Thursday, March 27, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यविमा कंपन्यांचे कार्य चालते तरी कसे?

विमा कंपन्यांचे कार्य चालते तरी कसे?

उदय पिंगळे, मुंबई ग्राहक पंचायत

विमा म्हणजे काय? हे आपल्याला माहीत आहे. जोखीम व्यवस्थापन करण्यासाठी तो घेण्यात येतो. जीवन विमा आणि सर्वसाधारण विमा असे याचे दोन मुख्य प्रकार आहेत. सन २०१४ ते २०२४ पर्यंत या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये ५३९०० कोटी रुपयांची थेट गुंतवणूक आली आहे. भारत लोकसंख्येच्या दृष्टीने पहिल्या क्रमांकावर असूनही, अजून विमा घ्यायला हवा, ती आपली गरज आहे हे फार कमी लोकांना वाटते. त्यामुळे या व्यवसायात वाढ होण्याच्या मोठ्या संधी आहेत. स्वतःहून जीवन विमा किंवा आरोग्य विमा घेणारे फार थोडे लोक आहेत. या कंपन्यांचा व्यवसाय चालतो तरी कसा? त्या प्रीमियम कसा ठरवतात, भरपाई कशी देतात याबद्दल सर्वसाधारण लोकांना कुतूहल आहे. त्याच्या आकडेवारीच्या तपशिलात न जाता त्यांच्या कार्याचा मागोवा घेण्याचा हा प्रयत्न.

आपल्याला माहीत आहेच की, विमा हा एक करार असून कंपन्या त्याच्या ग्राहकांकडून विम्याचा प्रीमियम घेतात आणि करारातील अटी-शर्ती मान्य करून जर तशी घटना घडलीच तर त्याची भरपाई देतात. यामुळे ग्राहकांची जोखीम कमी होते त्याचप्रमाणे किरकोळ विमा संरक्षण देऊन त्या ग्राहकांच्या गरजेच्या बचत योजनांनाही बाजारात आणतात. त्यांना गरजेनुसार नियमित उत्पन्न मिळेल याची काळजी घेतात, ते करताना –

जोखीम निश्चिती – विमा कंपन्या एखाद्या व्यक्तीची त्याच्या मालमत्तेची किंवा एखादी अनपेक्षित घटनेची जोखीम स्वीकारतात. यासाठी वास्तविक विज्ञान तज्ज्ञांची मदत घेतात. विमा, निवृत्तिवेतन, वित्तव्यापार, उद्योग, व्यवसाय यातील जोखीम मोजण्याची गणितीय आणि संख्यकीय विभागाची शाखा आहे. भविष्यातील अनिश्चित घटनांचे आर्थिक परिणाम शोधून त्याचे विश्लेषण करण्यासाठी संभाव्यता आणि सांख्यकीय गणिताचा वापर करते. प्रीमियम किती जमा होईल किती क्लेम द्यावे लागतील आणि व्यवस्थापन खर्च भागवला जाईल याप्रमाणे योजनेची रचना करण्यात येते. बाजारात चालू अशाच प्रकारच्या योजना आणि त्यांचे प्रीमियम यांचाही विचार केला जातो.

योजनेचा प्रीमियम: योजना निश्चित झाली की, त्यांची आकर्षक जाहिरात केली जाते. एजंटच्या माध्यमातून त्याचप्रमाणे ऑनलाईन पोर्टलवर ग्राहक त्यांनी खरेदी केलेल्या योजनेचा प्रीमियम मासिक, त्रैमासिक, वार्षिक पद्धतीने इन्शुरन्स कंपनीकडे जमा करीत असतात. जमा होणारा प्रीमियम हे इन्शुरन्स कंपन्यांच्या उत्पन्नाचे साधन आहे.

अंडररायटिंग : जेव्हा ग्राहक विमा संरक्षणाची मागणी करतो तेव्हा सर्वप्रथम या प्रक्रियेतून जावे लागते. विमा कंपन्या छोट्या व्यवसायाचा विमा उतरवण्याचा धोका निर्धारित करण्यायोग्य असल्याची चाचपणी करून तुमची मागणी ही स्वीकार्य आहे का नाही ते तपासून जर ती स्वीकार्य असेल, तर प्रीमियम किती घ्यायचा ते ठरवते. व्यक्तीला जीवनाविमा, आरोग्यविमा देताना, त्याचा प्रीमियम ठरवताना त्याचे वय, आरोग्य, जीवनशैली, कामाचे स्वरूप आणि त्याचा इन्शुरन्सच्या क्लेम्सचा पूर्वेतिहास तपासला जातो. त्यानंतर त्याचा प्रस्ताव बनवला जातो.

