Wednesday, September 3, 2025

मुंबईत सकाळपासून पावसाच्या जोरदार सरी, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबईत सकाळपासून पावसाच्या जोरदार सरी, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबई: दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर वरूण राजा पुन्हा एकदा मुंबईत जोरदार कोसळत आहे. पहाटेपासूनच मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झाली आहे. यामुळे याचा फटका मध्य रेल्वेच्या प्रवाशांना बसत आहे.

जोरदार पावसामुळे अनेक रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने सुरू आहे. रेल्वेचे वेळापत्रक बिघडल्याने कामावर जाणाऱ्या लोकांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे.

रेल्वे उशिराने धावत असल्याने मध्य रेल्वेच्या ठाणे, दादर, कल्याण तसेच कुर्ला या स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी आहे. एक आठवड्याआधीच मुंबईत जोरदार पाऊस झाला होता. या पावसात संपूर्ण रेल्वेची व्यवस्थाच कोलमडून गेली होती.

शुक्रवारी सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचत आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून राज्यातील काही भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईलाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. शुक्रवारपासून मुंबईत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.

Comments
Add Comment