर्णविराम मिळत नसल्याने याबाबतीत पोलीस तक्रार होणार असे चुंभळे यांनी म्हटले. या गोष्टीचा समाजकंटकांना राग अनावर झाल्याने त्यांनी चुंभळे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु चुंभळे हे वेळीच त्यांच्या संपर्क कार्यालयात गेल्याने हा अनर्थ टळला.
नेमके प्रकरण काय?
काल सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अजिंक्य चुंभळे हे लेखानगर येथे त्यांच्या कार्यालयात असताना अज्ञात पाच-सहा समाजकंटकांनी एका अंडा बुर्जी विक्रेत्यास धमकी दिली. यावेळी चुंभळे यांनी बुर्जी विक्रेते व धमकी देणाऱ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र वाद मिटत नसल्याने पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिल्याचा राग आल्याने काही वेळाने हे गुंड हातात धारदार चॉपर घेऊन आले. यावेळी बेसावध असलेल्या चुंभळे यांच्यावर त्यांनी प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच चुंभळे हे त्यांच्या संपर्क कार्यालयात गेल्याचे बघताच हल्लेखोरांनी पळ काढला.
अल्पवयीन गावगुंडाचा थरारक प्रकार
हल्ला करण्यासाठी आलेल्या समाजकंटकांपैकी एकाने मी अल्पवयीन आहे. हत्यार माझ्याकडे द्या, मी हल्ला करतो. माझ्यावर कोणतीही पोलीस कारवाई होऊ शकत होणार नाही, असे वक्तव्य केल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी सिडकोवासीयांमधून करण्यात येत आहे.
दरम्यान, अजिंक्य चुंभळे यांनी संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. काल रात्री उशिरापर्यंत याबाबत अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. यावेळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.