मुंबई : शनिवारी, दि. १३ जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर येत असून या दौऱ्यादरम्यान ते मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचे भूमिपूजन करणार आहेत. गोरेगावमधील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये शनिवारी संध्याकाळी ५ वाजता हा भूमिपूजन कार्यक्रम पार पडणार आहे. गोरेगाव- मुलुंड लिंक रोड हा प्रकल्प संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या भूमिपूजनामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या कामाला वेग येणार आहे.
या प्रकल्पांतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानांतर्गत ४.७ किमी लांबीचे जुळे बोगदे बांधले जाणार आहेत. या बोगद्याद्वारे पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील प्रवासाचा वेळ ७५ मिनिटांवरून २५ मिनिटांवर येणार आहे. गोरेगाव- मुलुंड लिंक रोड तयार झाल्यानंतर मुंबईकरांचा प्रवास सुसाट होणार असून त्यांच्या प्रवासाची ५० मिनिटं वाचणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शनिवारी गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात या जुळ्या बोगद्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. याशिवाय एमएमआरडीएतर्फे उभारण्यात येत असलेल्या ठाणे-बोरिवली बोगद्याच्या कामाचे भूमिपूजनही करण्यात येणार आहे. हा ११.८५ किमी लांबीचा जुळा बोगदा आहे. ज्यामध्ये एकूण सहा लेन असणार आहेत.
गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पांतर्गत बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ४.७ किमी लांब आणि ४५.७० मीटर रुंद असे जुळे बोगदे बांधले जाणार आहेत. ॲप्रोच रस्ते आणि इतर जोडणारे पैलू जोडल्यास एकूण लांबी ६.६५ किमी होईल. हे जुळे बोगदे जमिनीखाली २० ते १६० मीटर खोलीवर असणार आहे. दोन्ही बोगदे ३००-३०० मीटर अंतरावर जोडले जातील. सुमारे १४.२ मीटर व्यासाच्या टनेल बोरिंग प्लांटद्वारे बोगदा खोदला जाईल. या बोगद्यात आधुनिक प्रकाश व्यवस्था, वेंटिलेशन यंत्रणा, अग्निसुरक्षा यंत्रणा, सीसीटीव्ही, बोगद्याच्या दोन्ही बाजूला नियंत्रण कक्ष यांचा समावेश असणार आहे.
मुंबईकरांची वेळ व इंधन बचत होणार
महत्वाचे म्हणजे, या बोगद्यामुळे मुंबईत दरवर्षी सुमारे २२ हजार ४०० टन कार्बन उत्सर्जनात घट होईल. त्याचसोबत गोरेगाव-मुलुंड लिंक रोडमुळे मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ आणि इंधनही वाचणार आहे. जुळ्या बोगद्यांच्या बांधकामाचा अंदाजे एकूण खर्च ६३०१.०८ कोटी रुपये असेल. जुळ्या बोगदा पूर्ण होण्याची अंदाजे ऑक्टोबर २०२८ ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या निवासी आणि व्यावसायिक प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी २३ मजली ७ बिल्डिंग आणि ३ मजली मार्केटचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पाची एकूण लांबी १२.२० किमी आहे. ज्याच्या डिझाइनचे काम प्रगतीपथावर आहे.