Wednesday, April 23, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखजगभरातील निवडणुका आणि अर्थकारण

जगभरातील निवडणुका आणि अर्थकारण

भूषण ओक, अर्थ सल्लागार

यंदा जगात अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, युरोपियन युनियन, कोरिया, युक्रेन, तैवान, बांगलादेश, भूतान, मालदीव, श्रीलंका अशा सुमारे ६४ देशांमध्ये राष्ट्रीय निवडणुका पार पडत आहेत. भारताकडून अमेरिकेत होणारी सॉफ्टवेअर आणि इतर निर्यात, शस्त्रात्रे खरेदीसाठी फ्रान्सवर असलेली मदार, रुपया घसरल्यास कमी होणारा डॉलर्समध्ये मिळणारा परतावा अशा अनेक मुद्द्यांचा निकाल यानिमित्ताने लागणार आहे. २०२४ हे वर्ष जागतिक निवडणूक वर्ष म्हणायला हरकत नाही. कारण या वर्षी जगात सुमारे ६४ देशांमध्ये राष्ट्रीय निवडणुका होत आहेत; ज्यामध्ये जगाच्या लोकसंख्येच्या ४९ टक्के लोक नवीन सरकारे निवडतील. निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या किंवा अलीकडेच सामोरे गेलेल्या देशांमध्ये अमेरिका, कोरिया, युक्रेन, तैवान, बांगलादेश, भूतान, मालदीव, श्रीलंका तसेच ब्रिटन, फ्रान्स या देशांचा समावेश आहे. भारतासह काही देशांमध्ये निवडणुका पार पडल्या पण इतर अनेक महत्त्वाच्या देशांच्या निवडणुका अजून व्हायच्या आहेत.

अमेरिकेतील निवडणुकीकडे सर्व जगाचे लक्ष नेहमीच लागलेले असते कारण अमेरिकेच्या आर्थिक धोरणांचा जागतिक अर्थव्यवस्थेवर लक्षणीय प्रभाव पडतो. येत्या नोव्हेंबर महिन्यात होणार असलेल्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन समोरासमोर उभे ठाकले आहेत. अमेरिकेतील ५० राज्यांपैकी बहुतेक राज्ये प्रत्येक निवडणुकीत रिपब्लिकन किंवा डेमोक्रॅट यापैकी एका पक्षाला निवडून देतात, मात्र काही राज्ये अशी आहेत जी कोणत्याही पक्षाकडे झुकू शकतात. त्यांना स्विंग स्टेट्स म्हटले जाते. २०२४ च्या निवडणुकीत नेव्हाडा, ॲरिझोना, विस्कॉन्सिन, मिशिगन, पेनसिल्व्हानिया आणि जॉर्जिया ही राज्ये पारडे कसेही फिरवतील असा अंदाज आहे. बायडेन निवडून आले तर आर्थिक आणि राजकीय धोरणात फारसा फरक पडणार नाही, पण ट्रम्प निवडून आले तर त्यांनी केलेल्या घोषणांनुसार दोन महत्त्वाचे बदल अपेक्षित आहेत.

परदेश धोरणातील एक महत्त्वाचा बदल म्हणजे अमेरिका सर्व प्रकारच्या युद्धांमधून पूर्णपणे अंग काढून घेईल. यात युक्रेन, गाझा पट्टी या युद्धभूमींचा समावेश आहे. चीनकडून तैवानवर आक्रमण झाले, तरी अमेरिका कदाचित मदत करणार नाही. दुसरी मोठी घोषणा व्यापारविषयक धोरणाबद्दल आहे. याद्वारे अमेरिका सर्व प्रकारच्या आयातीवर दहा टक्के आणि चीनकडून होणाऱ्या आयातीवर साठ टक्के कर लावेल. असे झाले तर भारताच्या अमेरिकेत होणाऱ्या सॉफ्टवेअरच्या आणि इतर निर्यातीवर मोठा अनिष्ट प्रभाव पडेल. यामुळे अमेरिकेतसुद्धा वस्तू महाग होतील आणि अशा निर्णयाचा अमेरिकेच्या मध्यम वर्गावरही खूप वाईट परिणाम होईल. मूडीजच्या विश्लेषणानुसार यामुळे २०२५ मध्ये अमेरिकेत मंदीही येऊ शकेल.

ब्रिटन, फ्रान्स, युरोपियन युनियन आणि युरोपीय देशांच्या निवडणुका भारत आणि त्या देशांच्या आपापसातील व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात. ब्रिटनमध्ये ऋषी सुनक आणि त्यांचा पक्ष पराभूत होऊन लेबर पक्षाचे कीर स्टार्मर ब्रिटनचे नवीन पंतप्रधान झाले. फ्रान्समध्ये मॅक्रॉन यांच्यासाठी काळ कठीण आहे. तेथे नॅशनल फ्रंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उजव्या आघाडीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी डाव्यांच्या पाठिंब्याने मॅक्रॉन यांची एनसेंबल ही आघाडी दहा वर्षांपूर्वी सत्तेत आली होती, पण या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही. शस्त्रात्रे खरेदीसाठी फ्रान्स भारतासाठी महत्त्वाचा देश आहे आणि तेथे सत्तापालट झाला तर भारतासाठी फार फरक पडणार नाही. किंबहुना, भारताला तो थोडा साह्यभूतच होईल.

दरम्यान, २८ जून २०२४ रोजी जेपी मॉर्गनच्या ईएम इंडेक्स या जागतिक रोखे निर्देशांकात भारतीय सरकारी रोख्यांचा अधिकृतपणे समावेश करण्यात आला. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे. भारताचे वेगाने वाढत असलेले सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी), आंतरराष्ट्रीय व्याजदरांच्या तुलनेत वरचढ परतावा आणि एकूणच मजबूत अर्थव्यवस्था यांची आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थांनी घेतलेली ही दखल आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचा विनिमय दर हा भारतीय रोख्यांवर उपलब्ध असलेल्या परताव्याच्या संदर्भात महत्त्वाचा आहे. रुपया घसरला तर डॉलर्समध्ये मिळणारा परतावा कमी होईल. पण असे होणार नाही हा आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थांचा विश्वास या निर्णयातून दिसतो. मार्च २०२५ पर्यंत यामार्गे भारत सरकारकडे सुमारे २३ बिलियन डॉलर्स येतील, असा अंदाज आहे.

जेपी मॉर्गननंतर ब्लूमबर्ग आणि एफटीएसई रसेल यांच्या रोखे निर्देशांकातही भारतीय सरकारी रोख्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. एफटीएसई रसेल एकूण गंगाजळीच्या तुलनेत जेपी मॉर्गनपेक्षा सहापट मोठा निर्देशांक आहे. भारताजवळ सध्या सुमारे साडेसहाशे अब्ज डॉलर्सचे परकीय चलन आहे. रोख्यांमधील या आगामी गुंतवणुकीमुळे यात उत्तरोत्तर वृद्धी होत जाईल. याचे दोन अतिशय महत्त्वाचे फायदे म्हणजे सरकारी कर्जाची किंमत (द्यावे लागणारे व्याज) कमी होईल आणि सरकार वित्तीय तूट कमी करू शकेल. आंतरराष्ट्रीय रोखे बाजारात पत टिकवून ठेवण्यासाठी वित्तीय तूट कमीत कमी असणे आवश्यक आहे. दुसरे म्हणजे भारताच्या आयात आणि निर्यातीतील फरक नेहमीच नियंत्रणात राहील. सध्या आयातीपेक्षा निर्यात जास्त आहे.