प्रस्तावास मंजुरी अथवा नामंजुरी : अंडररायटिंगच्या अहवालास अनुसरून तुमचा प्रस्ताव स्वीकारायचा/नाकारण्याचा किंवा त्यातील अटी-शर्तीमध्ये अथवा प्रीमियममध्ये बदल करण्याचा अधिकार विमा कंपनीस असतो. तो दोघांनाही मान्य असेल तर प्रीमियम घेऊन विमाकरार केला जातो. तो मिळाल्यावर ग्राहकाने तपासून पाहणे अपेक्षित असून त्याने समाधान होत नसेल, तर ठरावीक मुदतीत तो रद्द केला जाऊ शकतो. यासाठी कोणतेही कारण देण्याची जरुरी नसते. अशा वेळी त्यावरील प्रोसेसिंग फी वजा करून उरलेली रक्कम परत देण्यात येते.

जोखीम फंड उभारणी : विमा कंपन्या जमा झालेल्या प्रीमियममधील काही भागांचा एक फंड निर्माण करून त्याचा उपयोग क्लेम रक्कम देण्यास वापरतात. यामध्ये पडून असलेल्या रकमेची अल्पकालीन आणि दीर्घकालीन गुंतवणूक कशी करायची यांचे नियम असून ती त्याच पद्धतीने केली जाते, ज्यामुळे कंपनीच्या रोखता प्रवाहात अडचण येणार नाही. ग्राहकांना त्यातूनच नुकसानीची भरपाई मिळत असल्याने त्यांची जोखीम कमी होते.

क्लेमवरील प्रक्रिया : जेव्हा पॉलिसीधारक त्याच्या नुकसानीचा दावा दाखल करतो तेव्हा इन्शुरन्स कंपनीकडून त्याची सत्यता तपासली जाते. दावा योग्य असल्यास मंजूर करून त्याची रक्कम धारकास दिली जाते, अशा प्रकारे धारकाच्या आर्थिक नुकसानीची भरपाई होते.

आपत्कालीन फंडाची निर्मिती : जमा झालेल्या प्रीमियममधून भविष्यात येणाऱ्या दाव्यांच्या भरपाईची खात्री असली तरी जमा प्रीमियममधील काही रक्कम बाजूला ठेऊन आपत्कालीन फंडाची निर्मिती केली जाते त्यातून गुंतवणूक केली जाऊन अधिक परतावा कसा मिळेल त्यामुळे भविष्यात कदाचित अधिक दावे मंजूर करायला लागल्यास होणाऱ्या जास्तीच्या खर्चाची भरपाई होईल.

कंपनीचा नफा : जमा झालेला प्रीमियम आणि त्यातून द्यावी लागलेली भरपाई आणि व्यवस्थापन खर्च यातील फरक हा विमा कंपनीचा नफा असतो. पहिल्या वर्षाचा खर्च हा सर्वाधिक असतो त्यातूनच एजंटला सर्वाधिक कमिशन मिळते. आपत्कालीन
फंडातून मिळवलेले जास्तीचे उत्पन्न हा देखील कंपनीचा नफा असतो.

पुनर्विमा : खूप मोठ्या रकमेचा विमा उतरवताना कंपनी अन्य कंपन्यांकडून पुनर्विमा घेऊन आपली जोखीम कमी करते. अनपेक्षित नुकसान होऊ नये यासाठी मुख्य कंपनी आपली जोखीम वेगवेगळ्या कंपनीकडे पुनर्विमा काढून कमी करून घेते.

नियामक नियमन : या सर्व कंपन्यांवर अंकुश ठेवण्यासाठी स्वतंत्र नियामक आहेत. त्यामुळे नियम सूचना या कंपन्यांना पाळावेच लागतात. ग्राहक हक्क संरक्षण, उचित व्यवहार, आर्थिक स्थिरता राहून कंपन्यांचा व्यवसाय कसा वाढेल याची काळजी नियामकाकडून घेतली जाते.

उत्पादन विविधता : ग्राहकांच्या गरजा नियमकांच्या सूचना यांचा विचार करून वेगवेगळी जोखीम कमी करणारी उत्पादने या कंपन्या बाजारात आणतात. यात जीवनाविमा, आरोग्यविमा, मालमत्ता विमा, वाहन विमा विशेष विमा इ. यांचा समावेश होतो. थोडक्यात, विमा कंपन्या पॉलिसी धारकांकडून घेऊन त्या स्वतः घेत असलेल्या जोखमीचा आवश्यकता असल्यास पुनर्विमा घेतात. प्रीमियम अशा प्रकारे आकारला जातो आणि त्याची योग्य गुंतवणूक केली जाते ज्या योगे दाखल होणाऱ्या दाव्यांची पूर्तता त्यातून करता येईल आणि विमा कंपनीला त्यांच्या व्यवसायातून नफा होईल. त्याचप्रमाणे ग्राहकांनी स्वीकारलेल्या जोखमीचे योग्य व्यवस्थापन होईल.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -