‘या’ कारणांमुळे कंपनीचे विलीनीकरण
मुंबई : टाटा उद्योग (TATA Group) समूहाच्या अंतर्गत विमानसेवा पुरवणाऱ्या एअर इंडिया (Air India) आणि विस्तारा (Vistara) या दोन्ही कंपन्या नेहमीच चर्चेत असतात. सध्या आर्थिक नुकसान होत असल्यामुळे या दोन्ही कंपन्यांचे विलीनीकरण सुरु आहे. मात्र या विलीनीकरणाचा फटका कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे तब्बल ६०० कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर सध्या टांगती तलवार (Jobless) उभारली गेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तोट्यात चाललेल्या या दोन्ही विमान कंपन्या टाटा समूहाच्या मालकीच्या आहेत. त्यांच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या २३००० पेक्षा जास्त आहे. विमान वाहतूक व्यवसायामध्ये सुधारणा करण्यासाठी आपल्या विमान कंपन्यांचे विलीनीकरण करण्याच्या प्रक्रियेवर काम करत आहे. ही प्रक्रिया सप्टेंबरच्या अखेरीस किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला पूर्ण होऊ शकते. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बाधित कर्मचाऱ्यांची नेमकी संख्या कळेल, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
कर्मचाऱ्यांना मिळणार इतर गटात नोकरी
विलीनीकरण प्रक्रियेचा परिणाम ६०० कर्मचाऱ्यांवर होण्याची अपेक्षा आहे. मात्र नोकरी धोक्यात असणाऱ्या कर्मचाऱ्यांना एअर इंडियासह टाटा समूहाच्या इतर कंपन्यांमध्ये रोजगार देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. जे कर्मचारी कोणत्याही गटाशी जुळवून घेऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी स्वेच्छा सेवानिवृत्ती योजना म्हणजेच VRS सुरू केले जाईल.
दरम्यान, एअरलाइन्स कर्मचाऱ्यांची निवड ही त्यांचा पूर्वीचा अनुभव, कामगिरी आणि इतर बाबी लक्षात घेऊन केली जात आहे. या विलीनीकरण प्रक्रियेचा दोन्ही एअरलाइन्सच्या क्रू मेंबर्स आणि पायलटवर कोणताही परिणाम होणार नाही. त्यासोबत एअर इंडिया एक्सप्रेस आणि एआयएक्स कनेक्ट यांचेही विलीनीकरण होणार आहे.