त्रयस्थ दृष्टीनेही पाहता शेअर बाजार सद्यस्थितीत मूल्यांकनाच्या दृष्टिकोनातून बघता उंच पातळीवर पोहोचला असून बाजारात वाजवी मूल्यात निवेशनीय अशा फार कमी कंपन्या उरल्या आहेत. मूल्याधिष्ठित गुंतवणुकी अंतर्गत एशियन पेंट्स, एचडीएफसी बँक, प्राज इंडस्ट्रीज, पीएसपी प्रोजेक्ट्स या कंपन्यांचा सविस्तर अभ्यास केला गेला. त्यापैकी एचडीएफसी बँक, प्राज इंडस्ट्रीज यांचा निर्देशांक वाढला असला तरी एशियन पेंट्स आणि पीएसपी प्रोजेक्ट्स दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीसाठी अजूनही वाजवी भावात उपलब्ध आहेत. शेअर बाजाराचा विषय निघाल्यावर गुंतवणुकीच्या काही वेगळ्या संधींचीही चर्चा करता येते. त्या दृष्टीने नारायण हृदयालयाचे नाव घेता येते. ख्यातनाम हृदयरोग तज्ज्ञ, शल्यविशारद पद्मभूषण डॉ. देवी शेट्टी यांनी २००० मध्ये बंगळूरु येथे पहिले इस्पितळ उघडून स्थापन केलेली ही कंपनी आजच्या घडीला १८ रुग्णालये, तीन हृदयरोग केंद्र आणि १७ प्राथमिक आरोग्य केंद्र चालवते. हृदयरोग निवारणापासून सुरू झालेली ही इस्पितळे आता बहुशाखीय आहेत, तरीही कंपनीचे ४५ टक्के उत्पन्न अजूनही हृदयरोगाशी निगडित उपचारांमधून येते. सर्व मिळून या दवाखान्यांमध्ये सहा हजारांवर खाटा उपलब्ध आहेत. ही कंपनी गरीब रुग्णांना कमी खर्चात उपचार उपलब्ध करून देण्याची सामाजिक जाणीव जोपासते.

या कंपनीच्या इस्पितळांमध्ये खासगी किंवा उच्च श्रेणीच्या महाग खोल्यांपेक्षा जनरल वॉर्डस जास्त आहेत. या कारणास्तव या कंपनीचे प्रत्येक दाखल झालेल्या रुग्णामागे दैनंदिन उत्पन्न फोर्टिस, अपोलो आणि मॅक्ससारख्या कंपन्यांपेक्षा तीस टक्के कमी आहे. पण याची भरपाई कंपनी ही इस्पितळे अत्यंत काटेकोर नियंत्रणाखाली कमीत कमी खर्चात चालवून करते. कंपनीचा प्रत्येक खाटेमागचा सरासरी भांडवली खर्चही इतर रुग्णालयांच्या तुलनेत अर्ध्यापेक्षा कमी आहे. इतर रुग्णालयांप्रमाणे ही कंपनी डॉक्टरांना चाचण्या आणि शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रोत्साहनपर पैसे देत नाही. त्यांना ठरलेला पगारच मिळतो. त्यामुळे अनावश्यक चाचण्या आणि शस्त्रक्रिया केल्या जात नाहीत. मात्र शस्त्रक्रियांच्या नियोजनाच्या बाबतीत ही कंपनी इतरांपेक्षा खूप पुढे आहे.

कंपनीचे आर्थिक आकडे इतर कंपन्यांच्या तुलनेत उत्तम आहेत. चक्रवाढ उत्पन्नवाढ २४ टक्के (३ वर्षे), नफावाढ ६८ टक्के (५ वर्षे), आरओसीई २६ नफा दर २३ टक्के आणि कर्ज माफक आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये केलेल्या भांडवली खर्चानंतर नफा दर १८ टक्क्यांवरून २३ टक्क्यांवर गेला आहे. आजच्या रुपये १२२० प्रति शेअर या किमतीला कंपनीचे पीई गुणोत्तर ३० आहे जे पाच वर्षांच्या सरासरीपेक्षा कमी आहे. पीईजी ०.४७ म्हणजे खूपच आकर्षक आहे. ॲसेट टर्नओव्हर १.०२ म्हणजे उत्तम आहे. बाकी आकडेही ठीक आहेत. एकूण पाहता दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीसाठी ही कंपनी सध्याच्या किमतीत उत्तम आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -