सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi) विठुरायाच्या (Vitthal) दर्शनासाठी दरवर्षी भाविकांची मोठी गर्दी जमते. यंदाही आषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांसह लाखो भाविकांची पालखीजवळ गर्दी जमल्याचे दिसून येत आहे. यावेळी भाविकांना कमी वेळेत दर्शन मिळण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. अशातच एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या पुजेदरम्यानही गर्दी टाळण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. विठुरायाच्या महापूजेवेळी प्रशासनाने व्हीआयपी दर्शनाची घुसखोरी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंदिराचा गाभारा, सोळखांबी लहान असल्याने मोठ्या प्रमाणात व्हीआयपी लोकांची हजेरी लागल्यास पुजेदरम्यान मोठ्या गर्दीला सामोरे जावे लागेल. यासाठी मंदिर समितीने पुजेकाळात व्हीआयपी पासेसवर नियंत्रण आणण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र याकाळात मर्यादित व्हीआयपींनाच प्रवेश देण्यात येणार आहे. याशिवाय महापूजा सुरु असताना मुखदर्शनाची रांग सुरूच राहणार असून महापूजा कमीतकमी वेळेत पूर्ण करण्यासाठी मंदिर समितीशी चर्चा केली जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
भाविकांना मिळणार मँगो ज्यूस
सध्या दर्शनासाठी १५ तास रांगेत उभे राहणारे भाविकांना आता केवळ ४ ते ५ तासात दर्शन मिळत आहे. याच पद्धतीने भाविकांना लवकरात लवकर दर्शन मिळण्यासाठी प्रशासन काम करत असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले. त्याचबरोबर दर्शन रांगेतील भाविकांना शुद्ध पाण्याच्या बाटल्या आणि मँगो ज्यूस दिला जाणार असून वापरलेल्या प्लास्टिक बाटल्या गोळा करून त्या नष्ट करण्यासाठी वेगळी यंत्रणा उभी केल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले .